कुर्टी, फोंडा येथील संतप्त ग्रामस्थांनी गावातील धर्मांतराचे प्रयत्न हाणून पाडले

बंदी घातलेल्या ‘बिलिव्हर्स’च्या धर्मांतराच्या कारवायांना पुन्हा प्रारंभ

फोंडा, २५ मार्च (वार्ता.) – गोवा सरकारने बंदी घातलेल्या ‘बिलिव्हर्स’च्या कारवायांना राज्यात पुन्हा प्रारंभ झाला आहे. कुर्टी, फोंडा येथे २५ मार्च या दिवशी ‘बिलिव्हर्स’च्या धर्मांतराच्या कारवाया संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बंद पाडल्या. धर्मांतराच्या या घटनेवरून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार ‘बिलिव्हर्स’च्या प्रभावामुळे धर्मांतरित झालेला एक हिंदु गावातील एका हिंदूच्या घरात धर्मांतर करण्यासाठी आला होता. गावातील लोकांना याविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीवर प्रश्नांचा भडिमार केला. ग्रामस्थांनी ‘कुठल्या देवाचा तू प्रचार करतोस ?’, असे त्याला विचारले. संबंधित व्यक्तीने ‘आम्हाला जन्माला घातलेला जेझू आणि पवित्र आत्मा म्हणजे परमेश्वर याचा प्रचार करतो’, असे सांगितले. ग्रामस्थांनी ‘तू हिंदु असूनही जेझूचा प्रचार का करतो ?’, असा प्रश्न केला आणि ‘आम्हाला असे प्रकार गावात नकोत’, असे त्याला ठळकावून सांगितले. वास्तविक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने ४ वर्षांपूर्वी ‘बिलिव्हर्स’चे प्रास्टर डॉम्निक आणि ‘बिलिव्हर्स’च्या शिवोली येथील फाईव्ह पिलर्स चर्चचे इतर सदस्य यांच्या विरोधात कारवाई केली होती आणि धर्मांतराच्या कारवाया बंद करण्याची अटही त्यांच्यावर घालण्यात आली होती. पुढे काही काळ बंद असलेले हे प्रकार आता पुन्हा गावस्तरावर चालू होऊ लागले आहेत.

संपादकीय भूमिका

‘बिलिव्हर्स’च्या अशा कारवायांमुळे गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडते !