
१. सत्संगात जाणवलेली भावसूत्रे
१ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले मला हाक मारतात. त्या वेळी ‘देवाच्या मुखातून माझ्यासारख्या पामराचे नाव येते’, याबद्दल मला पुष्कळ आनंद होऊन कृतज्ञता वाटते.

१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एखाद्या साधकाचे नाव घेतल्यावर त्या साधकाची अनंत जन्मांची पापे, त्याचे स्वभावदोष अन् अहं नष्ट होत असणे : तेव्हा मला वाटले, ‘परात्पर गुरुदेव केवळ माझेच नाही, तर प्रत्येक साधकाचे नाव सूक्ष्मातून घेतच असतात. त्यामुळे त्या साधकाच्या जीवनात पालट होतो. परात्पर गुरु डॉक्टरांनी एखाद्या साधकाचे नाव घेतल्यावर त्या साधकाची अनंत जन्मांची पापे, त्याचे स्वभावदोष आणि अहं नष्ट होतो.
आपल्याला वाटते, ‘आपण साधनेचे प्रयत्न केले किंवा मी माझ्या स्वभावदोषांवर मात करू शकले.’ खरेतर परात्पर गुरु डॉक्टरांनी आपले नाव सूक्ष्मातून घेतले आणि त्यामुळेच आपण प्रयत्न करू शकतो. आपल्याला प्रयत्न करण्यासाठी बळ देणारे गुरुदेवच आहेत.
१ इ. पूर्वीच्या युगांत प्रत्यक्ष नारायणाने ध्रुवबाळ आणि भक्त प्रल्हाद यांच्या अनेक कठीण परीक्षा घेतल्या असणे अन् ‘साधकजन उद्धारक’ परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांची सहजतेने घेत असलेली परीक्षा : पूर्वीच्या युगांत ध्रुवबाळ आणि भक्त प्रल्हाद यांना सहजासहजी महाविष्णूचे दर्शन झाले नाही. प्रत्यक्ष नारायणाने त्यांच्या अनेक कठीण परीक्षा घेतल्या. भक्त प्रल्हादाला अनेक संकटांतून त्याच्यातील विष्णुभक्तीनेच वाचवले. त्या वेळी त्या भक्तांची भक्तीही श्रेष्ठ होती. आता काळ पालटला आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले ‘साधकजन उद्धारक’ आहेत; परंतु साधकांचा उद्धार संघर्षाविना होणारच नाही. कृपाळू गुरुदेव साधकांची सहजतेने परीक्षा घेत असतात. ती परीक्षा, म्हणजे साधकांमधील स्वभावदोष आणि अहं यांमुळे त्यांच्या जीवनात विविध प्रसंग घडतात अन् संघर्ष होतो. साधकांनी त्या संघर्षावर मात करून गुरुदेवांना अपेक्षित अशी प्रक्रिया केली, तर साधक या परिक्षेत पास होतात. (माझे हे बोलणे ऐकून परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘सर्व साधकांनी असाच भाव ठेवायला हवा.’’)
२. सत्संगात आलेल्या अनुभूती
२ अ. ‘सत्संगाला गेल्यावर मंदिरात गेले आहे’, असे वाटणे आणि ‘भगवंताने प्रत्यक्ष दर्शन दिले’, याचा पुष्कळ आनंद होणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भेटणे, म्हणजे साक्षात् भगवंतालाच भेटणे’, असे आहे. एकदा सत्संगात प्रथम परात्पर गुरुदेव आले आणि त्यानंतर आम्ही चौघीजणी (मी, कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), कु. श्रिया राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय १३ वर्षे) आणि कु. आराधना धाटकर (आध्यात्मिक पातळी ५८ टक्के, वय १२ वर्षे) सत्संगाच्या ठिकाणी जाऊन बसलो. त्या वेळी ‘सत्संगाचे ठिकाण हे श्रीविष्णूचे मंदिर आहे. आम्ही सर्व जणी देवाचे दर्शन घेण्यास आलो आहोत’, असे आम्हाला जाणवले आणि ‘भगवंताने प्रत्यक्ष दर्शन दिले’, याचा आम्हाला पुष्कळ आनंद झाला.
२ आ. सत्संगाच्या वेळी दैवी सुगंध येणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भोवती केशरी-पिवळसर रंगाचा दिव्य तेजस्वी प्रकाश दिसणे : सत्संगाच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांना पाहून ‘देव मूर्तीत नसून सगुण-साकारात आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला दैवी सुगंध आला. मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या सभोवती केशरी-पिवळसर रंगाचा दिव्य तेजस्वी प्रकाश दिसला. असे मला स्थुलातून दिसले, तरीही ‘आपण त्यांना सूक्ष्मातून पाहूच शकणार नाही; कारण ते निर्गुण-निराकार भगवंत आहेत’, असे मला वाटले.
गुरुदेवा, आपल्याच अनंत कृपेने ही भावसूत्रे मला शिकायला मिळाली आणि तुम्हीच ती प्रक्रियाही घडवून आणली. हे गुरुदेवा, हे सर्व आपल्या चरणी मोगर्याच्या सुगंधी फुलांच्या रूपात अर्पण करते.’
– कु. अपाला अमित औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १८ वर्षे), फोंडा, गोवा.
|