महाराष्ट्रातील गड-दुर्ग, तसेच अन्य प्राचीन स्मारके यांवर अश्लील कृत्ये केल्यास, जुगार खेळल्यास, मद्यप्राशन केल्यास, तसेच अमली पदार्थांचे सेवन केल्यास त्या विरोधात असलेला १० सहस्र रुपयांचा दंड १ लाख रुपये करण्याचा आणि एक वर्षाचा कारावास २ वर्षे करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्रातील महायुतीने शासनाने घेतला. याविषयी ‘महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुराणवास्तुशास्त्रविषयक स्थळे अन् अवशेष अधिनियम’ हे सुधारणा विधेयक विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात संमत करण्यात आले. महायुती शासनाने घेतलेला हा निर्णय निश्चितच अभिनंदनीय आहे; परंतु गड-दुर्ग आणि प्राचीन स्मारके यांवरील इस्लामी अतिक्रमणाच्या सर्वांत मोठ्या अपप्रकाराला उत्तरदायी कोण ? आणि त्याचा दंड कुणाला करणार ? याविरोधात सरकारने ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे, अशी शिवप्रेमींची मागणी आहे.
१. गड-दुर्गांवर सर्रासपणे इस्लामी अतिक्रमण
गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमणाचा प्रकार अतिशय भयानक आहे. पुणे जिल्ह्यातील लोहगडावर काही वर्षांपूर्वी एक मुसलमान फकीर (साधू) यायचा. कालांतराने हा फकीर गडावर निवास करू लागला. स्थानिक गडप्रेमींनी त्याला तेथून पिटाळून लावल्यानंतरही तो पुन्हा तेथे आला. २ वर्षांपूर्वी त्या फकीराचा गडावर मृत्यू झाला; परंतु मरण्यापूर्वी त्या फकीराने लोहगडावर मजार बांधली आणि त्या मजारीचे रूपांतर दर्ग्यामध्ये करण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रतीवर्षी हाजी हजरत उमरशावली बाबा दर्ग्याच्या नावाने येथे उरूस (एखाद्या मुसलमान धर्मगुरूच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित उत्सव) साजरा केला जात आहे. हे सर्व प्रकार अवैधपणे चालू आहेत. याविरोधात हिंदुत्वनिष्ठांनी पुरातत्व विभाग आणि स्थानिक पोलीस ठाणे येथे वेळोवेळी तक्रार केली आहे. गडप्रेमींच्या तक्रारीनंतर स्थानिक पुरातत्व विभागाचे अधिकारी त्याविषयी पोलिसांकडे तक्रार करण्याचा सोपस्कार करतात; परंतु आतापर्यंत पोलिसांनी या अवैध दर्ग्यावर कारवाई केलेली नाही. ‘लोहगडावर मजार बांधली आणि वर्षातून एकदा उरूस साजरा केला तर काय ?’, असे कुणाला वाटू शकते; परंतु हा प्रकार दिसतो तेवढा साधा नाही.
ठाणे जिल्ह्यातील मच्छिंद्रनाथांची समाधी असलेल्या मलंगगडावर भाविक म्हणून आलेल्या एक मुसलमान गडावर स्थायिक झाला. त्यानंतर त्याने तेथे नमाजपठण चालू केले. कालांतराने श्री मलंगगडावर दर्गा उभारण्यात आला. सद्यःस्थितीत मलंगगडाचे स्थान हजरत बाबा सय्यद कासिम अली शाह मलंग या नावाने दर्गा उभारण्यात आला आहे. हिंदूंचे हे धार्मिक स्थान सद्यःस्थितीत ‘पीर हाजी मलंगबाबा दर्गा’ या नावाने ओळखले जात आहे. ‘येथे दंड आणि कारावास काय ?’ अशा प्रकारे महाराष्ट्रातील अनेक गड-दुर्ग मुसलमानांकडून बळकावण्याचा प्रयत्न चालू आहे.
२. गड बळकावण्याचे इस्लामी षड्यंत्र चालू आहे त्याचे काय ?
काही दिवसांपूर्वी कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दुर्गाडी गडावर असलेली वास्तू मंदिर असल्याचा निर्णय दिला. ही वास्तू मशीद असल्याची बतावणी मुसलमानांनी केली होती. हे मंदिरच नव्हे, तर संपूर्ण दुर्गाडी गडच वक्फ मंडळाची मालमत्ता असल्याचा दावा मुसलमानांनी केला. दुर्गाडी गडावरील वास्तू मंदिर असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला असला, तरी या मंदिराच्या मागे असलेली भिंत ‘ईदगाह’ असल्याचा दावा मुसलमानांनी केला आहे आणि या गडाच्या बाजूच्या रस्त्याला ‘ईदगाह रस्ता’, असे नावाही दिले, म्हणजे गड-दुर्गांवर अपप्रकार झाल्यावर शिक्षा; पण अशा प्रकारे गड बळकावण्याचे इस्लामी षड्यंत्र चालू आहे त्याचे काय ?
३. गड-दुर्गांवर वाढती अतिक्रमणे, हे काँग्रेसचे पाप !
दुर्गाडी गडावरील वास्तू ही मंदिर असल्याच्या खटल्याच्या निर्णयासाठी हिंदूंना ६० वर्षे वाट पहावी लागली. ६० वर्षांनी सत्र न्यायालयाचा निर्णय आला. प्रतापगडाच्या पायथ्याची असलेली अफझलखानाची कबरीचे वाढीव बांधकाम अनेक वर्षांनी सरकारने तोडले. विशाळगडावर बांधण्यात आलेल्या १०० हून अवैध बांधकामाच्या विरोधात मागील वर्षी महायुती सरकारकडून कारवाई चालू केल्यावर मुसलमान न्यायालयात गेले. सध्या याविरोधात खटला चालू झाल्यामुळे कारवाईला स्थगिती न्यायालयाने दिली आहे. मुंबईतील माहिम गडावर मुसलमानांनी १५० हून अधिक घरे बांधली. सरकारने २ वर्षांपूर्वी ही अनधिकृत बांधकामे हटवली; मात्र ही अवैध घरे वर्ष १९९० पूर्वीची असल्यामुळे त्यांना अन्यत्र घरे द्यावी लागली. हे काय चालू आहे ?, म्हणजे मुसलमानांनी गड-दुर्गांवर अवैध बांधकाम करायचे, ते होईपर्यंत पुरातत्व विभाग, पोलीस आणि सरकार यांनी कारवाई करायची नाही; मात्र कारवाई चालू झाल्यावर न्यायालयात याचिका करून कामाला स्थगिती मिळवायची. गडावर मजार बांधायची, त्यानंतर त्याचे दर्ग्यात रूपांतर करायचे. कालांतराने तेथे उरूस चालू करायचा आणि मग गड किंवा दुर्ग ही वक्फ मंडळाची भूमी असल्याचा दावा करायचा. जे प्रकार मलंगगड, दुर्गाडी गड, विशाळगड यांविषयी झाले आहेत, तर त्याहून अधिक भयावह, म्हणजे ते संपूर्ण कह्यात घेण्याचे गंभीर प्रकार घडले आहेत. त्यामुळे गड-दुर्गांच्या इस्लामीकरणाचे प्रकार अतिशय गंभीर आहेत. दंडात्मक कारवाई आणि कारावास यांच्या पलीकडे गेलेले हे प्रकार आहेत. गड-दुर्गांवरील ही अवैध बांधकामे समूळ नष्ट करण्यासाठी सरकारने तत्परतेने कारवाई करावी. अवैध बांधकामे उभारल्यानंतर त्यावरील कायदेशीर प्रक्रियावरील पैसा, वेळ आणि यंत्रणा यांचा होत असलेला व्यय हे काँग्रेसचे पाप आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे.
४. गडांवरील इस्लामीकरण हटवण्यासाठी महायुती सरकारने तातडीने पावले उचलावीत !
गड-दुर्ग किंवा प्राचीन स्मारके ही हिंदूंचा दैदीप्यमान वारसा आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाच्या कथा हिंदूंमध्ये वीरश्री निर्माण करतात. त्याचे साक्षीदार हे गड-दुर्ग आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंचे साम्राज्य निर्माण केले नाही. महाराज सर्वधर्मसमभाव मानणारे होते. शिवरायांच्या सैन्यात मुसलमान असल्यामुळे ते मुसलमानप्रेमी होते. शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते’, असे इतिहासाचे विकृतीकरण मागील काही वर्षांपासून नियोजनबद्ध चालू आहे. छत्रपती शिवरायांच्या नावाने आणि त्यांच्या इतिहासाने हिंदूंमधील शौर्य अन् धर्माभिमान जागृत होतो. ‘इतिहासाचे विकृतीकरण केल्यास हिंदू तेजोहीन होतील’, हे मुसलमानांनी ओळखले आहे. छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या गड-दुर्गांचे इस्लामीकरण, हाही या षड्यंत्राचाच भाग आहे. काँग्रेसने नेहमीच गड-दुर्गांवरील मुसलमानांनी केलेल्या अतिक्रमणाला छुपा पाठींबा दिला. अफझलखानाच्या कबरीभोवती असलेल्या अवैध बांधकामालाही काँग्रेसने संरक्षण दिले. महायुतीचे सरकार असल्यामुळे हे अवैध बांधकाम हटवले गेले. याचा लाभ महायुतीला मतदानाच्या वेळी पहायला मिळाला. त्यामुळे अन्य गडांवरील इस्लामीकरण हटवण्यासाठी महायुती सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे.
– श्री. प्रीतम नाचणकर, नागपूर. (१८.१२.२०२४)