खलिस्तानची मागणी : इतिहास आणि घटनाक्रम !

खलिस्तानी आतंकवादी, देशातील आणि भारताबाहेरील समर्थक यांच्यावर सरकारने धडक कारवाई करून हिंसक चळवळीचा कायमचा बंदोबस्त करावा !

सध्या कॅनडा समवेत भारताचे संबंध ताणलेले आहेत. कॅनडा येथील खलिस्तानी समर्थक, खलिस्तानी आतंकवादी तेथील सरकारला भारताला विरोध करण्यात भडकावत आहेत. ‘खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याच्या कॅनडामध्ये झालेल्या हत्येत भारत सरकारचा हात आहे’, असा सातत्याने खोटा दावा कॅनडा करत आहे. त्यामुळेच भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव वाढला आहे. या सर्वांच्या केंद्रस्थानी भारतात खलिस्तानच्या मागणीची चळवळ आहे. खलिस्तान म्हणजे शिखांसाठी वेगळ्या भूप्रदेशाची मागणी आहे. या खलिस्तानविषयी अवगत करण्याचा लेखाच्या माध्यमातून केलेला प्रयत्न !

श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल.

‘खलिस्तान’च्या मागणीसाठी आंदोलन करतांना शीख

१. शीख साम्राज्याचा इतिहास !

श्री. यज्ञेश सावंत

वर्ष १८२३ मध्ये महाराजा रणजितसिंह हे शीख साम्राज्यावर राज्य करत होते. हे साम्राज्य भारताच्या जम्मू- काश्मीरचा भाग, सध्याचा पंजाब, पाकमधील पंजाब आणि पाकचा काही भाग इथपर्यंत होते. महाराजा रणजितसिंह यांच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी त्यांचे राज्य कह्यात घेतले आणि राजा रणजितसिंह यांच्या मुलांना इंग्लंडमध्ये शिकण्याच्या नावाखाली पाठवून दिले अन् त्या प्रदेशावर स्वत:ची सत्ता स्थापन केली.

या राज्यात इंग्रजांनी शिखांच्या अनेक गुरुद्वारांवर ताबा मिळवला होता. त्या ठिकाणी स्थानिक पुजार्‍यांना म्हणजे महंतांना गुरुद्वाराचे दायित्व दिले होते. या पुजार्‍यांकडे गुरुद्वारांचा ताबा शिखांना आवडला नाही आणि त्यांच्यातील महत्त्वाच्या लोकांनी वर्ष १९२० मध्ये अकाली चळवळ चालू केली अन् एकत्र येऊन ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी’ची (‘एस्.जी.पी.सी.’ची) स्थापना केली. त्यांनी गुरुद्वारांमधून पुजार्‍यांना हटवले आणि तेथे त्यांच्या लोकांना नियुक्त केले. अशा प्रकारे शिखांनी पुन्हा गुरुद्वारांना नियंत्रणात घेतले.

२. स्वतंत्र शीख राज्याची मागणी !

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पंजाब पुन्हा आपल्याला पूर्वीप्रमाणे स्वतंत्र मिळणार, असे शिखांना वाटत होते. त्या वेळी, म्हणजे वर्ष १९४६ च्या सुमारास भारताच्या फाळणीची मागणी जोर धरू लागली होती. इंग्रज भारत सोडत असतांना भारताची फाळणी झाली, तर शिखांनी ‘शिखिस्ताना’ची मागणी केली; अन्यथा भारतासमवेत रहाण्यात त्यांना काहीच अडचण नव्हती. मुसलमानांनी इंग्रजांकडे फाळणीची मागणी केली होती. ‘मुसलमानांना पाकिस्तान, हिंदूंना हिंदुस्थान मग शिखांना काय ?’, असा प्रश्न उपस्थित करून ‘शिखिस्तान’ची मागणी होती. भारताची फाळणी झाली आणि तेव्हा सर्वांत अधिक हानी शिखांची झाली; कारण पंजाबमधील ६२ टक्के भाग पाकमध्ये गेला. तेथील शिखांना त्यांचे अनेक गुरुद्वारा, संपत्ती, घरे सोडून जीव वाचवून भारतात यावे लागले. वर्ष १९४१ मध्ये लोकसंख्या मोजणी झाली होती, त्यात पंजाब भागात मुसलमान ५९ टक्के, हिंदु ३० टक्के आणि शिख केवळ १५ टक्के होते.

