MP Salary Hike : महागाई निर्देशांकाच्या आधारे खासदारांच्या वेतनात २४ टक्के वाढ !

प्रत्येक खासदाराला आता १ लाख २४ सहस्र रुपये वेतन मिळणार

नवी देहली – देशाच्या संसदेतील म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांच्या आजी, तसेच माजी खासदारांचे वेतन आणि निवृत्तीवेतन यांत २४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. या संदर्भात सरकारकडून अधिसूचना प्रसारित करण्यात आली आहे. यामुळे या सदस्यांना प्रतिमहा १ लाखाऐवजी १ लाख २४ सहस्र रुपये वेतन मिळेल. दैनंदिन भत्ताही अडीच सहस्र रुपये मिळणार आहे. माजी खासदारांचे निवृत्ती वेतन प्रतिमहा २५ सहस्रांवरून ३१ सहस्र रुपये करण्यात आले आहे. (सर्वसामान्य व्यक्ती ३० ते ३५ वर्षे सरकारी नोकरी केल्यानंतर त्याला इतके निवृत्ती वेतन मिळते, तर केवळ ५ वर्षांसाठी खासदार झालेल्यांना इतके निवृत्ती वेतन कशासाठी ? – संपादक) यापूर्वी एप्रिल २०१८ मध्ये खासदारांसाठी वेतन आणि भत्तावाढ करण्यात आली होती.

सध्या असणार्‍या खासदारांना मतदारसंघातील खर्चासाठी प्रतिमहा ७० सहस्र रुपये, कार्यालयीन भत्ता ६० सहस्र रुपये, तसेच संसदेच्या अधिवेशनाच्या काळात दैनंदिन भत्ता २ सहस्र रुपये दिला जातो. या भत्त्यामध्येही वाढ केली जाणार आहे. खासदारांना देहलीमध्ये सरकारी निवासस्थान दिले जाते. यात त्यांना ५० सहस्र युनिट वीज आणि ४ सहस्र लिटर पाणी विनामूल्य दिले जाते. (पाणी आणि वीज यांचा अनावश्यक वापर केला जात आहे का ? यावर लक्ष ठेवले जाते का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

ज्या प्रकारे खासदारांच्या वेतन दिले जाते आणि त्यात नंतर वाढही होत असते, त्या प्रमाणात ते संसदेत किती दिवस उपस्थित रहातात, कामकाजात किती सहभाग घेतात, किती प्रमाणात बेशिस्त वागतात, यांचाही हिशोब करून त्यातून पैसे कापण्याचा नियम बनवणे आता आवश्यक झाले आहे; कारण जनतेच्या करातून वेतन म्हणून मिळणार्‍या पैशांचा वापर ते करत नाहीत, असेच जनतेला दिसत आहे !