कोकणच्या सागरी महामार्गाच्या कामाला आणखी ३ वर्षे लागणार !

मुंबई – मागील ३० वर्षे प्रलंबित असलेला रेवस-रेड्डी हा सागरी महामार्ग पूर्ण व्हायला आणखी किती वर्षे लागणार आहेत ? असा तारांकित प्रश्न भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी २५ मार्च या दिवशी विधान परिषदेमध्ये केला. त्यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या वतीने दादा भुसे यांनी सध्या रस्त्याच्या रूंदीकरणाचे आणि काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे. प्रलंबित पुलांसाठी भूसंपादन चालू आहे. महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी ३ वर्षे लागतील, अशी माहिती सभागृहात दिली.

याविषयी अधिक माहिती देतांना दादा भुसे म्हणाले, ‘‘कोकणच्या रेवस ते रेड्डी हा सागरी महामार्ग येत्या ३ वर्षांत पूर्ण होईल. या महामार्गाचे काम २ टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. या महामार्गावर एकूण ९ पूल आहेत. त्यांतील ५ पुलांच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. २ पुलांचे काम चालू आहे, तर दाभोळ आणि काळबादेवी येथील पुलांच्या कामामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. त्या सोडवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. या सागरी महामार्गाद्वारे ८९ धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत.’’