गुरुदेवांचे सूक्ष्म स्तरावरील कार्य कैसे जाणती सकलजन ।

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सनातन संस्थेच्या संपर्कात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आलेल्या अनेकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलातील अध्यात्मप्रसाराचे कार्य काही प्रमाणात ठाऊक झाले आहे. त्यांच्या स्थुलातील कार्याची व्याप्ती एवढी व्यापक आहे की, ती जाणून घेणेही अवघड आहे. स्थुलातील कार्यापेक्षा त्यांचे कार्य हे सूक्ष्म स्तरावर अधिक प्रमाणात आहे. (त्यांचे ३० टक्के कार्य स्थूल स्वरूपात आणि ७० टक्के कार्य सूक्ष्म स्तरावरील आहे.) त्याची व्याप्ती सप्तलोक आणि सप्तपाताळ यांपर्यंत आहे. हे आपल्याला कसे कळणार ?’, असे विचार मनात आल्यावर देवाने मला पुढील ओळी सुचवल्या.

सद्गुरु राजेंद्र शिंदे

स्थुलातील अध्यात्मप्रसाराचे कार्य आपले गुरुदेव सर्व जाणती ।
कैसे जाणती सूक्ष्मातील कार्य सकलजन ।
देवादिका हरविले असुरांनी ।
तयासी अखंड लढती, कैसे अज्ञानी आम्ही जाण ॥ १ ॥

मानवासी पीडिले कुणी ।
जाणू शके ना कुणी ।
शोधून काढिले तुम्ही ।
मोठ्या वाईट शक्ती त्या कारस्थानी (टीप १) ॥ २ ॥

सकलजन अनंत उपाय करिती ।
तरीही मानव रसातळा जाती ।
काय ते कारण (टीप २) असती ।
कैसे जाणू आम्ही अभागी ॥ ३ ॥

राष्ट्रावर संकटे अपार येती ।
कोण ते थांबवी, कुणी न जाणी ।
सूक्ष्म रूपे ते थोपवून धरिती ।
लढूनी बलशाली वाईट शक्तींशी ॥ ४ ॥

भ्रमिष्ट मानवा या कलियुगी ।
योग्य-अयोग्य न कळे मती ।
ऐशा मानवा बाहेर काढताती ।
रज-तमाच्या प्रकोपातूनी (टीप ३) ॥ ५ ॥

संकटे येती एकामागूनी ।
खचला मानव ते पाहूनी ।
कोण आधार देतसे यातूनी ।
प्रत्यक्ष धावतसे तू सत्संगातूनी (टीप ४) ॥ ६ ॥

सतर्क करी मानवासी ।
पैसा, बुद्धी कामी न येती ।
संकटाचा (टीप ५) सामना करण्यासी ।
‘सनातन प्रभात’मधूनी मार्गदर्शन करती ॥ ७ ॥

धर्मद्वेष्ट्यांशी भिडतसे ।
खंडण सडेतोड करतसे ।
जागोजागी जागृती करूनी ।
पितळ उघड करितसे (टीप ६) ॥ ८ ॥

जागृत करी हिंदूंसी ।
संकट आले कंठाशी ।
संघटित करूनी संघटनांसी (टीप ७)।
लुप्त क्षात्रतेज जागविशी ॥ ९ ॥

पाठविले साधकांसी ।
प्रसार धर्माचा करण्यासी ।
अफाट प्रसार होतसे ।
केवळ आपल्या संकल्पे ॥ १० ॥

बुद्धीत अडकलेल्या लोकांसी ।
जागृत करितसे वैज्ञानिक दृष्टीसी ।
असंख्य ग्रंथसंपदा लिहूनी ।
साधनेसी प्रवृत्त करती (टीप ८) ॥ ११ ॥

तरून जाण्या भवसागर ।
अवघड मार्ग करण्या पार ।
परंतु प्रीती तयांची अपार ।
बळ देते साधना करण्या कठोर ॥ १२ ॥

शोधिला साधनामार्ग ‘गुरुकृपायोग’।
सर्व योगांचा राजा तो जाण ।
सहस्रो पार झाले भवसागर (टीप ९)।
सहस्र असती त्या वाटेवर ॥ १३ ॥

कलियुगी संत होणे अवघड ।
दोष-अहंचा महाडोंगर ।
प्रक्रियेतून (टीप १०) होते षडरिपूंचे निर्मूलन ।
भाववृद्धी करूनी होती संतपदी विराजमान (टीप ११) ॥ १४ ॥

साधनेचा हा विहंगम मार्ग ।
त्यांच्या अस्तित्वे होत असे सुगम ।
आचरणात आणावा प्रत्यक्ष ।
जातील साधक मोक्षास ॥ १५ ॥

असे महान सद्चिदानंद परब्रह्म ईश्‍वर ।
वर्णन करण्या तयांचे मती पडे लहान (अल्प) ।
जाणण्या तयांचे कार्य, असे मी पूर्ण असमर्थ ।
साष्टांग नमन तयांसी, शरणागत होऊन ॥ १६ ॥

टीप १ – सध्या सगळीकडे भ्रष्टाचार, लाचलुचपत, बलात्कार, हत्या, दंगली, मार्‍यामार्‍या, फसवणूक, इत्यादी समस्यांनी परिसीमा गाठली आहे. यांवर अनेक जणांनी अनेक वर्षे प्रयत्न करूनही हे न्यून न होता वाढतच आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘या मागील मूळ कारण म्हणजे मोठ्या वाईट शक्ती आहेत’, हे शोधून काढून मानवाला त्यांच्या नियंत्रणातून बाहेर काढण्याचे उपाय सांगितले आहेत, म्हणजेच त्यांनी या समस्येच्या मुळावरच घाव घातला आहे.
टीप २ – राष्ट्रावर अनेक देशांतर्गत आणि परकीय समस्या येत असतात. देशांतर्गत समस्या म्हणजे जातीय दंगली, आतंकवादी आक्रमणे, नैसर्गिक आपत्ती इत्यादी आणि परकीय समस्या म्हणजे शेजारी देशांकडून होणारी आक्रमणे, देशात अस्थिरता निर्माण करणारी कारस्थाने इत्यादी. या मागे असणारे मूळ कारण म्हणजे सूक्ष्मातील वाईट शक्तींचे आक्रमण.
टीप ३ – सनातनचे साधक समाजात योग्य साधनेचा प्रसार करून समाजाची सात्त्विकता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, तसेच हिंदूंचे प्रभावी संघटन करून त्यांच्यात अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याची वृत्ती निर्माण करत आहेत.
टीप ४ – सध्या चालू असलेले ‘ऑनलाईन’ सत्संग (नामसत्संग, भाववृद्धी सत्संग, बालसंस्कारवर्ग आणि धर्मसंवाद इत्यादी, तसेच विविध ठिकाणी घेण्यात येणारे सत्संग यांतून समाजाला काळानुसार साधनेविषयी योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यांचा सहस्रोजण लाभ घेत आहेत.)
टीप ५ – आगामी घोर आपत्काळाविषयी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या माध्यमातून जागृती आणि त्यावर मात करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणे
टीप ६ – ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म विरोधी कृत्यांचे प्रभावी खंडण करण्यात येते, तसेच ‘सनातन प्रभात’मधून करण्यात आलेल्या जागृतीमुळे समाजात अनेक यशस्वी आंदोलने करण्यात आली आहेत.
टीप ७ – प्रतिवर्षी राष्ट्रीय स्तरावर आणि प्रांतीय स्तरावर होणार्‍या हिंदू अधिवेशनांच्या माध्यमातून भारतभरातील शेकडो हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संघटित करण्यात येत आहे, तसेच धर्मावर होणार्‍या आघातांचा विरोध कारण्यासाठी सातत्याने राष्ट्रीय आणि प्रांतीय स्तरावर आंदोलने करण्यात येतात.
टीप ८ – सनातन संस्थेचे ‘साधना’ या विषयावरील अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. (ऑक्टोबर २०२० पर्यंत १७ भाषांमध्ये विविध विषयांवरील ३२९ ग्रंथांच्या ८० लाख ९१ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत.)
टीप ९ – गुरुकृपायोगानुसार साधना करून ३.११.२०२० पर्यंत १ सहस्र ११९ साधक ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत, म्हणजेच त्यांनी भवसागर पार केला आहे.
टीप १० – सनातन संस्थेमध्ये गुरुकृपायोगानुसार साधना करतांना आड येणार्‍या स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यास विशेष महत्त्व दिले जाते. यालाच ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे’, असे म्हणतात. जोपर्यंत प्रक्रिया गांभीर्याने राबवली जात नाही, तोपर्यंत साधना करतांना प्रत्येक टप्प्यात होणार्‍या चुकांनी साधकांची साधनेत अतोनात हानी होते. ती टाळण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाला विशेष महत्त्व दिले आहे. जोपर्यंत स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होत नाही, तोपर्यंत साधकांमध्ये भाव निर्माण होण्यातही अडथळे येतात.
टीप ११ – गुरुकृपायोगानुसार साधना करून ३.११.२०२० पर्यंत १०८ साधक संत झाले आहेत.’

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.७.२०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक