तिकिट कापलेल्या अण्णा बनसोडे यांना ‘गुप्त’ मार्गाने केले आमदार !

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोडले गुपित

डावीकडून अजित पवार आणि अण्णा बनसोडे

मुंबई, २७ मार्च (वार्ता.) – वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठांनी विधानसभेचे सदस्य अण्णा बनसोडे यांचे तिकीट कापले होते; परंतु मी रात्री २.३० वाजता गुपचूप जाऊन त्यांना पक्षाचा ‘एबी’ फॉर्म दिला आणि ते आमदार झाले, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीतील गुपित फोडले. महाराष्ट्र विधानसभेच्या २२ व्या उपाध्यक्षपदी पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीच्या निमित्ताने विधानसभेत अभिनंदनाच्या ठरावावर अजित पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, वर्ष २०१९ मध्ये अण्णा बनसोडे यांना पक्षाने तिकीट नाकारले होते. त्यांच्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्याचे तिकिट कापू नये, असा समुपदेश मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिला होता. तेव्हा त्यांनी माझ्या संमतीने सगळ्याच गोष्टी  होत नसल्याचे सांगितले. सुदैवाने माझ्याकडे २ अतिरिक्त एबी फॉर्म होते. मी रात्री २.३० वाजता अण्णा बनसोडे यांना एक्स्प्रेस हायवेजवळ बोलावून घेतले. तेथे त्यांना गुपचुप ‘एबी’ फॉर्म दिला. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष होते. त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले की, तुम्हाला काय करायचे ते करा; पण माझे नाव सांगू नका. पक्षाने घोषित केलेला अधिकृत उमेदवार सकाळी ११.३० वाजता फॉर्म भरायला पोचला; मात्र त्यांच्या आधीच अण्णांनी फॉर्म भरलेला होता. त्यामुळे अधिकृत उमेदवाराचे आवेदन स्वीकारण्यात आले नाही. त्या निवडणुकीत अण्णा बनसोडे १७ सहस्र मतांनी निवडून आले. आज ते उपाध्यक्ष झाले. माझे ऐकले, तर राजकारणात लाभ होतो.