वेंगुर्ला येथे भव्य बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभारणीला शासनाची मान्यता 

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील वाघेश्वर, उभादांडा येथे तब्बल २२ कोटी २३ लाख ९१ सहस्र ३२ रुपये खर्च करून एका बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी याविषयी पाठपुरावा केला होता.

महाराष्ट्र राज्याला ७२० कि.मी. लांबीचा मोठा सागरी किनारा लाभलेला आहे. येथील मत्स्योत्पादन बहुतांश वेळा विविध प्रजातींचे असते. या पार्श्वभूमीवर सागरी किनारा आणि तेथील पर्यावरणासाठी उपयुक्त अशा खेकडा, जिताडा, कालव आणि काकई यांसारख्या सागरी प्रजातींचे संवर्धन करणे आवश्यक आहे. या संवर्धनामुळे कांदळवनाचे नैसर्गिकरित्या व्यवस्थापन आणि संरक्षण होण्यास साहाय्य होणार आहे.

या प्रकल्पासाठी लागणारा निधी महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान यांच्याकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच सल्लागार शुल्क देखील याच संस्थेकडून दिले जाणार आहे. मत्स्यव्यवसाय खात्याच्या आयुक्तांनी या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व अनुमती तातडीने मिळवून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करावा आणि कामाच्या प्रगतीचा अहवाल वेळोवेळी शासनाला सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.