मुंबई – बांगलादेशामधील हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार होत आहेत. तेथे हिंसाचाराच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. बांगलादेशातील जमावाने हिंदूंच्या घरांची तोडफोड केली. इस्कॉनचे चिन्मय कृष्णदास प्रभु यांना अन्यायकारक अटक करण्यात आली. त्यांची लवकर सुटका होण्यासह तेथील हिंदूंवर होणार्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदु समाजाच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. काही ठिकाणी निदर्शने करण्यात आली. काही जिल्ह्यात प्रशासनाला निवेदने सादर करण्यात आली. अनेक ठिकाणी बंदही पाळण्यात आला. हिंगोली, बीड, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, जालना, भंडारा, वाशिम, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह अनेक जिल्ह्यांत मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. या मोर्चांमध्ये सहस्रोंच्या संख्येत हिंदू एकवटले होते. संत, महंत, साधू यांनीही यात सहभाग घेतला होता.
‘भारत सरकारने बांगलादेशी हिंदूंना संरक्षण द्यावे’, अशी मागणी करणारे फलक हाती घेतले होते. ‘बांगलादेश’ असे लिहिलेली पत्रके काही ठिकाणी जाळण्यात आली. काहींनी निषेध म्हणून काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.
आज बांगलादेशात घडत आहे उद्या भारतात घडू नये, यासाठी संघटित रहा ! – भाजपचे आमदार नितेश राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे काढण्यात आलेल्या मोर्चात भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले की, बांगलादेशातील हिंदूंच्या होणार्या हत्या आणि त्यांच्यावर केले जाणारे अत्याचार बांगलादेश सरकारने त्वरित थांबले नाही, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रात बांगलादेशी लोक औषधाला सुद्धा शिल्लक रहाणार नाहीत. त्यांना हाकलून दिले जाईल. बांगलादेशात केले जाणारे अत्याचार कोणत्या जातीचा म्हणून नाही, तर हिंदु म्हणून केले जात आहेत. हिंदु म्हणून त्याला वेचून ठार मारले जात आहे. इस्कॉनसारख्या संस्थांवर कारवाई केली जाते. त्यांच्या धर्मगुरूंना अटक होते. त्यांचे वकीलपत्र घेणार्यांच्या हत्या केल्या जातात हे काय आहे ? हिंदूंसाठी काम करणार्यांचा आज आवाज बंद केला जात आहे. आज बांगलादेशात होत आहे ते उद्या भारतात होऊ नये, यासाठी हिंदूंनो संघटित रहा, असे आवाहन आमदार राणे यांनी या वेळी केले.
मानवाधिकाराच्या गोष्टी करणार्यांवर आमदार नितेश राणे यांची टीका
भारतात येऊन मानवाधिकाराचे धडे देणारे बांगलादेशात हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या वेळी कुठे आहेत ? बांगलादेशातील मुसलमान धर्मगुरू ‘हिंदूंना जागा नाही’, असे सांगत आहेत, तेव्हा मानवाधिकार आयोग काय करतो ? ‘बंधूभाव’ (भाईचारा) केवळ आम्हीच भारतात जपायचा का ?, असे अनेक प्रश्न या वेळी आमदार राणे यांनी उपस्थित केले.
धर्मांध मुसलमानांना आमदार नितेश राणे यांचा प्रश्न ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी नको, हिंदुत्वनिष्ठ सरकार नको, असे म्हणता मग या सरकारच्या योजनांचा लाभ घेणारे सर्वांत अधिक मुसलमान कसे ? तुम्हाला तुमचा धर्म महत्त्वाचा असेल, तर सरकारी योजनांचा लाभ का घेता ? मुख्यमंत्री – लाडकी बहीण योजनेचे लाभ घेणारे अधिक करून याच समाजाचे दिसतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की, २ पेक्षा अधिक अपत्ये असतील, त्यांना या योजनेतून वगळावे म्हणजे अधिकाधिक हिंदु समाजाला या योजनेचा लाभ होईल.
भोर येथील तहसीलदारांना निवेदन !
भोर (जिल्हा पुणे) – बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात सकल हिंदु समाजाच्या वतीने भोर येथील तहसीलदार श्री. राजेंद्र नजन, तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विकास खरात यांना निवेदन देण्यात आले. या वेळी भोर शहरातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच हिंदु धर्माभिमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बांगलादेशात हिंदूंच्या रक्षणासाठी सैन्य घुसवा !
कोल्हापूर येथे ५०० हून अधिक हिंदूंचा हुंकार !
कोल्हापूर – शहरात या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी इस्कॉनसह ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी प.पू. बाळ महाराज तथा संतोष कोळी, इस्कॉनचे श्री. राहुल देशपांडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोल्हापूर शहरप्रमुख श्री. रविकिरण इंगवले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, भाजपचे श्री. महेश जाधव, श्री. राहुल चिकोडे, सौ. रूपाराणी निकम यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी ‘एक हैं तो सेफ हैं’, ‘जय श्रीराम’ यांसह अन्य घोषणा देण्यात आल्या.
क्षणचित्रे
१. हिंदुत्वनिष्ठांनी ‘बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना देशातून हाकलून द्या’, ‘धर्मो रक्षति रक्षित:’, यांसह अन्य फलक हातात धरले होते. महिला कार्यकर्त्यांनी ‘बांगलादेशातील हिंदु बळी जात आहेत, जग शांत का आहे ?’, ‘सगळ्या जगाचे लक्ष बांगलादेशातील हिंदूंकडे आहे’, ‘धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंवर होणारे हल्ले थांबवा’, असा मजकूर लिहिलेले फलक हातात धरले होते. आंदोलनात महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
२. आंदोलनस्थळी ‘इस्कॉन’च्या वतीने ‘हरे रामा हरे कृष्णा-कृष्णा कृष्णा हरे हरे’, असे संकीर्तन करण्यात आले.
३. या प्रसंगी बांगलादेशाच्या ध्वजावर उभे राहून हिंदुत्वनिष्ठांनी संतप्त घोषणाबाजी केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य घडामोडी
१. कागल बसस्थानकाजवळ सकल हिंदु समाजाच्या वतीने झालेल्या आंदोलनात बांगलादेशाचा ध्वज जाळण्यात आला आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
२. चिन्मय कृष्णदास यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ मलकापूर येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीकडून आंदोलन करण्यात आले.
कागल – कागल बसस्थानकाजवळ सकल हिंदु समाजाच्या वतीने झालेल्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वश्री विनायक आवळे, भाजपचे अरुण सोनुले, मनोज कडोले, शिवसेनेचे इंद्रजीत पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेे प्रभाकर थोरात, म्हाळू करिकटे, विवेक कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रणित कुन्नूर, धनाजी पोवार, अनुप गुदले, हिंदु जनजागृती समितीचे बाबासाहेब भोपळे, हिंदु राष्ट्र समन्वयक समितीचे किरण कुलकर्णी, सनातन संस्थेचे दीपक भोपळे, भारतीय किसान संघाचे बाबय्या स्वामी, बजरंग दलाचे रोहित मोरे, राजू भोजे, दिलीप पाटील, अशोक माळी, धर्मजागरणचे प्रणव निंबाळकर, श्री. प्रणव भिवसे, संदीप आवळे आणि विश्व हिंदु परिषदेचे अरुण कुलकर्णी यांची उपस्थिती होती. नायब तहसीलदार श्री. ज्ञानेश्वर शेळकंदे यांनी निवेदन स्वीकारले.
चिन्मय कृष्णदास प्रभु यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ मलकापूर येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीकडून आंदोलन करण्यात आले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वश्री महेश विभूते, अनिल कुलकर्णी, भाजपचे राजू प्रभावकर, मधुकर लाड, सनातन संस्थेचे वैद्य संजय गांधी आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रसाद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी सर्वश्री चारुदत्त पोतदार, जितेंद्र पंडित, सुधाकर मिरजकर, किशोर तोडकर, रूपेश वारंगे आणि महेश गांगण उपस्थित होते. आंदोलन झाल्यावर शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चहाण यांना निवेदन देण्यात आले.