लातूर येथे बनावट आधार कार्ड आणि खोटे शपथपत्र सादर केल्याप्रकरणी ९ जणांवर गुन्हे नोंद !

  • सक्षम अधिकार्‍यांनी दाखले दिले नसल्याचे कारण देत २ सहस्र २७३ जन्म दाखले रहित !

  • नायब तहसीलदार गणेश सरोदे यांचे घुमजाव !

 

 

लातूर – जन्माचा दाखला मिळावा, यासाठी प्रशासनाकडे सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांत बनावट आधार कार्ड आणि खोटे शपथपत्र वापरल्याच्या प्रकरणी ९ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हे दाखले काढण्यात आले असून सक्षम अधिकार्‍यांनी ते दिले नाहीत, असे कारण देत हे दाखले रहित करण्यात आले आहेत. (केवळ गुन्हे नोंद करून न थांबता अशांना कठोर शिक्षा लवकरात लवकर होणे आवश्यक ! गुन्हेगारांना पोलिसांचा वचक नसल्याचे द्योतक ! – संपादक)

नायब तहसीलदार गणेश सरोदे यांनी कागदपत्रांची योग्य पडताळणी न करताच नगरपालिकेला जन्माचे दाखले देण्याचे आदेश दिले. या आदेशानुसारच ९ जणांना दाखले देण्यात आले; मात्र किरीट सोमय्या यांनी तक्रार करताच तहसीलदार यांनीच कागदपत्रे योग्य नसल्याचे कारण देत ९ जणांचे दाखले रहित केले. गणेश सरोदे यांनी आदेश दिलेले सर्व २ सहस्र २७३ जन्म दाखले रहित करण्यात आले असून आणखी काही जन्म-मृत्यू दाखले रहित होण्याची शक्यता आहे. (कागदपत्रांची पडताळणी न करताच दाखले देणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवरही करवाई होणे अपेक्षित आहे ! – संपादक)