गनिमी काव्याने टाळे ठोकणारच ! – ‘संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान’ची चेतावणी
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला टाळे लावण्यासाठी मुंबई येथून निघालेले ‘छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान’चे प्रमुख श्री. बाळराजे आवारे यांना पोलिसांनी समृद्धी महामार्गावर अजिंठा इंटरचेंज येथे रोखले आणि त्यांची जिल्ह्याबाहेर रवानगी केली. आवारे यांच्या समर्थक राजश्री उंबरे यांना पोलिसांनी कुंभेफळ येथे नजरकैदेत ठेवले होते.
कबरीला टाळे लावण्याची मागणी काही दिवसांपूर्वी श्री. बाळराजे आवारे यांनी केली होती. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशाने त्यांना जिल्हाबंदी करण्यात आली होती. तरीही त्यांनी मुंबई येथून खुलताबाद येथे कबरीला टाळे लावण्यासाठी निघाले असता ग्रामीण पोलिसांनी त्यांना समृद्धी महामार्गावरील अजिंठा इंटरचेंज येथे अडवले. तेथे पोलीस आणि श्री. आवारे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना जिल्ह्याच्या क्षेत्राबाहेर नेत सोडून दिले.
आम्ही कबरीला टाळे लावल्याविना स्वस्थ बसणार नाही !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसास्थळाचे संरक्षण करायचे सोडून सरकार औरंगजेबाच्या कबरीचे संरक्षण करत आहे. ज्याने क्रूरतेचा कळस गाठला, त्याची कबर या ठिकाणी असण्याचे आणि त्यास इतके संरक्षण देण्याची काहीही आवश्यकता नाही. आम्ही कबरीला टाळे लावल्याविना स्वस्थ बसणार नाही. आम्ही गनिमी कावा करून कबरीला टाळे लावणार आहोत.
– राजश्री उंबरे पाटील, सदस्य, छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान