जे.एन्.यू.ची माजी विद्यार्थिनी शेहला रशीद हिचा देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग ! – शेहला रशीदच्या वडिलांचा आरोप

जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांना पत्र

  • पोलिसांनी या आरोपाचे सखोल अन्वेषण करावे; कारण जेएनयूमधील साम्यवादी विचारांच्या विद्यार्थ्यांना आणि नेत्यांपैकी काही जणांना अशाच प्रकरणांत अटक करण्यात आलेली आहे. स्वतः वडीलच मुलीविषयी असा आरोप करत असतील, तर तो अधिक गंभीर आहे !
  • स्वतःच्या मुलीविषयी अशा प्रकारची माहिती सार्वजनिक करण्याची ही दुर्मिळच घटना होय ! शेहला यांच्या वडिलांचे कौतुक करावे तितके अल्पच आहे !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – देहलीतील जवाहरलाल नेहरु विश्‍वविद्यालयाची (जे.एन्.यू.ची) माजी विद्यार्थी नेता शेहला रशीद हिच्यावर तिच्याच वडिलांनी म्हणजे अब्दुल रशीद शौरा यांनी देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे. यासाठी तिला कोट्यवधी रुपये मिळत असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून त्यांनी केली आहे. तसेच ‘शेहलापासून माझ्या जिवाला धोका आहे’, असा दावा करत सुरक्षा पुरवण्याची मागणी त्यांनी यात केली आहे. या पत्रात त्यांनी शेहला समवेत पत्नी झुबैदा, मोठी मुलगी आसमा रशीद आणि पोलीस खात्यामधील साकीब अहमद या शिपाई यांच्यावरही देशविरोधी कारवायांत हात असल्याचा आरोप केला आहे. ‘जम्मू-कश्मीर पीपल्स मूव्हमेंट’ पक्षामध्ये सहभागी होण्यापूर्वी शेहलाने एका उद्योजकांकडून ३ कोटी रुपये घेतले, असाही दावा त्यांनी केला आहे.

१. ‘सप्टेंबर २०१९ मध्ये सैन्याने नागरिकांचा छळ करून काश्मीर खोर्‍यातील घरे लुटली’, असे ट्वीट केल्याच्या प्रकरणी शेहला यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता शेहला यांच्या वडिलांनीच तिच्यावर देशविरोधी कारवायांचा आरोप केला आहे.

(सौजन्य : ThePrint)

२. अब्दुल रशीद यांनी म्हटले की, वर्ष २०१७ मध्ये माझी मुलगी अचानक राजकारणात आली. ती प्रथम नॅनाल कॉन्फरन्समध्ये होती. त्यानंतर ती ‘जेकेपीएम्’मध्ये सहभागी झाली. आतंकवाद्यांना अर्थ पुरवठ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले  इंजिनियर रशीद आणि जुहूर वटाली यांनी शेहला हिला त्यांच्या पक्षात येण्यासाठी ३ कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. जून २०१७ मध्ये या दोघांनी मलाही त्यांच्या श्रीनगर येथील घरी बोलावले होते. त्यात त्यांनी ते नवीन पक्ष स्थापन करत असून माझ्या मुलीला त्यात सहभागी होण्यास सांगत होते. त्यांनी त्याच वेळी मला ३ कोटी रुपये देण्याची सिद्धता दर्शवली होती. मी नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी शेहलाशी संपर्क केला होता. शेहला हिला देण्यात येणारे पैसे चुकीच्या मार्गाने आले असून त्याचा वापरही अयोग्य ठिकाणीच होत आहे. यानंतर माझी मुलगी त्यांच्या समवेत काम करू लागली. मी तिला काम करू नको, असे सांगूनही तिने पैसे घेतले आणि मला गप्प रहाण्यास सांगितले.

शेहला रशीद यांनी आरोप फेटाळले !

वडिलांच्या आरोपानंतर शेहला यांनी एक पोस्ट ट्वीट करून शेअर केली आहे. ‘तुमच्यापैकी अनेकांनी माझ्या वडिलांनी माझ्यासमवेत बहिणीवर केलेल्या आरोपांचा व्हिडिओ पाहिला असेल. अगदी थोडक्यात सांगायचेच झाल्यास माझे वडील म्हणजे महिलांना मारहाण करणारे, शिव्या देणारे आणि निराश व्यक्ती आहेत. आम्ही त्यांच्या या वागण्याविरोधात आवाज उठवला आणि त्यांनी नंतर प्रसिद्धीसाठी हा स्टंट केला आहे. त्यांच्याविरोधात कौटुंबिक न्यायालयात गुन्हाही प्रविष्ट आहे. त्याचाच सूड घेण्यासाठी त्यांनी हा आरोप केला आहे. मला समजायला लागल्यापासून माझे वडील आमच्याशी अशा पद्धतीने वागायचे. (हे सत्य आहे, असे गृहीत जरी धरले, तरी शेहला यांच्या वडिलांनी केलेल्या आरोपांवर शेहला यांनी कोणतीच टिपणी केलेली नाही, हेही तितकेच सत्य आहे. शेहला यांनी जरी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना बगल दिलेली असली, तरी शेहला यांच्या विरोधात करण्यात आलेल्या सर्व आरोपांचे जम्मू-काश्मीर प्रशासन आणि केंद्र सरकार यांनी अन्वेषण करणे आवश्यक आहे. – संपादक)

अब्दुल रशीद शौरा यांना ऑक्टोबर मासापासून श्रीनगरच्या मुन्सिफ न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणात घरी जाण्यापासून रोखले आहे.