
मुंबई – राज्य सरकारने १ मेपर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्वतः पुढाकार घेऊन हे शिल्प हटवण्याची कारवाई करील, अशी चेतावणी संभाजी ब्रिगेडने दिली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी २ दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेद्वारे रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी त्यांच्या या मागणीला विरोध दर्शवला होता.
संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर म्हणाले की, आम्ही या प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. सरकार त्यांच्या भूमिकेला कोणता प्रतिसाद देते त्याची आम्ही वाट पहात आहोत. मराठा जोडो यात्रा संपल्यानतंर १ मे या दिवशी आम्ही स्वतः पुतळा काढण्यास जाणार आहे. त्यांनी या वेळी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनाही आव्हान दिले. ते वाघ्या कुत्र्याला ऐतिहासिक संदर्भ असल्याचा दावा करत आहेत; पण त्यांचा दावा आम्हाला मान्य नाही. त्यांनी आमच्यासमवेत चर्चेला यावे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे संभाजी ब्रिगेडने वर्ष २०११ मध्ये हा पुतळा हटवला होता; पण त्यानंतर धनगर समाजाने तो पुन्हा बसवला होता.