देहलीमध्ये चकमकीनंतर ५ जिहादी आणि खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक

जिहादी आणि खलिस्तानी यांची ही युती देहली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनातही दिसून येत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे देहलीतच या आतंकवाद्यांना अटक होणे यामागे काही कारण आहे का ? याचेही अन्वेषण केंद्र सरकारने करावे !

नवी देहली – येथील शकरपूर परिसरात पोलीस आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी ५ आतंकवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि अन्य साहित्य जप्त केले. अटक केलेल्या आतंकवाद्यांमध्ये २ जण हे पंजाब आणि ३ जण काश्मीरमधील आहेत. ते आय.एस्.आय.च्या सांगण्यावरून कारवाया करत होते. पंजाबच्या गुरदासपूर येथील रहाणारे गुरजीत सिंह आणि सुखदीप सिंह या खलिस्तानी, तसेच जम्मू-काश्मीरमधील अयूब पठान, शब्बीर अहमद आणि रियाज या जिहादी आतंकवाद्यांचा यात समावेश आहे. ‘या सर्व आतंकवाद्यांना आय.एस्.आय.चा पाठिंबा होता’, अशी माहिती देहली पोलिसांनी दिली. ते कोणत्या आतंकवादी संघटनेशी संबंधित आहेत, याची माहिती अद्याप मिळालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

या आतंकवाद्यांच्या चौकशीत त्यांनी सांगितले की, सुख बिखरीवाल नावाचा पसार आतंकवादी पाकमधून आय.एस्.आय.च्या सांगण्यावरून खलिस्तानी आतंकवाद्यांद्वारे पंजाबमध्ये हत्या घडवून आणत आहे. यासाठी स्थानिक गुंडांचेही साहाय्य घेतले जात आहे. काही आठवड्यांपूर्वी त्याने बलविंदर सिंह संधु या शौर्यचक्र पुरस्कार विजेत्याची हत्या केली होती. खलिस्तानी आतंकवाद्यांचे आखाती देशांतील सुखमीत नावाच्या आणि अन्य गुंडांशी संबंध आहेत. तो आय.एस्.आय.शी संबध ठेवून आहे.