गुरुकृपायोगानुसार साधना ही ज्ञानयोग-भक्तीयोग-कर्मयोग यांचा अपूर्व संगम ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

कोल्हापूर येथील आयोजित केलेल्या सत्संग सोहळ्यात २३८ जिज्ञासूंचा सहभाग

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

कोल्हापूर, २० डिसेंबर (वार्ता.) – साधना करत असतांना ती भावपूर्ण आणि मनापासून करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. साधनेत जलदगतीने प्रगती होण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवणे अत्यावश्यक आहे. गुरुकृपायोगानुसार साधना ही ज्ञानयोग-भक्तीयोग आणि कर्मयोग यांचा अपूर्व संगम आहे. गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास जलद आध्यात्मिक उन्नती होते, असे चैतन्यमय मार्गदर्शन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

कोल्हापूर जिल्ह्यात गेले ८ मास सनातन संस्थेच्या माध्यमातून विविध साधना सत्संग घेतले जात आहेत. या सत्संगांच्या माध्यमातून जोडलेल्या जिज्ञासूंना साधनेची पुढची दिशा मिळावी, यासाठी १९ डिसेंबर या दिवशी एका ऑनलाईन सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या सोहळ्यासाठी २३८ जिज्ञासू उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ. मेघमाला जोशी यांनी केले.

१. प्रारंभी सत्संग सोहळ्याचा उद्देश हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी सांगितला, तर सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांच्या अद्वितीय कार्याचा परिचय श्री. अमोल कुलकर्णी यांनी करून दिला.

२. साधनेला प्रारंभ केल्यावर आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव जिज्ञासूंनी सांगितले. अनेक जिज्ञासूंनी साधना करत असतांना अनुभवलेले ईश्‍वराचे साहाय्य आणि त्या संदर्भात आलेल्या अनुभूती यांविषयी कथन केले.

विशेष –

• या सत्संग सोहळ्यात उपस्थित जिज्ञासूंनी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनाचा भावाच्या स्तरावर लाभ घेतला.
• काही जिज्ञासूंनी स्वभावादोष आणि अहं निर्मूलन यांसाठी प्रयत्न केल्यामुळे तणाव न्यून होऊन जीवन आनंदी झाल्याचे सांगितले.

सोहळ्यानंतर जिज्ञासूंनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया . . .

१. सौ. मीना खाडे – आजचा सत्संग सोहळा भावस्पर्शी होता. साधनेच्या अनुभवाचे बोल ऐकून आत्मिक आनंद मिळाला. संतांच्या संगतीत राहून अमृताचा वर्षाव झाल्यासारखे वाटले. ‘गुरुकृपेने झाले साधक गोळा । संपन्न झाला सत्संग सोहळा ॥’

२. सौ. माधुरी पलसकर – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन मनापर्यंत पोचले. आपले प्रयत्न अल्प पडत आहेत, हे लक्षात आले आणि आणखी प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळाली.

३. श्री. अश्‍विन पाटील – मानवी जीवन सहज आणि सुंदर जगण्यासाठी आध्यात्मिक जीवन किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात आले. परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांचे कार्य किती अतुलनीय आणि व्यापक आहे, हे लक्षात आले.

४. सौ. माया पाटील – आपण मनापासून साधना केली, तर देव आपल्याला नक्की साहाय्य करतो, हे शिकायला मिळाले. नामजप करून कोणत्याही संकटातून आपण तरून जाऊ शकतो, हे समजले.

५. श्री. संपत डांगे, शिरोली, कोल्हापूर – असे सत्संग सगळीकडे व्हायला पाहिजेत. पुष्कळ प्रसार व्हायला पाहिजे.

६. सौ. सीमा पाटील, कोल्हापूर – कुलदेवतेच्या नामजपाविषयी माहिती ऐकतांना श्री भवानीदेवी आणि जोतिबा यांची मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहिली. सर्वांच्या अनुभूती ऐकून चांगले वाटले आणि मलाही तशी अनुभूती घेता आली. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनाने योग्य मार्ग मिळाला, याची जाणीव झाली.

७. अरुणा झुरे – बाहेर पैसे देऊनही मिळणार नाही, इतकी चांगली माहिती सोहळ्याच्या माध्यमातून समजली. विनामूल्य असलेले हे ज्ञान अनमोल आहे. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन ऐकतांना भावाश्रू येत होते.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक