S Jaishankar On Trump Victory : डॉनल्ड ट्रम्प यांच्यामुळे आम्ही चिंतित नाही ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प व भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

मुंबई – आज जगभरातील देश अमेरिकेविषयी काळजीत आहेत; पण आपण (भारत) नाही. निकालांनंतर डॉनल्ड ट्रम्प यांनी अभिनंदन स्वीकारण्यासाठी उचललेल्या पहिल्या ३ दूरभाष संपर्कांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश होता, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले. ते येथे आदित्य बिर्ला स्कॉलरशिप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी हार्वर्ड विद्यापिठाचे प्राचार्य आणि राजकीय तत्वज्ञ मायकल जे. सँडल हेदेखील उपस्थित होते.

सध्या भारताकडे जगभरातील देशांचे लक्ष !

डॉ. जयशंकर यांना ‘डॉनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे भारत-अमेरिका संबंधांवर कोणते परिणाम होतील ?’, अशी विचारणा करण्यात आली. यावर जयशंकर म्हणाले की, खरेतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी येणार्‍या अनेक प्रमुखांशी चांगले संबंध ठेवले आहेत. अतिशय स्वाभाविक पद्धतीने ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी असणारे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करतात. जगभरातील देशांचे लक्ष सध्या भारताकडे असून भारताच्या धोरणाचे कौतुक केले जाण्यामागे आपण आर्थिक धोरणांवर केंद्रित केलेले लक्ष कारणीभूत आहे. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण एकमेकांना केवळ सैनिकी किंवा राजकीय सामर्थ्य यांच्या आधारावर जाणत नसून तंत्रज्ञान, आर्थिक क्षमता, मनुष्यबळ आणि सामाजिक सुधारणा ही सूत्रेही महत्त्वाची मानली जातात. कोणताही देश एकाच क्षेत्रातील सामर्थ्याच्या जोरावर विकसित होऊ शकत नाही.