साईबाबा मंदिर (गोडोली) परिसरातील अतिक्रमणे हटवली

अतिक्रमण हटवतांना नगरपालिकेचे कर्मचारी

सातारा, २५ मार्च (वार्ता.) – येथील गोडोली परिसरातील साईबाबा मंदिर जवळची अतिक्रमणे सातारा नगरपालिकेने हटवली. या वेळी पालिका कर्मचारी आणि विक्रेते यांच्यामध्ये किरकोळ वादावादी झाली. शासकीय कामात अडथळा आणला, तर कारवाई करू, अशी चेतावणी पालिका कर्मचार्‍यांनी दिल्यामुळे विक्रेत्यांचा सूर मावळला. पालिकेने येथील ८ अतिक्रमणे हटवली असून यापुढेही परिसरातील कारवाई चालू रहाणार आहे, अशी माहिती ‘अतिक्रमण हटाव विभागा’चे प्रमुख अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांनी दिली.

गोडोली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अजय पार्टी यांनी या अतिक्रमणाविषयी सातारा नगरपालिकेकडे तक्रार करत आंदोलनाची चेतावणी दिली होती, तसेच गोडोली चौक ते अण्णासाहेब कल्याणी विद्यालय या मार्गावरील अतिक्रमण हटवण्यासाठी वारंवार लोकशाहीदिनामधून तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. या तक्रारींची नोंद घेत सातारा नगरपालिकेने २४ मार्च या दिवशी सकाळी कारवाईला प्रारंभ केला.

आमच्याकडून पावत्या कशाच्या घेतात ?

आम्ही भर उन्हामध्ये दिवसभर काबाड कष्ट करून आमची उपजीविका चालवतो. प्रतिदिन आम्ही या जागेचा पावती रूपाने कर नगरपालिकेला देत असतो. नगरपालिकेने कोणतीही लेखी पूर्वसूचना न देता थेट आमच्यावर धडक कारवाई केली आहे. सर्वच विक्रेत्यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सहस्रो रुपयांचा माल दुकानात भरला आहे. या कारवाईमुळे विक्रेत्यांची मोठी आर्थिक हानी होणार आहे. याविषयी नगरपालिका प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. आम्ही जर अतिक्रमण केले आहे, तर नगरपालिका कर्मचारी आमच्याकडून पावत्या कशाच्या घेतात ? असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे.