प्रतिकूल शारीरिक स्थितीतही संतपद ते सद्गुरुपद असा साधनेचा प्रवास जलद गतीने करणारे देवद आश्रमातील सद्गुरु राजेंद्र शिंदे !

​‘कार्तिक कृष्ण ६, शके १९३२ (२८.१०.२०१०) या दिवशी गुरुदेवांनी मला संत घोषित केले. संतपद ते सद्गुरुपद (१९.७.२०१६ या दिवशी सद्गुरुपद प्राप्त झाले.) या कालावधीत मी केलेल्या सेवा आणि साधनेचा प्रवास येथे दिला आहे.

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१. संत झाल्यानंतर केलेल्या सेवा

संत झाल्यानंतर मार्च २०११ पर्यंत मी कर्नाटक राज्यात प्रसारसेवा केली. मधल्या कालावधीत रामनाथी आश्रमात एक कार्यशाळा होती, त्यासाठी मी गेलो होतो. एप्रिल २०११ पासून माझा सेवेअंतर्गत महाराष्ट्राचा दौरा चालू झाला. आरंभी मी विदर्भामध्ये गेलो. तेथून पुढे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, असे करत मी पुण्यापर्यंत आलो. त्यानंतर मुंबई, ठाणे आणि रायगडचा दौरा चालू झाला.

२. दौरे चालू असतांना नोव्हेंबर २०११ पासून कंबर दुखण्याचा त्रास चालू होणे आणि त्यामुळे दौरा अपूर्ण ठेवून देवद आश्रमात जावे लागणे

या प्रवासाच्या काळात माझी कंबर पुष्कळ प्रमाणात दुखू लागली आणि हळूहळू मानही दुखायला लागली. नोव्हेंबर २०११ मध्ये माझे दुखणे पुष्कळच वाढले. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचा दौरा अपूर्ण ठेवून मी देवद आश्रमात आलो.

३. देवद आश्रमात केलेल्या सेवा

३ अ. आश्रमातील साधकांसाठी प्रतिदिन ‘स्वभावदोष निर्मूलन सत्संग’ चालू करणे : नोव्हेंबर २०११ मध्ये देवद आश्रमात आल्यापासून मी आश्रमातील साधकांसाठी प्रतिदिन स्वभावदोष निर्मूलन सत्संग घेत होतो. आश्रमातील साधकांकडून कार्य आणि त्यांची साधना या दृष्टीने बर्‍याच चुका होत होत्या. प्रतिदिन सकाळी ९.३० पासून सत्संग चालू होत असे. दुपारी जेवण आणि २ घंटे विश्रांतीसाठी थांबून पुढे रात्रीपर्यंत सत्संग चालू असे. असे सत्संग सलग वर्षभर चालू होते. या सत्संगाच्या काळात चैतन्यवाहिनीची सेवाही चालू होती.

३ आ. देवद आश्रमात सेवा चालू केल्यावर झालेले विविध त्रास

३ आ १. आरंभी त्रासामुळे झोपूनच सत्संग घेणे आणि नंतर दुखणे वाढत जाऊन कंबरदुखी, मानदुखी असे त्रास चालू होणे : त्या वेळी मला व्यवस्थित ५ मिनिटेही बसता येत नव्हते. सगळे सत्संग मी झोपूनच घेत होतो. केवळ चैतन्य वाहिनीकरता थोडा थोडा वेळ बसून ती सेवा करू शकत होतो. पुढे दुखणे हळूहळू वाढत गेले आणि मला जेवणही जात नव्हते. खाल्लेले पचायचे नाही आणि पोटही पुष्कळ बिघडायला लागले. कंबरदुखी होतीच, त्या समवेत मानेचा, ‘स्पाँडेलायटिस’चा त्रास चालू झाला. पाठही पुष्कळ दुखत असे. पाठीचा वरचा भाग, कंबर आणि उजव्या पायाच्या टाचेपर्यंत, असे हळूहळू दुखणे पुष्कळच वाढत गेले.

३ आ २. वैद्यकीय उपचारात विविध तपासण्या केल्यावर त्यात नेमकेपणाने व्याधी लक्षात न येणे आणि एका चाचणीत वैद्यांनी ‘बांबू स्पाईन’ची लक्षणे चालू झाल्याचे सांगणे : वैद्यकीय उपचार चालू होते; पण वैद्यकीय उपचारासाठी जेव्हा क्ष-किरण तपासणी किंवा रक्त तपासणी केली जात असे, त्या वेळी ‘नेमकेपणाने कोणती व्याधी आहे ?’, ते सापडायचे नाही आणि दुखणेही बरे व्हायचे नाही. पुढे एका चाचणीत मला ‘बांबू स्पाईन’ची लक्षणे चालू झाल्याचे वैद्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘या व्याधीमध्ये हळूहळू मणक्याचा कणा बांबूसारखा ताठ होतो.’’ तेव्हा मला उठतांना आणि बसतांना पुष्कळ त्रास होत होता.

३ आ ३. पोटाचे दुखणे वाढणे आणि त्याविषयीच्या प्रथितयश वैद्यांना दाखवल्यावर त्यांनी पोटाचे स्नायू कमकुवत झाल्याने न बोलता आराम करण्यास सांगणे : या स्थितीमध्ये काही वर्षे काढली. नंतर पोटाचे दुखणेही वाढत गेले. काहीही खाल्ले, तरी मला पचायचे नाही आणि जेवणही जायचे नाही. तेव्हा मी प्रथितयश आयुर्वेदिक वैद्यांकडे गेलो. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘तुमच्या पोटाचे स्नायू एकदम कमकुवत आणि लिबलिबित झाले आहेत. तुम्ही मुळीच बोलायचे नाही. जेवढे शक्य आहे, तेवढा आराम करा; कारण बोलण्यासाठी जी शक्ती लागते, तेवढीसुद्धा शक्ती तुमच्या पोटाच्या स्नायूंमध्ये नाही.’’

३ आ ४. त्या वैद्यांनी मला ‘बोलायचे नाही’, असे सांगितले असले, तरी माझ्या सर्व सेवा या बोलण्याच्याच होत्या. केवळ गुरुदेवांच्या कृपेने मला सत्संगांमध्ये बोलायला जमायचे.

३ इ. देवद आश्रमात जिल्ह्यातील साधकांसाठी, तसेच आश्रमातील साधकांसाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चालू होणे : वर्ष २०१३ ते २०१४ या कालावधीत देवद आश्रमात जिल्ह्यातील साधकांसाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चालू होती. विविध जिल्ह्यांतील साधक ही प्रक्रिया शिकण्यासाठी येत होते. ‘त्या साधकांचा साप्ताहिक सत्संग घेणे, त्या संदर्भातील त्यांच्या अडचणी सोडवणे’, ही सेवा गुरूंच्या कृपेने मला लाभली होती. साधारण एक वर्षभर या प्रक्रियेचे सत्संग देवद आश्रमात चालू होते. याच कालावधीत काही मास आश्रमातील साधकांसाठीसुद्धा ही प्रक्रिया राबवण्यात आली होती.

४. जिल्ह्यातील साधकांसाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे सत्संग घेणे

हळूहळू वर्ष २०१३ नंतर गुरुदेवांच्या कृपेने मला एकेका जिल्ह्यातील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचा सत्संग घ्यायला मिळाले. जिल्ह्याचा सत्संग आश्रमातून घेत होतो. दिवसातून ६ – ७ घंटे सत्संग चालायचा.

४ अ. जिल्ह्यातील साधकांचे सत्संग घेतांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

४ अ १. त्या काळात सत्संगासाठी अत्याधुनिक प्रणाली नसल्याने भ्रमणभाषवरून मोठ्याने बोलावे लागल्याने थकवा आणि दुखणे यांमुळे बोलतांना पुष्कळ त्रास होणे : त्या काळात माझे खाणे अल्प झाले होते आणि दुखणेही वाढले होते. त्यामुळे मला पुष्कळ ग्लानी यायची. थकवा आणि दुखणे पुष्कळ असायचे. त्या वेळी सत्संगासाठी अत्याधुनिक प्रणाली नव्हती. झोपून भ्रमणभाषवरूनच पुष्कळ मोठ्याने बोलावे लागत असे. आता अन्य संगणकीय प्रणालींचा उपयोग करून हळू स्वरात बोलले, तरी समोरच्याला व्यवस्थित ऐकायला जाते. तेव्हा माझ्या लक्षात आले की, पोटाचे स्नायू कमकुवत झाल्यावर काय होते ? एखाद्याने प्रसंग सांगितला, तर मला ‘हा.., हो..’ हेसुद्धा म्हणण्याएवढी शक्ती नसे.

४ अ २. हातामध्ये शक्ती नसल्याने भ्रमणभाषला माईक लावून तो छातीवर ठेवून बोलणे : हातामध्ये शक्ती नसल्यामुळे मला बराच वेळा भ्रमणभाषसुद्धा हाताने कानाजवळ लावता येत नव्हता; म्हणून भ्रमणभाषलाच ‘माईक’ लावण्याची व्यवस्था केली होती. तो ‘माईक’ मी छातीवर ठेवून बोलत होतो.

४ अ ३. गुरुदेवच बोलायच्या वेळी शक्ती देत असल्याचे जाणवणे : काही वेळा मी जिल्हासेवकांना सांगत असे, ‘‘कुणी काही सांगितले, तर तुम्हीच प्रतिसाद द्या. त्यांना काही सांगायचे असेल, तेवढेच मी सांगत जाईन’’; पण गुरुदेवांच्या कृपेने मला बोलायची वेळ यायची, तेव्हा गुरुदेवच मला बोलण्यासाठी शक्ती देत होते आणि माझे बोलणे साधकांपर्यंत पोचत होतेे.

४ अ ४. सत्संग चालू असतांना ग्लानीमुळे झोपेवर नियंत्रण न रहाणे आणि सत्संगात काय चालले आहे, हे न कळणे : ग्लानीमुळे सत्संग चालू असतांना बर्‍याच वेळा थोड्या वेळासाठी मला झोप येत असे. झोपेत असल्याने ‘काय चालले आहे’, हे मला कळायचे नाही. काही वेळासाठी डुलकी लागायची. माझे डोळे मिटलेच जायचे. मला डोळे उघडे ठेवणेही कठीण जायचे. बसल्यावर थोडे तरी झोपेवर नियंत्रण ठेवता येते; मात्र मला बसता येत नसल्यामुळे ग्लानीमुळे अनावर झोप येऊन मी झोपी जायचो.

४ अ ५. सत्संग चालू असतांना झोप लागणे; परंतु जाग आल्यावर ‘सत्संगात काय बोलायचे ?’, ते आपोआप बोलले जाणे आणि प्रत्येक वेळी देवाची कृपा अनुभवण्यास मिळणे : प्रत्येक वेळी मला देवाची कृपा अनुभवायला मिळाली. सत्संग चालू असतांना जाग आली की, ‘सत्संगात पुढे काय बोलायला हवे ?’, ते मी व्यवस्थित बोलायचो. गुरुदेवांच्या कृपेनेच मला झोपेतही ऐकायला जायचे. माझी ही स्थिती सत्संगातील साधकाला कधीच कळली नाही. देवानेच माझी इतकी काळजी घेतली आणि प्रत्येक वेळी माझ्याकडून सेवा करवून घेतली. यासाठी मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. अशा प्रकारे साधारण सव्वा वर्ष जिल्ह्यातील सत्संग चालू होते. अशीच अनुभूती मला एकदा ठाणे-मुंबई-रायगड येथील साधकांची कार्यशाळा चालू असतांना आली. मी झोपून ऐकत होतो. ऐकता ऐकता मला झोप लागली आणि पू. (कु.) अनुताईंनी (आताच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) मला एका प्रसंगाविषयी दृष्टीकोन सांगण्यास सांगितला. त्या वेळी मी त्यांच्या आवाजाने जागा होऊन त्याविषयी बोललो होतो.

५. विविध सेवांमुळे गुरुदेवांनी सेवेत व्यस्त ठेवणे

५ अ. चैतन्यवाहिनीच्या सेवांमुळे सेवेत पुष्कळ व्यस्तता येणे : त्याच कालावधीमध्ये चैतन्यवाहिनीची सेवा ध्वनीचित्रीकरण करून जिल्ह्यांना दाखवणे चालू केले. त्यासाठी मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे ३ दिवस निवडले होते. जे काही विषय चैतन्यवाहिनीत घेतले जात, ते दैनिकात आधी छापून येणे आवश्यक असल्यामुळे चैतन्यवाहिनीचे ध्वनीचित्रीकरण झाले की, तो विषय सिद्ध करणे, टंकलेखनाला देणे इत्यादी सेवा करण्यात व्यस्तता असायची.

