राज्यातील ८० टक्के वाहने पर्यावरणपूरक करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

मुंबई – महाराष्ट्राला ‘इलेक्ट्रिक व्हेईकल मॅन्युफॅक्चरिंग नॅशनल कॅपिटल’ (इलेक्ट्रिक वाहनांची राष्ट्रीय राजधानी) करण्यात येणार आहे. राज्यात पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यासाठी पर्यावरणपूरक वाहनांचे धोरण आणण्यात आले आहे. राज्यातील ८० टक्के वाहने पर्यावरणपूरक करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली. आमदार उमा खापरे यांनी पुणे येथील पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी परिसरातील प्रदूषणाविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे पर्यावरणपूरक गाड्यांचे अतिविशाल प्रकल्प चालू करण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्र ‘ईव्ही मॅन्युफॅक्चरिंगचे नॅशनल कॅपिटल’ म्हणून नावारूपास येईल. राज्यात मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्थानके उभारण्यात येत आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये ३० लाख रुपयांहून अधिक किमतीच्या पर्यावरणपूरक वाहनांवर ६ टक्के कर आकारण्याचे घोषित करण्यात आले; परंतु हा कर मागे घेण्यात येईल. राज्यात डिझेल आणि पेट्रोल वरील वाहनांमुळे होणार्‍या प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे खासगी आणि सार्वजनिक वाहतूक पर्यावरणपूरक करण्यासाठी ठोस नियोजन केले जात आहे.’’

एस्.टी.च्या गाड्या अपारंपरिक इंधनावर परावर्तित करणार !

एस्.टी. महामंडळाच्या सर्व बसगाड्या टप्प्याटप्प्याने अपारंपरिक इंधनावर परावर्तित करण्यात येणार आहेत. एस्.टी.च्या बसेस ‘इलेक्ट्रिक’ आणि ‘एल्.एन्.जी.’ (द्रवीकृत नैसर्गिक वायू) इंधनावर चालू करण्याचे नियोजन आहे. एस्.टी महामंडळासाठी ५ सहस्र १५० इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येणार आहेत. यापैकी ४५० बसगाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. एस्.टी.च्या सध्याच्या बसगाड्या ‘एल्.एन्.जी.’मध्ये परावर्तित करण्यात येणार आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सर्व शासकीय गाड्या ‘पर्यावरणपूरक’ करणार !

सर्व शासकीय वाहनेही इलेक्ट्रिक करण्याचे शासनाचे धोरण आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आमदारांनाही देण्यात येणार्‍या वाहन कर्जावरील व्याज सवलतीही ईव्हीसाठीच देण्यात येतील. सर्व मंत्री यांची वाहनेही ईव्हीमध्ये पालटण्याचे शासनाचे नियोजन असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

वाहने पर्यावरणपूरक करणे या स्तुत्य प्रयत्नासह वाढते अपघात रोखण्यासाठीही प्रशासनाने प्रयत्न करावेत !