
पणजी, २५ मार्च (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि इतर मराठा राजे यांचे कार्य पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट केले पाहिजे, अशी मागणी वास्कोचे भाजपचे आमदार दाजी साळकर यांनी विधानसभेत २५ मार्च या दिवशी एका लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली. याला उत्तर देतांना शिक्षणमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘पुढील २ दिवसांमध्ये इयत्ता ९ वीचे इतिहासाचे नवीन पाठ्यपुस्तक येणार आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये मराठा राजे आणि त्यांचे कार्य यांचा समावेश करण्यात आला आहे. आमदार दाजी साळकर यांनी हे पुस्तक मुद्दामहून वेळ काढून वाचावे.’’
प्रारंभी आमदार दाजी साळकर म्हणाले, ‘‘हा एक गंभीर प्रश्न आहे. आमच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या लोकांनी आमच्यावर अत्याचार केला, त्यांच्यावर २० पाने आहेत, तर ज्या लोकांनी स्वराज्यासाठी लढून आम्हाला स्वातंत्र्य दिले, त्या लोकांवर केवळ ३ पाने आहेत. हा दुजाभाव का आहे ? हे समजत नाही.
आम्ही मुलांसमोर काय आदर्श ठेवत आहोत ? यावर सरकारने तातडीने तोडगा काढला पाहिजे. आमच्या येथे मराठा राजे, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई आदी अनेक राष्ट्रपुरुष होऊन गेले आहेत. ज्या लोकांनी आमच्यासाठी त्याग केलेला आहे, त्यांची माहिती पाठ्यपुस्तकांमध्ये आली पाहिजे. सरकारने आवश्यक पालट करून एक योग्य संदेश सर्वांसमोर पोचवून एक चांगले वातावरण निर्माण करावे.’’