५ आ. पू. अश्‍विनीताई यांच्या समवेत विविध सत्संग घेणे, तसेच लिखाण करणे, या सेवांत व्यस्त रहाणे : त्याच काळात गुरुदेवांच्या कृपेने संतांचे सत्संग आणि देवद आश्रमातील स्वभावदोष निर्मूलन सत्संगही घेण्याची सेवा मिळाली. गुरुदेवांच्या कृपेमुळे मी सतत व्यस्त राहिलो. तेव्हा रामनाथीहून देवद आश्रमात सौ. अश्‍विनी पवार, म्हणजे आताच्या पू. अश्‍विनीताई आल्या. तेव्हा त्यांच्या समवेत सत्संग घेण्याची सेवा चालू झाली. विविध विषयांवर जे काही सुचायचे, त्याचे अधून-मधून लिखाणही चालू होते.

६. शारीरिक स्थिती खालावणे आणि ती परिस्थिती स्वीकारता येणे

६ अ. अशक्तपणा वाढल्याने दैनंदिन कृती करता न येणे अशा असह्य स्थितीत ‘गुरुदेवांनी साधना करून घेणे’, ही त्यांची अनंत कृपा असणे : त्या वेळी माझा अशक्तपणा इतका वाढला होता की, मला वाकता येत नसे. दात घासतांना मानेवर येणारा ताणही मला सहन होत नसे. कसे तरी पटकन दात घासायचो. हात आणि खांदेदुखी यांमुळे दैनिक हातात घेऊन वाचता येत नव्हते. (एक साधक मला दैनिक वाचून दाखवत असे.) बसता येत नसल्याने कसेतरी पटकन जेवायचो. अशा स्थितीतही गुरुदेवांनी माझ्याकडून सेवा आणि साधना करवून घेतली, ही त्यांनी माझ्यावर केलेली अनंत अनंत अनंत कृपा आहे.

६ आ. समष्टी सेवा केली असल्याने खोलीत एकटे राहून सेवा करणे अवघड जाणे आणि परिस्थिती स्वीकारून त्यावर मात करता येणे : बराच कालावधी समष्टीत गेल्यामुळे आणि सतत साधकांमध्ये वावरण्याची सवय झाल्याने मला साधकांना भेटावेसे वाटे. आश्रमाबाहेर जाता येत नसल्याने मी खोलीतच असे. त्यामुळे खिडकीतून साधकांना पहातांना बरे वाटायचे. नंतर लक्षात आले की, आहे ती परिस्थिती स्वीकारायला पाहिजे. खोलीत एकटे राहून सेवा करणे देवाला अपेक्षित आहे. हे लक्षात घेऊन हळूहळू मला त्यावर मात करता आली.

७. संतपद घोषित झाल्यावर एका माहितीत अधिकतम पातळी ७५ टक्के होणार असल्याचे कळणे, दुखणे वाढत गेल्याने ‘२ वर्षांत मृत्यू येईल’, असे वाटून शेवटच्या घटकेपर्यंत देहाकडे लक्ष न देता झोकून देऊन सेवा करण्याचा निश्‍चय होणे

ऑक्टोबर २०१० मध्ये माझी पातळी ७१ टक्के घोषित झाली होती. माझी पातळी ६० टक्के होती, तेव्हा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘माझी पातळी अधिकतम ७५ टक्के होईल’, असे एका विद्वानांकडून मिळालेल्या माहितीत लिहिले होते. वर्ष २०११ मध्ये माझी पातळी ७३ टक्के होती. ‘पुढे दोन वर्षांत माझी पातळी ७५ टक्के होईल’, असे वाटत असे. त्यामुळे नंतर दुखणे वाढत गेल्यावर मला ‘माझा मृत्यू २ वर्षांत होणार आहे’, असे वाटू लागले; म्हणून मी ‘देहाचे लाड न पुरवता, शेवटच्या घटकेपर्यंत झोकून देऊनच सेवा करायची’, असे ठरवले. त्यामुळे पुढील दोन वर्षे मी झोकून देऊन सेवा केली.

८. व्याधीग्रस्त साधकांचा साधनेविषयी असलेला अयोग्य दृष्टीकोन लक्षात येणे

बरेच साधक ‘शारीरिक दुखण्यामुळे साधना करायला जमत नाही’, असे सांगत असतात; परंतु गुरुदेवांनी अत्यंत प्रतिकूल शारीरिक स्थितीत या जिवाकडून साधना करवून घेऊन ‘व्याधीग्रस्त साधकांचा साधनेविषयी असलेला दृष्टीकोन किती अयोग्य आहे’, हे शिकवले.

​‘माझे कठोर प्रारब्ध सुसह्य करून या जिवाकडून साधना करून घेतली; म्हणून गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३१.७.२०१८)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक