मुंबईतील म्हाडाच्या जागांवरील अनधिकृत बांधकामांची चौकशी आणि कारवाई होणार ! – मंत्री उदय सामंत

मुंबई, २७ मार्च (वार्ता.) – मुंबई शहर आणि उपनगरात घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, कोळीवाडा, वाशी नाका, चेंबूर आणि धारावीच्या साईबाबानगर परिसरात म्हाडाच्या जागांवर अनधिकृत बांधकामे आहेत. त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी २५ मार्च या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. याविषयी सदस्य संजय उपाध्याय यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री सामंत पुढे म्हणाले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची म्हाडाच्या वतीने कारवाई लवकरात लवकर होईल. विशेषतः राखीव भूखंड, सार्वजनिक जागा आणि खासगी मालमत्तांवर अतिक्रमण करून बांधकामे उभारल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती गठित करण्यात येणार असून अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी कडक पावले उचलली जातील.