CPI(M) Activists Get Life Imprisonment : केरळमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या हत्येच्या प्रकरणी माकपच्या ८ कार्यकर्त्यांना २० वर्षांनी जन्मठेपेची शिक्षा !

एका दोषीला ३ वर्षांचा कारावास

एलाम्बिलयी सूरज हत्या

कन्नूर (केरळ) – केरळमधील थलासेरीचे प्रधान सत्र न्यायाधीश के.टी. निसार अहमद यांनी भाजपचे कार्यकर्ते एलाम्बिलयी सूरज यांच्या हत्येच्या प्रकरणात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अर्थात् माकपच्या ९ कार्यकर्त्यांना दोषी ठरवले. या प्रकरणी माकपच्या ८ कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी ५० सहस्र रुपये दंड ठोठावण्यात आला, तर अन्य एका दोषीला ३ वर्षे सश्रम कारावास आणि २५ सहस्र रुपये दंड ठोठावण्यात आला.

१. जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये वर्ष २०१२ च्या टी.पी. चंद्रशेखरन् हत्याकांड प्रकरणात आधीच कारावासाची शिक्षा भोगत असलेले टी.के. राजेश आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांचे प्रसारमाध्यम सचिव पी.एम्. मनोज यांचा भाऊ पी.एम्. मनोराज याचाही समावेश आहे. (याचा अर्थ माकपचे कार्यकर्ते सराईत गुन्हेगारांप्रमाणे खून करतात, हेच यातून दिसून येते ! – संपादक)

२. ७ ऑगस्ट २००५ या दिवशी सकाळी ८.४० वाजता मुझप्पिलंगड टेलिफोन एक्सचेंजसमोर एका रिक्शातून काही लोक आले आणि त्यांनी सूरजची हत्या केली. सरकारी अधिवक्यांच्या म्हणण्यानुसार माकपसोडून भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राजकीय वैमनस्यातून सूरज यांची हत्या करण्यात आली.

३. घटनेच्या ६ महिन्यांपूर्वीच सूरज यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली होती आणि ते ६ महिन्यांपासून अंथरुणाला खिळलेले होते.

४. खून आणि कट रचल्याच्या आरोपाखाली माकपच्या १२ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. घटनेनंतर २ आरोपींचे निधन झाले.

संपादकीय भूमिका

  • साम्यवाद्यांच्या रक्तरंजित इतिहासावर या निकालामुळे पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. गुन्हेगारांचा भरणा असलेला असा पक्ष एका राज्यात सत्तेत असणे, हे लोकाशाहीसाठी धोकादायक !
  • २० वर्षांनी मिळालेला न्याय हा अन्यायच आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?