Third ‘Maharashtra Mandir Nyas Parishad’ Shirdi : अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे सरकारच्या कह्यात नाहीत; मात्र हिंदूंचीच मंदिरे सरकारच्या कह्यात का ? – पू. रामगिरी महाराज, मठाधिपती, सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान, नगर

संत आणि शेकडो विश्‍वस्त यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे तृतीय मंदिर न्यास परिषदेला प्रारंभ !

तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त दीपप्रज्वलनाच्या वेळी डावीकडून श्री. सुनील घनवट, पू. राघवेश्‍वरानंदगिरी महाराज (दीपप्रज्वलन करतांना), पू. रमेशगिरी महाराज, सद्गुरु सत्यवान कदम, श्री. गिरीष शहा आणि श्री. प्रदीप तेंडोलकर

शिर्डी – प्रतिकूल परिस्थितीत संतांनी मंदिरांची संस्कृती टिकवून ठेवली.  सद्य:स्थितीत हिंदू केवळ तीर्थक्षेत्री जातात; परंतु त्या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य नष्ट होत असेल, तर दुर्लक्ष करतात. अध्यात्म आपल्या प्रत्येक श्‍वासात आणि रक्ताच्या प्रत्येक थेंबात यायला हवे. धर्माविषयी निष्क्रीय राहिलो, तर भविष्यात हिंदूंना जगणे कठीण होईल. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असूनही भारतातील एकही मशीद किंवा चर्च सरकारने कह्यात घेतलेले नाही. मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव आणावा, असे आवाहन नगर येथील ‘सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान’चे मठाधिपती पू. रामगिरी महाराज यांनी तृतीय महाराष्ट्र मंदिर-न्यास राज्यस्तरीय परिषदेत केले.

संतांच्या वंदनीय उपस्थितीत नगर-मनमाड मार्गावरील ‘श्री साई पालखी निवारा’ येथील सभागृहात २४ डिसेंबर या दिवशी तृतीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेला प्रारंभ झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांतील विविध मंदिरांचे ७५० हून अधिक विश्‍वस्त, पुजारी आणि प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत. परिषदेत सूत्रसंचालन  हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. सतीश कोचरेकर आणि श्री. विपुल भोपळे यांनी केले.

पू. रामगिरी महाराज

‘हर हर महादेव’, ‘सनातन हिंदु धर्माचा विजय असो’ या जयघोषात मंदिर-न्यास परिषदेला प्रारंभ झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांमधील ज्योतिबा, पंढरपूरची विठुमाऊली, कोल्हापूरची श्री अंबाबाई, नाशिकचा काळाराम आदी देवतांचा आशीर्वाद घेऊन विविध देवस्थानांचे विश्‍वस्त आणि प्रतिनिधी या मंदिर-न्यास राज्य परिषदेत सहभागी झाले होते. २ दिवसीय मंदिर-न्यास परिषदेत हिंदु धर्मकार्यात मंदिरांचे योगदान, मंदिरांचे सुयोग्य व्यवस्थापन, मंदिरांतील अपप्रकारांना रोखणे, भाविकांना सुविधा, मंदिरांतील वस्त्रसंहिता आदी विविध विषयांवर मार्गदर्शन, उद्बोधन सत्रे, परिसंवाद यांद्वारे उपाययोजना आणि कार्याची पुढील दिशा ठरवण्यात आली.

भारत हा प्राचीन काळी समृद्ध आणि संपन्न देश होता. तेथील लोक आनंदी आणि समाधानी होते. तेथे लौकिक आणि पारलौकिक विद्या, तसेच कला प्रवाहित होत्या. याचे कारण प्राचीन काळी देवालये ही खर्‍या अर्थाने सनातन धर्माची आधारशिला होती. सनातन धर्मातील ज्ञानाचा प्रसार, प्रचार आणि संवर्धन करण्याचे कार्य देवालयांच्या माध्यमातून केले जात होते. त्यातून धर्मपरायण, राष्ट्रनिष्ठ, विद्वान आणि तेजस्वी पिढी निर्माण होत होती. थोडक्यात मंदिर संस्कृतीच्या संवर्धनात केवळ व्यक्तीचा आध्यात्मिक विकास नाही, तर राष्ट्राचा सर्वांगीण विकास सामावलेला आहे. दुर्दैवाने सध्याच्या काळात मात्र मंदिरांचा वैभवशाली वारसा क्षीण झाला आहे. मंदिरांच्या माध्यमातून देवाची भक्ती होतांना दिसत आहे; पण राष्ट्रभक्ती आणि धर्मशक्ती यांच्या निर्मितीचे कार्य होतांना दिसत नाही. राममंदिर झाले, पण अद्याप रामराज्य यायचे आहे. त्यामुळे भारतात खर्‍या अर्थाने रामराज्य आणायचे असेल, तर प्रत्येक मंदिराने राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आवश्यक अशा मंदिर संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे अपरिहार्य आहे.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था. (२४.१२.२०२४)

‘श्री जीवदाननीदेवी मंदिर संस्थान’चे अध्यक्ष श्री. प्रदीप तेंडोलकर, श्री क्षेत्र बेट कोपरगाव येथील ‘राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज समाधी मंदिरा’चे पू. रमेशगिरी महाराज, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम, कोपरगाव येथील ‘श्रीक्षेत्र राघवेश्‍वर देवस्थाना’चे मठाधिपती पू. राघवेश्‍वरानंदगिरी महाराज, ‘समस्त महाजन संस्थे’चे राष्ट्रीय व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. गिरीश शहा आणि मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट या मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन झाले. दीपप्रज्वलनानंतर व्यासपिठावरील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

परिषदेत सहभागी झालेले मंदिरांचे विश्‍वस्त, पुजारी आणि प्रतिनिधी

या वेळी पू. रामगिरी महाराज पुढे म्हणाले,  

१. भक्तांनी मंदिरात अर्पण केलेला निधी धर्मकार्यासाठी व्यय होण्याऐवजी अन्यत्र व्यय होणे, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. मंदिरातील अर्पणातून संस्कृत विद्यापीठ स्थापन करणे, मुलांवर आध्यात्मिक शिक्षण देणे यांसाठी उपयोगात आणायला हवा. विकासाकरता आम्ही वेगळा कर देत आहोत, मंदिरातील पैशांचा उपयोग विकासासाठी का ?

२.  मंदिरांमधून चांगल्या प्रकारे धर्मप्रसार होऊ शकतो. तरुणांनी मंदिरात यावे, हनुमान चालिसापठण करावी, यासाठी आम्ही तरुणांना प्रोत्साहित करत आहोत. मनोरंजनाची साधने अनेक आहेत; परंतु चित्ताला समाधान केवळ मंदिरांमध्ये मिळते. जीवनात द्विधा मन:स्थिती होते, तेव्हा मंदिरात आल्यावर स्थैर्य प्राप्त होते; मात्र विधर्मी लोक मंदिरांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत.

३. शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिरामध्ये कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते; परंतु भाविकांनी अर्पण केलेल्या या निधीचा धर्मकार्यासाठी काय उपयोग होतो ? तिरुपतीमधील बालाजी देवस्थान देव न मानणार्‍यांच्या कह्यात जाणे, हे हिंदूंसाठी दुर्दैवी आहे.

४. अनेक ठिकाणी मंदिरांवर आक्रमणे होत आहेत. जीवनात उद्वीग्नता येते, तेव्हा कुणीतरी जवळची व्यक्ती असावी लागते. मनातील भावना परमेश्‍वरापुढे व्यक्त केल्यावर मन हलके होते. यासाठीच मंदिरांची आवश्यकता आहे. मंदिर म्हणजे ‘मंगलता’ आणि ‘दिव्यता’ यांचे स्थान होय.

५. मंदिरातील भगवंताच्या मूर्तीमधून देवत्व प्रकट होत असते. त्यामुळे अंत:करणातील भाव जागृत होतो. सामाजिक कार्य करणार्‍यांना मंदिरे ही सामाजिक सेवेचे स्थान वाटत नाही. चित्रपटातील नटी पाहून वेगळे भाव जागृत होतात, मंदिरातील देवीची मूर्ती पाहून वेगळे भाव जागृत होतात. हे मंदिरांचे श्रेष्ठत्व आहे.

६. अंत:करणाची स्थिरता आणि शुद्धता यांसाठी मंदिरांची आवश्यकता आहे. देवतेेचे चरित्र डोळ्यांपुढे असेल, तर त्याचा आदर्श आपण जीवनात आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मंदिरे ही एकप्रकारे समाजसेवेचीही केंद्रे आहेत.


हे ही वाचा – संपादकीय → मंदिरमुक्तीचा यज्ञ !

हिंदूंची मंदिरे मुक्त करण्यासह संतांच्या मार्गदर्शनानुसार संघर्ष करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक !

असा झाला सोहळा !

शंखनाद आणि श्री गणेशाच्या श्‍लोकाने मंदिर न्यास परिषदेला प्रारंभ झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर ब्रह्मवृंद श्री. वैभव जोशी आणि श्री. नीलेश जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. नाशिक येथील ‘वैजनाथ महादेव देवस्थाना’चे विश्‍वस्त, तसेच निवृत्त सेनाधिकारी श्री. किसान गांगुरडे यांनी पुरोहितांचा सत्कार केला. त्यानंतर सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संदेश वाचून दाखवला. त्यानंतर सोहळ्याला उपस्थित संत आणि मान्यवर यांचा पुष्पहार आणि शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी न्यास-मंदिर परिषदेचा उद्देश सांगितला.

संतगणांचा सन्मान !

पुणे येथील ‘ओम जय शंकर आध्यात्मिक प्रतिष्ठान’ मठाचे प.पू. पप्पाजी पुराणिक महाराज, हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता पू. सुरेश कुलकर्णी, सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, अमरावती येथील ‘अखिल भारतीय श्री गुरुदेव दत्त गुरुकुल आश्रमा’चे अध्यात्म प्रसारप्रमुख श्री. राजाराम बोधे, पुणे येथील ह.भ.प. संभाजी महाराज अपुणे, पुणे येथील डॉ. प्रकाश मुंडे, ‘नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान’चे ह.भ.प. महेश महाराज, श्री सद्गुरु रामनाथ महाराज देवास्थानाचे प्रतिनिधी श्री. संतोष लोणकर, बीडमधील श्रीक्षेत्र हनुमानगडाचे महंत ह.भ.प अभिमन्यू महाराज शास्त्री, अहिल्यानंतर येथील दत्तधाम सरकारचे श्री. राजेंद्र गडगे महाराज

पर्यटनस्थळे नव्हेत, मंदिरे ही धर्माची ऊर्जास्त्रोत आहेत. मंदिरांतून धर्मशिक्षण मिळाल्यास धर्माभिमान जागृत होऊन हिंदु धर्मांला पुनर्तेज प्राप्त करून देतील. त्यामुळे ‘सरकारीकरणापासून मुक्त करून मंदिरे हिंदूंच्या संघटनांची केंद्रे बनवणे आवश्यक आहे. त्यासाठी संघटित लढा देऊ’, असा निर्धार तीर्थक्षेत्र शिर्डीच्या पवित्र भूमीत मंदिर न्यास परिषदेत एकवटलेल्या शेकडो मंदिर विश्‍वस्तांनी केला.