मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा हात ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

आरोपींनी व्हिडिओ केल्यावर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवले !

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

श्री. सचिन कौलकर, प्रतिनिधी

मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – गेल्या काही दिवसांपासूनच चर्चेत असलेले भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा मोठा हात आहे. या प्रकरणात खासदार सौ. सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे आरोपींच्या संपर्कात होते. या प्रकरणाच्या विरोधात सिद्ध केलेले व्हिडिओ आधी सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आले आहेत, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ मार्च या दिवशी विधानसभेत केला. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देतांना ते बोलत होते. परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी दोषी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात येईल, तसेच बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्व गुन्हेगारांना सर्वाेच्च शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचे विवस्त्र व्हिडिओ एका महिलेला पाठवल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात जाणीवपूर्वक कटकारस्थान केले गेले. एखाद्याला आयुष्यातून उठवायच्या हेतूने राजकारण होत असेल, तर ते योग्य नाही. हा खटला वर्ष २०१६ मध्ये नोंद झाला आणि वर्ष २०१९ मध्ये संपला होता. ते तेव्हा सत्तापक्षातही नव्हते; पण त्यानंतर अचानक हे उकरून काढण्याचा प्रकार झाला. आरोपींचे संभाषण ध्वनीमुद्रित झाले आहे. संभाषणाच्या अनेक ‘क्लिप्स’ आहेत. पोलिसांना निश्चिती झाल्यानंतर त्यांनी सापळा रचून प्रत्यक्ष रोख रक्कम घेतांना आरोपीला पकडण्यात आले आहे. त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता. या प्रकरणी संबंधित महिला, यू ट्यूबर (यू ट्यूबवर व्हिडिओ प्रसिद्ध करणारा) तुषार खरात आणि अनिल सुभेदार यांना अटक केली आहे. प्रभाकरराव देशमुख हा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य आहे. या तिघांनी कट रचला होता. त्यांचे व्हॉट्सॲप संभाषण सापडले आहे. १५० भ्रमणभाष सापडले आहेत. या सर्वांचा संबंध खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्याशी होता. त्यांना पाठवलेल्या व्हिडिओ प्रकरणाची चौकशी करण्यात येईल; मात्र त्यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.

१ सहस्र २०९ बांगलादेशी घुसखोरांना अटक

पोलिसांनी राज्यातील एकूण १ सहस्र २९० बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे, तसेच ३४१ घुसखोरांना बांगलादेशात परतपाठवले आहे. न्यायालयीन प्रकरण चालू असल्याने न्यायालयाच्या निर्णयानंतर किती बांगलादेशी घुसखोरांना शिक्षा झाली, ते पाहून उर्वरित बांगलादेशी घुसखोरांना त्यांच्या देशात पाठवण्यात येईल. नक्षलवाद्याच्या कारवाईत गेल्या ४ वर्षांत १ पोलीस हुतात्मा झाला असून कारवाईत २८ नक्षलवादी ठार मारले, तर १९ नक्षलवाद्यांनी आत्मसर्मपण केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

जितेंद्र आव्हाड यांना दंगलखोर आणि बलात्कार करणारे यांचा पुळका का ?

जितेंद्र आव्हाड ज्या वेळी राज्यातील घडामोडींविषयी बोलत होते, त्या वेळी ते बांगलादेशाविषयी बोलतात कि काय ? असा प्रश्न पडतो. त्यांना दंगलखोर आणि बलात्कार करणार्‍यांचा पुळका का ? त्यांच्यासाठी का छाती बडवता ? असे मुख्यमंत्री म्हणाले.