सहज आणि चैतन्यमय वाणीतून सर्वांना आपलेसे करून घेणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

‘मी देवद आश्रमात राहून सेवा आणि साधना करते. मला सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा अनेक वेळा सत्संग लाभला. त्या वेळी मला त्यांच्यातील अनेक गुणांचे दर्शन घडले.

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी प्रत्येक सेवा देवाला अपेक्षित अशी परिपूर्ण आणि भावपूर्ण करण्यास सांगणे

‘सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी मला सांगितले, ‘‘प्रत्येक सेवा देवाला अपेक्षित अशी परिपूर्ण आणि भावपूर्ण करायला हवी.’’ त्यामुळे मला सेवेतून आनंदही मिळू लागला. आश्रमात नवीन साधक आल्यास पूर्वी मी त्यांच्याशी ओळख करून घेत नव्हते. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादा मला त्या साधकांची ओळख करून घ्यायला सांगायचे. ‘सर्वांना आपलेसे करून घेणे’, हा त्यांच्यातील गुण माझ्या लक्षात आला. ‘ते साधक साधनेत पुढे जाण्यासाठी कसे प्रयत्न करतात ?’, हे शिकायला मिळाल्याने साधनेतील प्रयत्नांसाठी मला नवी दिशा मिळू लागली.

कु. दीपाली माळी

२. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी माझ्याकडून झालेल्या चुकीचे चिंतन करायला सांगितल्यावर ‘उतावळेपणा’ हा स्वभावदोष लक्षात येऊन ‘मी कुठे अल्प पडते’, याची जाणीव होऊन अंतर्मुखता वाढणे

एकदा सद्गुरु राजेंद्रदादांनी रात्रीच्या महाप्रसादाच्या वेळी मला विचारले, ‘‘आज आमटी कशाची आहे ?’’ तेव्हा मी ‘तूरडाळीची आहे’, असे सांगितले. नंतर मी लगेच उत्तरदायी साधिकेला याविषयी विचारले. तेव्हा तिने ‘मसूरडाळीची आमटी आहे’, असे सांगितले. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादा जेवण वाढून घेत होते. मी त्यांना लगेच जाऊन सांगितले, ‘‘आज मसूरडाळीची आमटी आहे’’ आणि त्यांची क्षमा मागितली. नंतर सद्गुरु राजेंद्रदादांनी मला या चुकीचे चिंतन करायला सांगितले. तेव्हा माझ्यातील ‘उतावळेपणा’ हा स्वभावदोष लक्षात आला. ‘मी अल्प पडते ?’, याची मला जाणीव होऊन माझी अंतर्मुखता वाढली. माझेे दिवसभरात झालेल्या चुकांचे चिंतन होऊ लागले.

३. ‘व्यापक आणि इतरांचा विचार करून देवाला आवडेल, अशी सेवा करायला हवी’, हे लक्षात येणेे

मी एका चौकटीत राहून सेवा करायचे. एकदा मी पथ्याचे पदार्थ ठेवलेले पटल लावतांना पटलासंदर्भातील सर्व सेवा झाल्या होत्या. नंतर सद्गुरु राजेंद्रदादांनी मला त्या सेवेतील त्रुटी सांगितल्या. त्या वेळी ‘सेवा किती व्यापक आणि इतरांचा विचार करून देवाला आवडेल, अशी करायला हवी’, हे लक्षात आले. तेव्हापासून मला सेवेतील बारकावे पाहून इतरांचा विचार करून सेवा करता येऊ लागली.

