गुढीपाडवा … नवसंकल्प दिन !

३० मार्च २०२५ या दिवशी गुढीपाडवा आहे. त्या निमित्ताने…

१. भारतीय कालगणना : ऋषिमुनींची जगाला देणगी

भारतीय सनातन हिंदु धर्माचे वैशिष्ट्य हे की, तो अनेकानेक विविधतेने नटलेला आहे. ज्ञान, विज्ञान, अध्यात्म, महाकाव्ये ही जागतिक दर्जाची आहेत. शौर्य, ६४ कला, रसिकता, निसर्ग वैविध्य, सहिष्णुता यांसाठी भारताला जगात मान आहे. योग, विविध खाद्य संस्कृती, भाषा वैविध्य, संस्कृत व्याकरण हे सर्व आपण ‘विश्वगुरु’ असल्याचे द्योतक आहे. वेद, उपनिषदे, पुराणे, औषधनिर्मिती, वस्त्र ते शस्त्र निर्मिती, खगोलशास्त्र आणि बरेच काही आमची राष्ट्रीय संपत्ती अन् वारसा आहे. त्यातील महत्त्वाचे म्हणजे आमच्या पुरातन सुवर्ण काळापासून मुळात अचूक कालगणना आणि खगोलशास्त्र ही ऋषिमुनींनी जगाला दिलेली प्राचीन अन् अमूल्य अशी देणगी आहे.

विवेक सिन्नरकर

त्या भारतीय कालगणनेमुळे सूर्यनारायण आणि त्याची ग्रहमाला यांचे अव्याहत चालणारे भ्रमण आजही अचूक कळते. तेच सूत्रबद्ध स्वरूपात ‘वार्षिक पंचांग’ या सर्व परिचित पुस्तकात आपल्याला मिळते. हिंदु पंचांग आणि दिनदर्शिका पूर्ण विज्ञाननिष्ठ असल्याचा आपल्याला अभिमान हवा. यातून आपल्या सृष्टीचे गूढ सोडवण्यास साहाय्य होते आणि प्रतिदिन सूर्योदय, सूर्यास्त यांची अचूक वेळही कळते. इतर सर्व ग्रहांचे स्थान नेमके आज कुठे आहे, हेही कळते. मुख्यतः दिनमान, मास, वर्ष आणि संवत्सर हे कळते. हे सर्व खगोलीय गणित आपल्या थोर ऋषिमुनींनी सूक्ष्म निरीक्षणातून नोंदवून ठेवले आहे. आधुनिक खगोलशास्त्रही ते मान्य करते.

२. समजून घेऊया विश्वगतीचे कालमान !

श्रीसूर्य सिद्धांत मताने जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय अखंड घडत असते. ब्रह्मा, विष्णु, महेश, सूर्य, चंद्र या देवता, तसेच मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू  हे ग्रह आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि राष्ट्रीय जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, स्थिरता अन् एकी प्रदान करत असतात. वर्षप्रतिपदेनिमित्त त्यांचे भ्रमण श्रद्धेने अभ्यासले, तर त्याची शुभ फळे मिळतात, असे हिंदु धर्मग्रंथ सांगतात. श्रीमद्भगवतगीतेमध्येसुद्धा ८ व्या अध्यायात अव्यक्त परमेश्वराचे ‘अक्षय निधान’ हे या वैश्विक कालचक्राचे पल्याड असल्याचे भगवंत सांगतात ! हे सांगतांना ते वैश्विक घोर कालचक्राचे मोजमाप मांडतांना अर्जुनास सांगतात, ‘सहस्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदुः । रात्रिं युगसहस्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ।।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ८, श्लोक १७  (अर्थ : ब्रह्मदेवाचा एक दिवस एक हजार चतुर्युगांचा असून रात्रही एक हजार चतुर्युगांची असते. जे योगी हे तत्त्वतः जाणतात, ते काळाचे स्वरूप जाणणारे होत.’

अशी चतुर्युगाची वर्षे मिळून अहोरात्र निर्मिती करणार्‍या सध्याच्या ब्रह्मदेवाचे आयुष्य १०० वर्षे आहे ! त्यातील ५० वर्षे झाली आहेत. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात १४ मनु होतात. त्यातील एकेका मनूच्या काळात ४३ लाख २० सहस्र मानवी वर्षे मोजली जातात. एकूण ७१ महायुगे होतात. सध्या ७ वे ‘वैवस्वत’ मन्वंतर चालू आहे. त्यातील २७ युगे संपून २८ वे महायुग चालू आहे. (‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा…’, ही विठ्ठलाची आरती आठवा.) या वैवस्वत मन्वंतरातील कृत, त्रेता, द्वापर संपून आता कलियुग चालू आहे. या कलियुगातील एकूण ४ लाख ३२ सहस्र वर्षांतून केवळ ५ सहस्र १२६ वर्षे संपली आहेत. ती ‘संवत्सरे’ म्हटली जातात आणि तीच आपली मानवी वर्षे !

३. हे वर्ष आहे ‘विश्वावसूनाम संवत्सर’

उद्या, ३० मार्च २०२५ या दिवशी गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर ‘विश्वावसूनाम’ संवत्सर प्रारंभ होते. वर्ष प्रतिपदा हा राष्ट्रीय सण आहे. एकूण ६० संवत्सरे असलेले ऋतूचक्र आहे. त्यातील हे ३९ वे संवत्सर आहे. याचे स्वागत करतांना जाणून घेऊ की, संवत्सर म्हणजे आपले एक वर्ष. संवत्सर हा महाकालाचा एक भाग मानला जातो. ‘सम्यक् वसन्ति मासादयाः अस्मिन् ।’, म्हणजे ‘ज्यात मास (महिना) आदी विभाग व्यवस्थित सामावतात. (त्याला संवत्सर असे म्हणतात.) याखेरीज गुरूच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेचा १/१२ अंश काळ म्हणजे एक संवत्सर होय. त्यालाच ‘शक’ म्हणतात. महाराष्ट्रात ‘श्रीमन नृप शालिवाहन शक १९४७ विश्वावसूनाम संवत्सर’, असे आगामी संवत्सराचे पूर्ण वर्णन आहे.

४. शालिवाहन शक आणि पंचांग वाचन

इसवी सनाच्या सध्याच्या वर्षाच्या संख्येमधून ७८ वजा केले की, शालिवाहन शकाची संख्या मिळतो. जसे २०२५ – ७८ = शके १९४७ असे मोजावे. चांद्र वर्षानुसार हा काळ सुमारे ३५४ दिवसांचा असतो. यास ‘चांद्र वर्ष’ असेही म्हणतात. गुढीपाडवा या दिवशी एक शक किंवा एक संवत्सर संपून दुसरे चालू होते. त्यात १२ मास आणि प्रत्येकी २ पक्ष असतात. १५ तिथी, ७ वार, २७ नक्षत्रे, विविध योग, विविध करण या ५ अंगांनी बनलेले कोष्टक, म्हणजे आजचे ‘पंचांग’ होते. पंचांग हे सर्व ग्रहांची आकाशातील दैनंदिन सद्यःस्थिती आणि स्थान दर्शवते. प्रत्येकाने प्रतिदिनी दैनंदिन ‘पंचांग’ ब्राह्म मुहूर्तावर अवश्य वाचावे. ‘त्याने पुण्य, आयुष्यवृद्धी आणि संकटांशी लढण्यास बळ मिळते’, असे धर्मग्रंथ सांगतात. सध्या प्रसारमाध्यमांवर दैनंदिन पंचांग उपलब्ध असते, ते वाचावे. तत्पूर्वी श्री गणेश, कुलदेवता, मातापिता आणि श्री सूर्यनारायण यांचे स्मरण करून वंदन करावे. सूर्यनारायण हे अव्यक्त परब्रह्माचे व्यक्त स्वरूप मानावे आणि त्यास अधिष्ठान मानून स्नान, अर्घ्य, देवपूजा, सर्व जपजाप्य करावे. सूर्य हे अखंड कर्मयोगीचे प्रतीक आहे. सर्वांशी समान वागून आणि समरस होऊन सृष्टीला फुलवण्याचे कार्य सूर्यनारायण करतात. ‘सूर्याप्रमाणे सर्वांनी कर्मयोगाचे आचरण करून प्रगती करावी’, हा धर्माचा संदेश आहे. ‘सूर्यदेवतेला निष्काम भावनेने अर्पण केलेले ते कर्म अव्यक्त परब्रह्मापर्यंत पोचते’, अशी आध्यात्मिक धारणा आहे. या वर्ष प्रतिपदेपासून प्रत्येकाने अशी उपासना स्वतःसह राष्ट्रासाठी करावी.

