छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगलांना चितपट करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तरी आजही महाराष्ट्रातील गावांना औरंगाबाद, उस्मानाबाद अशी मोगलांची नावे दिली जातात, हे दुर्दैवच आहे. सर्वपक्षियांनी राजकारण न करता केवळ औरंगाबादच नव्हे, तर उस्मानाबाद, इस्लामपूर यांची नावे पालटून ती संभाजीनगर, धाराशिव, ईश्वरपूर अशी करण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने लढा द्यावा !
संभाजीनगर – आजवर शिवसेनेने केवळ राजकीय लाभासाठी संभाजीनगरच्या नामकरणाचा विषय समोर केला आहे. त्यामुळे ‘औरंगाबाद’चे ‘छत्रपती संभाजीनगर’ होत नाही. आता महानगरपालिका आणि राज्याच्या सत्तेच्या चाव्याही शिवसेनेकडे आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत. शिवसेनेने प्रजासत्ताकदिनापूर्वी औरंगाबादचे नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ करावे, अन्यथा येथून पुढे तुमच्या तोंडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करू नका. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मनसेसैनिक मनसे पद्धतीने औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करतील. त्याची चिंता शिवसेनेने करू नये, त्यासाठी मनसे खंबीर आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
सुहास दाशरथे पत्रकात पुढे म्हटले आहे की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवगर्जना करत वर्ष १९८८ मध्ये ‘औरंगाबाद’चे नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याची घोषणा केली होती. आता या घटनेला ३२ वर्षे होत आहेत. ही घोषणा प्रत्यक्षात यावी, अशी समस्त छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांची इच्छा आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही संभाजीनगरसाठी मोहीम चालू केली आहे.