गोवा राज्याची मार्च अखेरपर्यंत कर्जाची रक्कम २६ सहस्र ६०५ कोटी रुपये होणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २७ मार्च (वार्ता.) – ३१ मार्च २०२५ पर्यंत राज्याचे कर्ज २६ सहस्र ६०५ कोटी २८ लाख रुपये होणार, असा अंदाज राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२४-२५ मध्ये वर्तवण्यात आला आहे. हा कर्जाचा आकडा ३१ मार्च २०२४ मध्ये २३ सहस्र ९७१ कोटी ५८ लाख रुपये होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २६ मार्च या दिवशी विधानसभेत राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२४-२५ मांडला आहे. यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

या अहवालात डिसेंबर २०२४ पर्यंत राज्याला १८ सहस्र ३७३ कोटी रुपये महसूल मिळणार असल्याचे म्हटले आहे. महसूल प्राप्तीमध्ये राज्यातील प्रमुख ८ खात्यांचा अधिक वाटा असणार आहे. यातील सर्वाधिक वाटा हा शहर आणि नगर नियोजन खाते अन् व्यावसायिक कर खाते यांचा असेल. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्याचा एकूण अंदाजित महसुली खर्च २० सहस्र ११ कोटी ३० लाख आहे आणि वर्ष २०२०-२१ च्या तुलनेत हा खर्च ९२ टक्क्यांनी अधिक आहे. वर्ष २०२४-२५ साठी भांडवल प्राप्ती ४ सहस्र ३२६ कोटी ६६ लाख रुपये होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही रक्कम वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत ३७.८१ टक्के अल्प आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये ६ सहस्र ९५७ कोटी २७ लाख रुपये भांडवलप्राप्ती झाली होती.