४. एका साधिकेने मोरपिसाचे चित्र काढणे, ते मोरपिसासारखे वाटत नसल्याचे उत्तर देणे आणि ‘चित्र काढण्यामागील भाव बघायला हवा’, याची सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी जाणीव करून देऊन चित्र काढणार्‍या साधिकेची क्षमा मागायला सांगणे

एकदा सद्गुरु राजेंद्रदादा सेवेच्या ठिकाणी आले होते. तेथे ओट्यावरच एका काकूंची दैनंदिनी लिहिण्याची वही होती. त्या काकूंनी पहिल्या पानावर मोरपीस काढले होते. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादांनी एका ताईला विचारले, ‘‘हे काय आहे ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मोरपीस काढले आहे.’’ नंतर त्यांनी मला विचारल्यावर मी त्यांना ‘मोरपिसासारखे वाटत नाही’, असे उत्तर दिले. मी काकूंनी काढलेल्या चित्रातील भाव न बघता ‘ते मोरपिसासारखे तंतोतंत असायला हवे’, असे मला वाटले. नंतर सद्गुरु राजेंद्रदादांनी तेच मोरपीस मला परत बघायला सांगितले. काकूंना ते मोरपीस बघायला सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मी ते मोरपिसासारखे काढण्याचा प्रयत्न केला आहे.’’ काही वेळाने सद्गुरु राजेंद्रदादांनी मला काकूंची क्षमा मागायला सांगितली. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादा म्हणाले, ‘‘चित्र काढण्यामागील भाव बघायला हवा.’’ तेव्हा ‘काही गोष्टी तारतम्याने घ्यायला हव्या’, हे माझ्या लक्षात आले.

५. अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत प्रश्‍न विचारणे आणि योग्य उत्तर दिल्यावर याच उत्तराची वाट पहात असल्याचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगणे

देवाच्या कृपेने सद्गुरु राजेंद्रदादांसाठी नाचणीच्या पिठाची पेज शिजवून देण्याची सेवा मला मिळाली. त्यांना पेज घेऊन गेल्यावर ते म्हणायचे, ‘‘काय घेऊन आला आहात ?’’ मी म्हणायचे, ‘‘पेज घेऊन आले आहे.’’ त्यांनी मला हा प्रश्‍न नंतरही २ – ३ वेळा विचारला. ‘त्यांना काय उत्तर देणे अपेक्षित आहे ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. काही दिवसांनी माझ्या मनात विचार आला, ‘आज सद्गुरु राजेंद्रदादांनी विचारल्यावर काय उत्तर देऊ ?’ मी कृष्णाला याविषयी विचारले. तेव्हा कृष्ण म्हणाला, ‘मी चैतन्य घेऊन आले आहे’, असे सांग.’ मी सद्गुरु राजेंद्रदादांना तसे सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘मी याच उत्तराची वाट पहात होतो.’’ तेव्हा माझी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता वाटली.

६. कोथिंबिरीविषयी प्रश्‍न विचारून सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी अंतर्मुख केल्याने स्वतःत अहंशून्यता येणे अपेक्षित असल्याची जाणीव होणे

एकदा सद्गुरु राजेंद्रदादा रात्रीचा महाप्रसाद घेत होते. तेव्हा त्या दिवशी तिवळ (पाण्यात आमसूल भिजवून केलेले एक पेय) बनवले होते. त्यात कोथिंबीर घातली होती. त्यांनी मला विचारले, ‘‘कोथिंबीर पाण्यात का बुडत नाही ?’’ तेव्हा मी सांगितले, ‘‘ती हलकी आहे; म्हणून ती पाण्यावर तरंगते.’’ काही वेळाने मला वाटले, ‘सद्गुरु राजेंद्रदादांना यातून काहीतरी वेगळे उत्तर अपेक्षित आहे.’ मी देवाला याविषयी विचारल्यावर देव म्हणाला, ‘तुलाही या कोथिंबिरीसारखे अहंशून्य व्हायचे आहे.’ अशा लहान प्रसंगातून मला पुष्कळ शिकायला मिळाले.

७. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्यातील उत्कट भाव, श्रद्धा आणि शरणागती अनुभवायला येणे

एकदा मला आध्यात्मिक त्रास होत होता. त्यामुळे मला मनात येणार्‍या नकारात्मक विचारांवर मात करता येत नव्हती. त्या वेळी सद्गुरु राजेंद्रदादांना मी नामजपादी उपाय विचारले. त्या वेळी त्यांनी मला एक भावप्रयोग करायला सांगितला. ते सांगत असतांना मला त्यांच्यातील उत्कट भाव, श्रद्धा आणि शरणागती अनुभवायला आली. त्यांचा देवाप्रतीचा भाव पाहूनच माझी भावजागृती होत होती. त्यामुळे मला नकारात्मक विचारांवर मात करता आली.

८. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा सत्संग लाभणे

८ अ. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सत्संगात बोलायला सांगितल्यावर प्रारंभी भीती वाटणे; परंतु ‘घडायचे तर लढायचे’ हे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे वाक्य आठवून सत्संगात बोलता येणे : १८.१०.२०१९ या दिवशी मी दिवाळीसाठी घरी गेले होते. २०.१०.२०१९ या दिवशी तासगाव येथे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये येणार होत्या. तासगाव येथे सत्संगाच्या ठिकाणी आमची अनौपचारिक चर्चा झाली. सद्गुरु स्वातीताईंनी मला ‘आश्रमात काय शिकायला मिळाले ?’, ते पुढे येऊन सांगण्यास सांगितले. त्यांनी अकस्मात् असे सांगितल्याने मला थोडी भीती वाटली; पण नंतर सद्गुरु राजेंद्रदादांनी सांगितलेले ‘घडायचे, तर लढायचे’, हे वाक्य मला आठवले. मी त्या विचाराने सत्संगात बोलू लागले.

८ आ. देवाला प्रार्थना केल्यावर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमच कविता लिहिता येणे आणि ‘देवाप्रती भाव असेल, तर काहीच अशक्य नाही’, हे लक्षात येणे : ‘एकदा सद्गुरु राजेंद्रदादांनी मला विचारले, ‘‘तुम्ही कधी कविता केली आहे का ?’’ मी म्हणाले, ‘‘मी कधीही कविता केली नाही.’’ मला वाटले, ‘सद्गुरु राजेंद्रदादांनी असे का विचारले असेल ?’ तेव्हा मी देवाला विचारल्यावर देव मला म्हणाला, ‘देवाप्रती भाव असेल, तर काहीच अशक्य नाही.’ अनेक साधकांचा सद्गुरु राजेंद्रदादांच्याप्रती भाव असल्याने साधक त्यांच्यावर कविता करतात. या प्रसंगानंतर अनुमाने १ मासाने सद्गुरु राजेंद्रदादांचा वाढदिवस होता. तेव्हा मी देवाला म्हणाले, ‘मला सद्गुरु राजेंद्रदादांच्या वाढदिवसासाठी कविता करायची आहे.’ मी देवाला संपूर्ण शरणागतभावाने प्रार्थना केली. तेव्हा ‘सद्गुरु राजेंद्रदादांनी मला प्रत्येक प्रसंगातून कसे शिकवले ?’, ते प्रसंग डोळ्यांसमोर येऊ लागले. देवानेच मला कवितेसाठी योग्य शब्द सुचवले; म्हणून मी कविता लिहू शकले. आतापर्यंतच्या आयुष्यात मी पहिलीच कविता सद्गुरु राजेंद्रदादांवर केली. त्यामुळे मला देवाप्रती कृतज्ञता वाटू लागली. मला याविषयी त्या सत्संगात सांगता आले.

शेवटच्या सत्रात सद्गुरु स्वातीताई म्हणाल्या, ‘‘या घोर कलियुगात सद्गुरुंचा सत्संग मिळणे कठीण आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आपल्याला संतांचा सहवास मिळतो.’’ सत्संगात आलेल्या एक ताई म्हणाल्या, ‘‘मी माझ्या मुलीला सुटीत सेवेसाठी आश्रमात पाठवीन.’’ तेव्हा ‘देवाचे कार्य देवच करवून घेतो’, याची मला प्रचीती आली.

हे श्रीकृष्णा, या अज्ञानी जिवाची पात्रता नसतांनाही मला सद्गुरु राजेंद्रदादांचा सत्संग मिळवून दिलास आणि ‘प्रत्येक प्रसंगातून काय शिकायचे ?’, हे सांगितलेस. त्याविषयी मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– कु. दीपाली राजेंद्र माळी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (डिसेंबर २०१९)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक