बांगलादेशी हिंदूंवरील आक्रमणाविषयी चिंता व्यक्त करणारा आणि एकजुटीच्या आवाहनाचा ठराव मान्य !

मुंबई, २७ मार्च (वार्ता.) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यंदा विजयादशमीला आपली १०० वर्षे पूर्ण करत आहे. शताब्दी वर्षात संघकार्याचा विस्तार आणि समाज परिवर्तन यांवर लक्ष केंद्रित करत असून अधिक गुणात्मक अन् व्यापक कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची सांगता २३ मार्च या दिवशी झाली. या सभेत बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाविषयी चिंता व्यक्त करणारा आणि एकजुटीचे आवाहन करणारा ठराव मान्य करण्यात आला, अशी माहिती संघाचे कोंकण प्रांत कार्यवाह श्री. विठ्ठलराव कांबळे यांनी २५ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की,…
१. २१ ते २३ मार्च या कालावधीत बेंगळूरू येथील सभेत प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि मा. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या उपस्थितीत देशभरातून १ सहस्र ४४३ प्रतिनिधी सहभागी झाले होते. शताब्दी पर्वात आत्मनिरीक्षण, समाजाच्या पाठिंब्याला प्रतिसाद आणि राष्ट्र कार्यासाठी समर्पण हे संघाचे उद्दिष्ट आहे. यासाठी ‘पंच परिवर्तना’च्या सूत्रांवर काम होणार आहे.
२. शताब्दी वर्षाचा प्रारंभ विजयादशमी २०२५ पासून होईल. त्यात संघ गणवेशात स्वयंसेवकांचे तालुका किंवा नगर स्तरावरील कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.
३. नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात ‘हर गाव, हर बस्ती, घर-घर’ (प्रत्येक गाव, वस्ती आणि घर) या संकल्पनेनुसार घरोघरी संपर्क मोहीम राबवली जाईल.
४. सर्व मंडले किंवा वस्ती येथे हिंदु संमेलने, तालुका/शहर पातळीवर सामाजिक सद़्भाव मेळावे, तर जिल्हा पातळीवर नागरिक संवाद मेळावे आयोजित करण्यात येतील.
५. कोकण प्रांताकडून युवकांसाठी विशेष कार्यक्रमांचे नियोजन केले जाईल. १५ ते ३० वर्षे वयोगटांतील युवकांसाठी राष्ट्र उभारणी उपक्रम, सेवा उपक्रम आणि पंच परिवर्तन यांवर लक्ष केंद्रित करणारे कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत.