|

पणजी, २५ मार्च (वार्ता.) – प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा श्रीराम सेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक यांची गोवा प्रवेशबंदी उठवल्याने ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा विधानसभेत सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली, तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाचे सत्ताधारी पक्षातील सदस्य उदात्तीकरण का करतात ? असा प्रश्नही उपस्थित केला. गोवा विधानसभेत चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे २४ मार्चला आमदार विजय सरदेसाई यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

सरदेसाई पुढे म्हणाले,
१. ‘‘हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांना गोव्यात प्रवेश दिल्याने गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडणार आहे, तसेच शांतीपूर्ण गोव्यातील पर्यटन क्षेत्रावरही त्याचा परिणाम होणार आहे. (सध्या फसवणूक करणारे दलाल, पर्यटकांना मरेस्तोवर मारहाण करणारे शॅकवरील कर्मचारी, मद्यप्राशन करून वाहने चालवून अपघात करणारे पर्यटक यांमुळे पर्यटन क्षेत्रावर परिणाम होत आहे ! त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांनी ध्वनीप्रदूषण करणारे क्लब बंद करण्याची मागणी केली आहे ! – संपादक)
२. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही प्रमोद मुतालिक यांची गोवा प्रवेशबंदी उठवण्याची मागणी फेटाळून लावतांना नैतिक नियम इतरांवर थोपवण्याच्या प्रकारावर (मोरल पोलिसिंग) प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
३. प्रमोद मुतालिक गोव्यात येऊन धार्मिक कलह निर्माण करणारी विधाने करणार असल्याची शक्यता असल्याने मनोहर पर्रीकर सरकारने ऑगस्ट २०१४ मध्ये त्यांच्या गोवा प्रवेशावर बंदी घातली होती. प्रवेशबंदी घालणारे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर हे वेडे होते का ? कि प्रमोद मुतालिक यांनी त्यांची दिशा पालटली आहे ?
४. हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांनी २२ मार्च २०२५ या दिवशी गोव्यात प्रवेश करून ‘लव्ह जिहाद’विषयी चर्चा केली. (त्यांना हिंदूंच्या समस्यांविषयी चर्चा करण्याचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाही का ? – संपादक) हा नैतिक नियम इतरांवर थोपवण्याचा प्रकार (मोरल पोलिसिंग) नव्हे का ? (चर्चा करणे यात कोणता नियम आला आणि इतरांवर काय थोपवले ? – संपादक)
५. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने कोणत्या उद्देशाने प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांच्यावरील गोवा प्रवेश बंदी उठवली आहे ? या प्रकरणात सरकारची भूमिका काय आहे ? सरकार गोव्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून गोव्यातील पर्यटन संपवू पहात आहे का ?’’ (सध्या गोव्यात आध्यात्मिक आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यात येत असल्याने समुद्रकिनार्यांवर पर्यटनामुळे ज्या समस्या निर्माण होतात तशा होणार नाहीत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था चांगली रहाण्यास साहाय्य होईल ! – संपादक)
छावा’ चित्रपटाचे सत्ताधारी पक्षातील सदस्य उदात्तीकरण का करतात?
आमदार विजय सरदेसाई पुढे म्हणाले, ‘‘सत्ताधारी गटातील सदस्य छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाचा आक्रमकपणे प्रचार का करत आहेत ? चित्रपट हे इतिहास शिकण्यासाठी नसतात, तर चित्रपटामध्ये काल्पनिक कथा असतात आणि ते एखाद्या विचारधारेचा प्रचार करतात. (‘छावा’ चित्रपटात काल्पनिक काहीही नाही. त्या वेळची वस्तूस्थिती मांडली आहे. – संपादक) इतिहास हा इतिहासकारांनी लिहिलेल्या पुस्तकातून शिकायचा असतो. गोव्यात निवडणूक काळात भाजपच्या गोव्यातील प्रचाराचे प्रमुख असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नागपुर येथे झालेली दंगल ‘छावा’ चित्रपटामुळे झाल्याचे विधान केले आहे आणि गोव्यातील सत्ताधारी आमदार ‘छावा’ चित्रपटाचे उदात्तीकरण करत आहेत. (नागपूरमधील दंगल ‘छावा’ चित्रपटामुळे झाली नाही, तर काँग्रेसने आतापर्यंत जे मुसलमानांचे लांगूलचालन केले त्यामुळे उद्दाम झालेल्या मुसलमानांमुळे झाली आहे. – संपादक) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार गोव्यातील २ धर्मांमधील बंधुभाव नष्ट करू पहात आहे. जनतेचे सरकारच्या घोटाळ्यांवरून लक्ष विचलित करण्याचा हा एक प्रकार आहे.’’