Muhammad Yunus : बांगलादेशात महंमद युनूस यांना हटवून सैन्य सत्ता हातात घेण्याच्या सिद्धतेत !

  • राजधानी ढाक्यामध्ये सैन्याला करण्यात आले तैनात

  • सैन्यदलप्रमुखांनी घेतली आपत्कालीन बैठक

महंमद युनूस आणि वकार उझ जमान

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशामध्ये मोठ्या राजकीय पालटाची शक्यता वर्तवली जात आहे. राजधानी ढाक्यासह सर्व प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सैनिकांना तैनात केले जात आहेत. वरिष्ठ सैनिकी अधिकार्‍यांनीही एक बैठक घेतली आहे. यामुळे अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार महंमद युनूस यांच्या सरकारला हटवून सैन्य स्वतः सत्ता हातात घेण्याच्या चर्चांना वेग आला आहे. महंमद युनूस चीनच्या दौर्‍यावर जाणार आहेत. त्याच वेळी हा सत्तापालट होण्याची शकयता वर्तवण्यात येत आहे. महंमद युनूस आणि बांगलादेशाचे सैन्यदलप्रमुख वकार उझ जमान यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

१. सैन्यदलप्रमुख वकार उझ जमान यांच्या नेतृत्वाखाली सैन्याने २४ मार्च या दिवशी आपत्कालीन बैठक घेतली. या बैठकीला ५ लेफ्टनंट जनरल, ८ मेजर जनरल (जीओसी), स्वतंत्र ब्रिगेडचे कमांडिंग अधिकारी आणि सैन्य मुख्यालयातील अधिकार्‍यांसह उच्च सैन्याधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आतंकवादी आक्रमणाच्या धोक्यावरही चर्चा झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. यावर सैन्यदलप्रमुखांनी सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले.

२. गेल्या काही दिवसांत ढाका पूर्णपणे सैन्याच्या नियंत्रणात आले आहे. ढाक्यातील रस्त्यांवर सैनिक आणि ‘बॉर्डर गार्ड बांगलादेश’ यांचे सैनिक गस्त घालतांना दिसत होते. सैनिकांनी रस्त्याच्या कडेला त्यांच्या चौक्याही उभारल्या आहेत, जिथे वाहने थांबवून त्यांची तपासणी केली जाते. आधी याला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून वर्णन केले जात असले, तरी जनरल जमान यांच्या बैठकीनंतर सत्तापालटाची चर्चा जोर धरू लागली आहे.

महंमद युनूस आणि सैन्य

३. महंमद युनूस आणि सैन्य यांच्यातील संबंधांमध्ये कटुता निर्माण झाल्याचे दावे बर्‍याच काळापासून केले जात आहेत. दोन्ही बाजूंकडून अशी काही विधाने आली आहेत, ज्यामुळे तणाव वाढला आहे. राजकीय विश्लेषकांना वाटते की, सरकार आणि सैन्यनदलप्रमुख यांमधील मतभेद आता वाढले आहेत आणि सैन्याने सत्ता कह्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील अराजकतेचा भारताला कोणताही त्रास होणार नाही, याकडे सतर्क राहून पहाणे आवश्यक आहे !