पाली सुधागड येथे ‘एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !

मोहिमेत सहभागी धर्मप्रेमी युवा वर्ग

रायगड – ‘एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सान्निध्यात’ या मोहिमेअंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार २३ मार्च या दिवशी रायगडच्या पाली येथील सुधागड येथे मोहीम पार पडली. यात ३७ जणांनी सहभाग घेतला. पनवेल, खोपोली, पेण आणि वर्‍हाड येथील धर्मशिक्षणवर्ग, हिंदु जनजागृती समितीची शाखा, स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग आणि युवा सत्संगातील युवक सहभागी झाले होते.

हिंदु जनजागृती समितीच्या वर्‍हाड गावातील शाखा विस्तारक श्री. रोशन खंडागळे आणि श्री. हर्षल खंडागळे यांनी सर्वांना गडाची माहिती दिली. तेथील महादेव मंदिर, श्री भोराईमाता मंदिर, श्री हनुमान मंदिर या परिसरात वाढलेले गवत, खराब आणि निर्माल्ययोग्य झालेले ध्वज, तसेच प्लास्टिक कचरा उचलून आणि पत्रे यांची योग्य रचना करून स्वच्छता करण्यात आली. आपत्कालीन प्रशिक्षण देण्यात आले. सामूहिक नामजप करण्यात आला. त्यानंतर श्री. हर्षल खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे औक्षण करण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटिबद्ध रहाण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. सहभागी युवांना समितीचे श्री. सुनील कदम यांनी राष्ट्र-धर्म कार्यार्थ संबोधित केले.

क्षणचित्र – गडावरील महादेव मंदिरात देवाचे अस्तित्व अनुभवता येण्यासाठी प्रार्थना केल्यावर वादळ यावे, त्याप्रमाणे जोरात वारा आला. या वेळी प्रार्थनेतील सामर्थ्य अनुभवता आले.

अभिप्राय

१. कु. वेदांत आगिवले (वय ११ वर्षे), खोपोली – मावळे हा गड कसे चढले-उतरले असतील, या विचारामुळे मला प्रोत्साहन मिळत होते.

२. श्री. प्रशांत लिंगायत, पनवेल – या मोहिमेच्या नियोजनात अनेक गोष्टी शिकता आल्या. लहान वयातील मुले गड चढतील का ? असे वाटत होते; पण सगळेजण नामजप करत घोषणा देत गड चढत होते.

३. श्री. हर्षल खंडागळे, वर्‍हाड – समितीच्या कार्यात सहभागी झाल्यापासून मला माझा वाढदिवस धर्मकार्यामध्ये सेवा करतांना साजरा करायचा होता. या मोहिमेत वाढदिवस साजरा झाला.

४. श्री. रोशन खंडागळे – गावातील मुलांसह मला कधीच गड संवर्धनाला जाण्याची इच्छा होत नाही; पण समितीच्या मोहिमेत आवर्जून सहभागी व्हावेसे वाटते.

५. श्री. हितेश पडवळ, खोपोली – शनिवार, रविवार मी सुटीत वेळ वाया घालवायचो; पण आता मी अधिकाधिक वेळ समितीच्या कार्यामध्ये व्यतीत करतो.

श्री भोराई मातेच्या मंदिराच्या पुजार्‍यांचा अभिप्राय

गडावर अनेक गड संवर्धन करणार्‍या संघटना येत असतात; पण समितीच्या राष्ट्र-धर्म कार्यकर्त्यांप्रमाणे युवासेना पाहिली नव्हती. त्यांना सर्वांना पाहून पुष्कळ आनंद झाला. तुमच्या गुरूंनी दिलेली शिकवण चांगली आहे. अशा प्रकारचा धर्माचे कार्य करणारे लोक आज समाजात हवे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पाळणारे शिवभक्त कलियुगात आहेत, हे पाहून चांगले वाटले !