सावंतवाडी – तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शिरशिंगे गोठवे क्रमांक २ ते गोठवेवाडीपर्यंत मान्यता मिळालेल्या रस्त्याचे काम चालू करण्याविषयी, तसेच शिरशिंगे गावातील ३ वाड्यांतील विजेचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पर्यायी ११ केव्हीच्या वीजवाहिनीस मान्यता मिळण्यासाठी तात्काळ कार्यवाही न केल्यास बुधवारी, १ एप्रिल या दिवशी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याची चेतावणी शिरशिंगेचे माजी सरपंच सुरेश शिर्के आणि ग्रामस्थ यांनी सार्वजनिक बांधकाम खाते, सावंतवाडी पोलीस ठाणे, प्रांताधिकारी, तहसीलदार आणि महावितरण आस्थापन यांना दिले आहे.
‘शिरशिंगे गोठवे शाळा क्रमांक २ ते गोठवेवाडीपर्यंत जाणार्या रस्त्याच्या डांबरीकरणास मान्यता मिळूनही या रस्त्याचे काम प्रतीक्षेत आहे. सध्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहन चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे या धोकादायक रस्त्यावर अपघाताची शक्यता आहे. याविषयी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही संबंधित अधिकारी आणि ठेकेदार या रस्त्याचे काम करण्यास टाळाटाळ करत आहेत, तसेच शिरशिंगे येथील धरण क्षेत्राच्या वरच्या भागात गोठवेवाडी, परबवाडी, मळईवाडी या वाड्या येतात. या वाड्यांत जाणारी ११ केव्हीची वीजवाहिनी घनदाट जंगलातून जात असल्याने वेळोवेळी ती नादुरुस्त होते. पावसाळ्यात तर निश्चितपणे वीजपुरवठ्यावर परिणाम होतो. या तीन वाड्यांत साधारणपणे १ सहस्र लोकवस्ती आहे. त्यामुळे ही वीजवाहिनी धरण क्षेत्रात कायमस्वरूपात काढण्यात आलेल्या पर्यायी रस्त्याच्या बाजूने नेण्यात यावी. गेली अनेक वर्षे ही मागणी करूनही महावितरण आस्थापन याकडे दुर्लक्ष करत आहे’, असे निवेदनात म्हटले आहे.