निवडणूक प्रक्रियेच्या बळकटीकरणासाठी निवडणूक आयोगाची ठोस उपाययोजना !

मुंबई – भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर श्री. ज्ञानेश कुमार यांनी संपूर्ण निवडणूक यंत्रणेमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना ठरवल्या आहेत. मुख्य भागधारक असलेल्या राजकीय पक्षांना या प्रक्रियेत सामील करून घेतले जात आहे, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे. १०० कोटी मतदार लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत, त्यामुळे मतदारसूची जन्ममृत्यू नोंदणी अधिकार्‍यांसमवेत समन्वयाने अद्ययावत् करण्यात येत आहे. सर्व पात्र नागरिकांची १०० टक्के नोंदणी सुनिश्चित करणे, मतदानाची सोय करणे हे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर १ सहस्र २०० हून अधिक मतदार नसतील. मतदान केंद्रे २ किलोमीटरच्या आत असतील. प्रत्येक मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा सुनिश्चित केल्या जातील. शहरामध्ये उच्च इमारतींचे क्लस्टर आणि वसाहतींमध्ये देखील मतदान केंद्र असतील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक कर्मचार्‍यांच्या व्यापक आणि क्षमतेच्या विकासासाठी निवडणूक हॅन्डबुक आणि सूचना मॅन्युअल्स नवीन बदलांमुळे समन्वयीत केले जातील. अनेक भारतीय भाषांमध्ये डिजिटल प्रशिक्षण किट तयार करण्यात येत आहे यामुळे कार्यकर्त्यांचे प्रभावी प्रशिक्षण होईल. सर्वपक्षीय बैठकांच्या नियमित आयोजनाचेही निर्देश दिले असून यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक बळकट होईल. निवडणूक प्रक्रियेतील सर्व संबंधित घटकांशी समन्वय साधता येईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.