उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘दत्त माहात्म्य’ पारायण सोहळ्याच्या आवाजामुळे त्रास होत असल्याची अज्ञातांची पोलीस ठाण्यात तक्रार !

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) – येथील श्री गणेश गल्ली-स्वामी समर्थ मंदिर येथे गेली अनेक वर्षे प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) टेंब्येस्वामी लिखित ‘दत्त माहात्म्य’ पारायण सकाळी ९ ते ११.३० या वेळेत चालू आहे. २५ मार्च या दिवशी पारायण चालू असतांना ‘ध्वनीक्षेपकावर चालू असलेल्या या पारायणाच्या आवाजाचा त्रास होत आहे’, अशी तक्रार अज्ञातांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दूरभाषद्वारे केली. यानंतर तेथील पोलीस गाडी, तसेच महिला हवालदार यांनी पारायणस्थळी येऊन ‘पारायणाच्या आवाजामुळे त्रास होत असल्याची तक्रार असून ध्वनीक्षेपक बंद करा’, असे सांगितले; मात्र पारायण करणार्‍यांनी आवाज अल्प न करता पारायणाचे अध्याय संपवूनच पारायण थांबवले.

यानंतर महिला हवालदाराने उंचगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांना बोलावून अशा प्रकारची तक्रार असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत सदस्यांनी हा धार्मिक कार्यक्रम असून यात कोणतीच अडचण नसल्याचे सांगितले. या प्रसंगी पारायण वाचणार्‍या भाविक महिलेने ‘सकाळी जेव्हा भोंग्याद्वारे अजान दिली जाते, तेव्हा ध्वनीप्रदूषण होत नाही का ?’, तेव्हा कुणाची तक्रार नसते का ?’, असा प्रश्न महिला हवालदाराला विचारला. त्यावर ती महिला हवालदार निरुत्तर झाली. (आजकाल प्रार्थनास्थळावरून प्रत्येक ठिकाणी अजानचा आवाज अनेक ठिकाणी ध्वनीमर्यादा ओलांडणारा असतो, तसेच अनेक ठिकाणी अजान सकाळी ६ वाजण्याच्या आत दिली जाते. याविरोधात कोल्हापूर शहरात हिंदुत्वनिष्ठांनी ५ पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दिल्या आहेत. त्यावर कधी पोलिसांनी तत्परतेने कारवाई केल्याचे ऐकिवात नाही ! याउलट हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमाच्या संदर्भात मात्र तत्परतेने कारवाई केल्याचे नेहमीच दिसून येते ! – संपादक)

यानंतर पारायण करणार्‍या साधकांनी ‘पारायणाच्या विरोधात कुणी तक्रार दिली ? असा ध्वनीक्षेपकावरून जाहीर प्रश्न विचारला ? मात्र कुणीही पुढे आले नाही. अशा प्रकारे महिला हवालदारास निर्भीडपणे उत्तर देऊन संबंधित महिला भाविकेने हिंदूंसमोर आदर्श निर्माण केला आहे.