दाभोली गावातील काही शेतकर्यांचे पालकमंत्री, पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांना निवेदन

वेंगुर्ला – कुटुंबाच्या सामायिक भूमीत अवैधरित्या अतिक्रमण करून ठार मारण्याची धमकी देणार्या शेख नामक मुसलमानावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील दाभोली येथील काही शेतकर्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,
१. दाभोली येथील भूमापन आणि उपविभाग क्रमांक ‘७८/१, ७९/९/१०/११ अ, ७९/९/१०/११ ब,७९/९/१०/११ क’ असलेल्या भूमी आमच्या सामायिक स्वरूपाच्या आहेत. या भूमी आम्ही कुणालाही विकलेल्या नाहीत.
२. असे असूनही शेख नामक व्यक्तीने अनुमाने ४० ते ५० लोकांचा समुदाय करून आमची दाभोली येथील सामायिक भूमी कह्यात घेण्याचा (भूसंपादन करण्याचा) प्रयत्न केला आहे.
३. याविषयी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी आम्हाला जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे. या भूमीत गेल्या दीड ते २ वर्षांमध्ये अवैधरित्या भूमीच्या विक्रीचे व्यवहार झालेले आहेत.
४. यामध्ये भूमी खरेदी-विक्रीच्या अवैध व्यवहारासाठी चर्चेत असणार्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका डॉक्टरचा आणि अन्य एका व्यावसायिकाचा हात आहे. हे दोघे दाभोली गावातील बेरोजगारीच्या समस्येचा लाभ घेऊन येथील लोकांना आर्थिक आमिषे दाखवून तरुणपिढीला दलालीच्या जाळ्यात ओढत आहेत.
५. देशामध्ये सामाजिक तेढ निर्माण होण्याचे प्रकार वाढत असतांनाच आमच्या दाभोली गावामध्ये देखील अशाच प्रकारे समाजात तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीने या दलाल डॉक्टराचे कारनामे चालू आहेत.
६. दाभोली गावातील भूमी अन्य समाजाला अवैधरित्या विकून गावात तेढ निर्माण करणारे संबंधित दलाल डॉक्टर, सहहिस्सेदार आणि स्थानिक दलाल यांना आवर घालण्यात यावा.
७. स्थानिक शेतकरी कुटुंबाच्या भूमीत अतिक्रमण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली जात आहे, ही गोष्ट गंभीर असून आम्हा शेतकर्यांना धमकी देणार्या शेख नामक व्यक्तीबरोबर मोठ्या संख्येने आलेल्या लोकांवर कायदेशीर कारवाई करून न्याय द्यावा.