५. गुढीची विजयगाथा

गुढी उभारणे, ही मुख्यत्वे महाराष्ट्रातील प्रथा आहे. अर्थात् प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा जपून वर्षाचा हा प्रथम दिवस तेथे साजरा केला जातो. गुढीला ‘धर्मध्वज’ही म्हणतात. गुढी ही तोरणे लावून विजयी मिरवणुका काढण्याची आणि राजाचे स्वागत करण्याची आपली परंपरा आहे. वर्ष प्रतिपदा आणि वार्षिक कालगणना ही सृष्टीच्या निर्मितीसह ब्रह्मदेवांनी चालू केली; म्हणून गुढीला ‘ब्रह्मध्वज’ही म्हटले जाते. परंपरेप्रमाणे यात ‘कळक’, म्हणजे एक प्रकारच्या बांबूची उंच काठी असते. त्याची पूजा करून वर्ष चालू होण्याच्या आदल्या दिवशी भूमीत रोवून तिची स्थापना केली जात असे. ‘पाडवा’ याचा अर्थ शुभ आरंभ. पाडव्याला त्या उंच बांबूची पूजा करून त्याच्यावर रेशमी वस्त्र, कडुनिंब डहाळी, आंब्याची डहाळी, साखर गाठी आणि कलश अर्पण करून त्याची विधीवत् पूजा करावी. नववर्षाचा आरंभ असा केल्यास सुख, समृद्धी, संरक्षण आणि देवराज इंद्रांसह सर्व देवीदेवतांचे आशीर्वाद मिळतात, अशी धार्मिक धारणा आहे. त्रेतायुगात प्रभु श्रीरामचंद्र यांनी रावणाचा वध करून स्वपराक्रमाने सीतामातेला सोडवून तिच्यासह अयोध्येत प्रवेश केला, तो दिवस वर्ष प्रतिपदा होता. त्या वेळी त्या पराक्रमाच्या स्मरणार्थ विजयगाथेसाठी गुढ्या उभारल्याचे सांगितले जाते.

६. गुढीचे पौराणिक संदर्भ 

‘महाभारत’ ग्रंथात आदी पर्वातील अंशावतरण पर्वातील ६३ व्या अध्यायात गुढीचा लेखी संदर्भ आहे. महाभारत काळात पुरुवंशातील थोर राजा आणि मुनी असलेला ‘उपरिचर’ हा कल्याणकारी राजा होता. त्याने तपश्चर्येने इंद्रदेवाला प्रसन्न केले. त्यांनी राजाला तप सोडून राजधर्माचे पालन करण्याचा आदेश दिला. राजाचा सन्मान केला. पृथ्वीचे मोठे राज्य दिले. त्याला ‘पृथ्वीवरील इंद्र’ असे संबोधिले. त्याच्याशी मैत्रीचा हात पुढे केला. त्याला आकाशात फिरण्यासाठी एक विमान, शस्त्रांपासून संरक्षणासाठी एक न कोमेजणारी वैजयंतीमाला दिली. याखेरीज श्रेष्ठ पुरुषांचा रक्षक असा एक कळकाचा उंच बांबू दिला. बांबू हे कधी न संपुष्टात येणारे झाड आहे. अक्षय्यतेचे प्रतीक आहे. राजाने ती उंच छडी जमिनीत रोवून ठेवली आणि दुसर्‍या दिवशी ती उंच छडी किंवा बांबू उंच ठिकाणी ठेवून नववर्षाला त्याला वस्त्र, हार, माळा घालून त्याची आणि इंद्रदेवाची स्थापना करून विधीवत् पूजा केली. इंद्रदेवाने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला, ‘उपरिचर राजाप्रमाणे कुणीही व्यक्ती किंवा राजे माझी अशी वर्षप्रतिपदेला गुढी उभारून पूजा करतील, उत्सव करतील त्यांना आणि त्यांच्या राष्ट्राला धनधान्य, अष्टलक्ष्मी अन् विजय मिळत राहील. याने सर्व जनता प्रगती करील आणि राजावर प्रसन्न राहील.’ यातूनच पुढे पांडवांनी, राजे-महाराज यांनी गुढ्या उभारल्या. त्याचा प्रसार देशात सर्वत्र झाला. थोरांपासून सामान्य नागरिकांनी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्याची परंपरा पुरातन काळापासून आहे आणि ही परंपरा आजही मोठ्या जोमाने पाळली जाते. याखेरीज शोभायात्रा काढल्या जातात. अशा परंपरा हीच आपली भारतीय संस्कृती आहे. यामध्ये सर्व जातीपाती, गरीब, श्रीमंत आपापल्या घरांवर उंच गुढी उभारतात. मुळात जो उंच बांबू आहे त्याचे पूजन करावे. तो बांबू धर्मदंडाचे प्रतीक आहे.

७. नव्या पालवीचे करूया स्वागत !

वर्ष प्रतिपदेला चैत्र मासामध्ये वसंत ऋतू हा वसंत संपात या खगोलीय स्थितीत येतो. विषुववृत्त आणि क्रांतीवृत्त वर्तुळे एकमेकांना छेद देतात, तेव्हा वसंत ऋतू बहरतो. ‘ऋतूनां कुसुमाकरः ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक ३५) म्हणजे ‘(मी) ऋतूंतील वसंत ऋतू आहे’ असे भगवंत गीतेतील दहाव्या अध्यायात वसंत ऋतूला स्वतःची एक विभूती म्हणून सन्मानित करतात. जुनी पाने गळतात. वठलेल्या झाडांना पालवी फुलते. वसंत ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते. सुगंधी फुलांचा सुवास दरवळतो. निसर्ग पुन्हा फुलू लागतो. जुने गळून जाते. त्याचे दुःख न करता नव्या पालवीचे स्वागत करावे. जीवनातही नव्याचे स्वागत करावे. युवा पिढीला प्रोत्साहन द्यावे. ‘राग, द्वेष, कर्मठपणा,  भेदाभेद यांची पाने गळू दे. नवे विचार, नव्या संकल्पना आत्मसात करूया.’ भारतीय संस्कृती ही सर्वसमावेशक आहे. आपण खरे संस्कृतीचे शिलेदार होऊ या. संस्कृतीला नवे पैलू पाडून विश्वाला गवसणी घालूया.

८. वर्ष प्रतिपदा : नाविन्याचे स्वागत

कवी केशवसुतांच्या शब्दात निसर्ग संकेत देतो, ‘जुने जाऊद्या मरणा लागून, जाळून किंवा पुरुनी टाका. प्राप्तकाल हा विशाल भूधर. सुंदर लेणी तयात खोदा. निजनामे त्यावरती नोंदा. बसुनी का वाढविता मेदा ? विक्रम काही करा, चला तर ! घातक भलत्या प्रतिबंधांवर. हल्ला नेण्या करा त्वरा रे ! उन्न्तीचा ध्वज उंच धरा रे ! विरांनो ! तर पुढे सरा रे. आवेशाने गर्जत हर-हर ! पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर. तुंबळ संग्रामाला करिती. संप्रति दानव फार माजती.  देवावर झेंडा मिरवीती !  देवांच्या मदतीस चला तर ! एक तुतारी द्या मज आणुनि. फुंकिन मी जी स्वप्राणाने…!’

नवी पालवी आपल्या प्रतिभेला येऊ दे. नवसंकल्प करून आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घ्यावी. नवनवे उपक्रम चालू करण्यासाठी गुढीपाडवा हा संकल्प दिन आहे. आपण नवे उन्मेष आणि नव्या प्रागतिक कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा गुढीपाडवा हा शुभ दिन आहे. शिक्षण आणि संस्कृती, प्रेम अन् सुरक्षा, बलसाधना आणि सामाजिक समरसता, समता अन् बंधूभाव, विश्वास आणि स्त्री दाक्षिण्य, विविधता अन् एकात्मता यांची गुढी आपण देशात उभी करूया. देशसेवेचा वाटा उचलूया. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! पुढे येणार्‍या रामनवमीच्या शुभेच्छा !!

लेखक : श्री. विवेक प्रभाकर सिन्नरकर, बी. आर्च., स्तंभलेखक, पुणे. (२७.३.२०२५)