क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर संरक्षित राष्‍ट्रीय स्‍मारकांच्‍या सूचीतून वगळा !

माजी खासदार राहुल शेवाळे यांची केंद्रशासनाकडे मागणी

 माजी खासदार राहुल शेवाळे

मुंबई – क्रूरकर्मा मोगल बादशाह औरंगजेब याची खुलताबाद येथील कबर हटवण्‍याची मागणी देशभरातून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘राष्‍ट्रीय संरक्षित स्‍मारकाच्‍या सूचीतून ही कबर त्‍वरित वगळावी’, अशी मागणी शिवसेनेचे माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केंद्रशासनाकडे केली आहे. याविषयी राहुल शेवाळे यांनी नवी देहली येथे केंद्रीय सांस्‍कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन त्‍यांना निवेदन दिले.

औरंगजेबाने हिंदवी स्‍वराज्‍याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा ४० दिवस अमानुष छळ केला. छत्रपती संभाजी राजे यांनी शेवटी मृत्‍यूला मिठी मारली; मात्र धर्मांतर केले नाही. अतिशय क्रूर आणि धर्मवेड्या औरंगजेबाच्‍या अन्‍यायाच्‍या, अत्‍याचाराच्‍या अनेक घटना इतिहासात नोंद आहेत. अशा क्रूरकर्मा मोगल शासकाची छत्रपती संभाजीनगरच्‍या खुलताबाद येथील कबर त्‍वरित हटवण्‍याची मागणी देशभरातून होत आहे; मात्र प्राचीन स्‍मारक आणि पुरातत्‍विक स्‍थळे आणि अवशेष कायदा, १९५८ नुसार ही कबर राष्‍ट्रीय संरक्षित स्‍मारकांच्‍या सूचीत आहे. या कबरीला संरक्षित स्‍मारकांच्‍या सूचीत नेमके केव्‍हा आणि कसे स्‍थान देण्‍यात आले, याविषयी ठोस पुरावा उपलब्‍ध नाही, असे राहुल शेवाळे यांनी निवेदनात म्‍हटले आहे.