आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती आणि इतर यांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल प्रविष्ट

दिशा सालियान मृत्यू प्रकरण

दिशा सालीयान आणि आदित्य ठाकरे

दिशाच्या वडिलांकडून नव्याने सीबीआय चौकशीची मागणी

मुंबई – दिशा सालियान मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, अभिनेते डिनो मोरिया, सूरज पंचोली, त्यांचे अंगरक्षक, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्याविरुद्ध नवीन प्रथम माहिती अहवाल प्रविष्ट करण्यात आला आहे. दिशा सालियान हिचे वडील सतीश सालियन यांचे अधिवक्ता नीलेश ओझा यांनी सांगितले की, आम्ही पोलीस आयुक्त कार्यालयात लेखी तक्रार प्रविष्ट केली आहे, जी सहपोलीस आयुक्तांनी स्वीकारली आहे. ही तक्रार आता प्रथम माहिती अहवालामध्ये समाविष्ट आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी त्यांच्या मुलीच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ‘माझ्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती आणि हा गुन्हा लपवण्यात आला होता’, असे दिशाच्या वडिलांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की, माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी हे राजकीयदृष्ट्या प्रेरित प्रयत्न आहेत.

प्रकरणाचे सूत्रधार ‘परमबीर सिंह’ !

अधिवक्ता नीलेश ओझा यांनी सांगितले की, या प्रकरणावर पांघरूण घालण्यामागील सूत्रधार परमबीर सिंह होते. त्यांनी सर्वांची दिशाभूल करण्यासाठी आणि आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. प्रथम माहिती अहवालामध्ये हे सर्व तपशील आहेत, ज्यामध्ये ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’कडून मिळालेल्या माहितीचा समावेश आहे, ज्यामुळे आदित्य ठाकरे यांचा अमली पदार्थांच्या व्यवसायात सहभाग असल्याचे दिसून येते.