
निपाणी (कर्नाटक) – कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापिठा’चा ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा नामविस्तार करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांनी आंदोलन छेडले असून या मागणीसाठी १७ मार्चला कोल्हापूर येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. या नामविस्तारास श्रीराम सेना यांचा पाठिंबा असून तो पूर्णत्वास जाईपर्यंत आम्ही हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समितीच्या समवेत आहोत, असे निवेदन श्रीराम सेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून निपाणी तहसिलदार कार्यालयात देण्यात आले. या प्रसंगी सर्वश्री प्रणव मानवी, विजय गोंधळी, अभिनंदन भोसले, बबन निर्मले, अमोल चेंडके, चारुदत्त पावले, दादू देवडकर, योगेश चौगुले, निगोंडा पाटील, अनिल बुडके, शंकर पाटील, संतोष मोरे, संतोष देवडकर, प्रशांत घोडके यांसह अन्य उपस्थित होते. निवेदन देतांना ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘भारतमाता की जय’, ‘जय श्रीराम जय जय श्रीराम’, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.