फाळणीनंतर भारतात राहिलेल्या पंजाब भागात निर्वासित शीख आणि स्थानिक शीख एकत्र आल्यावर त्यांची संख्या अधिक झाली अन् त्यांनी वेगळ्या राज्याची मागणी केली. इंग्रजांनी शिखांना धोका देऊन पंजाब घेतला होता आणि त्यानंतर जातांना पंजाब शिखांना दिला पाहिजे, अशी अपेक्षा होती. ती पूर्ण झाली नाही. फाळणीच्या नंतर शिखांना पंजाबमध्ये त्यांच्यासाठी राज्य मिळेल, असे वाटत होते; मात्र ते पूर्ण होतांना दिसत नव्हते. शीख अन्य कारणांमुळेही नाखूश होते; कारण जडवाहतुकीवर शिखांचा एकाधिकार होता, तो सरकारी नियमांमुळे दूर झाला. देशाच्या काही भागांमध्ये शिखांचे वाहतुकीवरील प्राबल्य दूर झाले. त्या ठिकाणी इतरांना संधी मिळाल्या.

सैनिकांमध्ये शिखांना प्राधान्य दिले जात होते, तेही नंतर न्यून होऊन इतरांनाही संधी मिळू लागली. तेव्हा शीख समाजातील धुरिणांना वाटू लागले की, आपल्या समाजावर अन्याय होत आहे आणि त्यासाठी वेगळे राज्य पाहिजे.

३. हिंसक संघर्ष !

केंद्र सरकारने काही काळाने शीख बहुसंख्य असलेल्या भागासाठी ‘पतियाळा अँड इस्ट पंजाब स्टेट्स युनियन’ म्हणून मान्यता दिली; मात्र अकाली दलाची वाढती शक्ती पाहून काँग्रेसने ते रहित केले. वर्ष १९५६ मध्ये सरकारने ‘स्टेट रिऑर्गनायझेशन’  कायदा आणला. त्यानुसार भाषिक आधारावर राज्यांचे पुनर्निर्माण करण्यात आले, म्हणजे ज्या भागात अधिक संख्येने भाषा बोलणारे लोक आहेत, त्यांच्या भागाला संबंधित राज्याचे नाव देण्यात आले. मराठी लोकांसाठी महाराष्ट्र, तमिळींसाठी तमिळनाडू इत्यादी. तेव्हा पंजाब येथून मागणी होती की,हिंदी  बोलणारा हरियाणा वगळता पंजाबी लोकांसाठी पंजाब सिद्ध करून द्या; मात्र ही मागणी रहित करण्यात आली. त्यातून पुन्हा वातावरण बिघडू लागले. अकाली दलाचे मास्टर तारासिंह यांनी सांगितले, ‘आता पुष्कळ झाले आम्हाला वेगळा प्रांत मिळाल्यासच पंजाबी संस्कृती टिकून राहील.’ त्यानंतर काही प्रमाणात शीख आणि हिंदु यांच्यात दंगली चालू झाल्या. ‘पंजाबी सुबा चळवळी’ने त्यातून जन्म घेतला.

वर्ष १९५५ ते १९६५ पर्यंत अशी छोटी-मोठी आंदोलने चालू होती. जेव्हा वर्ष १९६५ मध्ये भारत-पाक यांच्यात युद्ध झाले, तेव्हा ही सर्व आंदोलने थांबवण्यात आली. वर्ष १९६५ मध्ये पंजाबी सैनिकांनी युद्धात पराक्रम गाजवला. त्यानंतर शिखांचे महत्त्व लक्षात आले आणि त्यांची पंजाब प्रांताच्या विभाजनाची मागणी मान्य करून पंजाब, हरियाणा अन् हिमाचल प्रदेश अशा ३ राज्यांमध्ये विभागणी करण्यात आली. चंडीगडमध्ये पुन्हा अडचण होती. ५५ टक्के हिंदी भाषिक लोकसंख्या असल्यामुळे तो केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आला.

यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये अकाली दल मोठ्या संख्येने जागा जिंकून सत्तेवर आला; मात्र तो कधीच ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही. ही स्थिती वर्ष १९९७ पर्यंत तशीच होती. त्यामागे काँग्रेसच्या कारवाया होत्या. यामुळे काँग्रेसवर आरोप होत होते की, तिच्यामुळे सरकार पडते. वर्ष १९७२ मध्ये अकाली दल निवडणूक हरला. याच कालावधीत अकाली दलाने ‘अनंतपूर साहिब रिझोल्युशन’ हा मसुदा सिद्ध केला होता. यामध्येही वेगळ्या देशाची मागणी नव्हती, तर वेगळे राज्य हवे होते. पंजांबमध्ये अधिकतर धर्माच्या आधारावर राजकारण चालते. याची जाणीव अकालीसह काँग्रेसलाही होती आणि त्या दृष्टीने लाभ करून घेतला.

४. भिंद्रनवाल्याचा उदय !

अकालीचा पंजाब येथील लोकांवर वाढता पगडा हटवण्यासाठी काँग्रेस संधी शोधत होती. अशा वेळी तिला अकालीहून अधिक धार्मिक कट्टर चेहरा हवा होता आणि येथे त्यांना जर्नेलसिंह भिंद्रनवाले ही कट्टर धार्मिक व्यक्ती सापडली. पंजाबमध्ये धार्मिक आणि अन्य शिक्षण देणार्‍या काही संस्था कार्यरत होत्या. त्यातील ‘दमदमी तस्काल’ ही भिंडर गावातील होती. त्यामुळे तेथे रहाणार्‍यांना ‘भिंडरवाले’, असे संबोधले जायचे. त्यांना लोक ‘संत जर्नेलसिंह भिंद्रनवाले’ असे आदराने म्हणायचे. ते कट्टर धार्मिक होते. शीख आणि निरंकारी शीख यांच्यात वैचारिक मतभेद आहेत. शीख त्यांच्या १० गुरूंच्या व्यतिरिक्त अन्य कुणाला गुरु न मानता ग्रंथानुसार उपदेश गुरु मानतात, तर निरंकारी शीख सध्या कार्यरत असणार्‍यांना गुरु मानतात. वर्ष १९७८ मध्ये निरंकारी शीख यांनी एक कार्यक्रम ठेवला होता. भिंडरवालेंनी ‘या कार्यक्रमाला शिखांनी जाऊ नये’, असे सांगितले होते. या वेळी दोन्ही समुदायांमध्ये हाणामारी होऊन त्यात १७ हून अधिक लोक मारले गेले. त्यानंतर पुन्हा २ वर्षांनी निरंकारी शिखांचे प्रमुख बाबा गुरुबच्चनसिंह यांची त्यांच्या सुरक्षारक्षकांसह हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांमध्ये भिंद्रनवाले यांचे नाव येऊनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही.

वर्ष १९९१ मध्ये जनगणना आयोजित करण्यात आली होती. याविषयी भिंडरवाले यांनी पंजाबमधील लोकांना ‘तुमची मातृभाषा विचारल्यास पंजाबी सांगा’, असे आवाहन केले होते. त्यामुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण होते. तेव्हा ‘पंजाब केसरी’ या नियतकालिकाचे संपादक लाला जगत नारायण यांनी हिंदूंना सांगितले, ‘घाबरण्याची आवश्यकता नाही. त्यांना विचारल्यास ‘हिंदी भाषा’, असे सांगू शकता’, असे सांगितले. (१७.१०.२४)

यामुळे त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या सूत्रावरून आता भिंद्रनवालेवर कारवाई झालीच पाहिजे, असा सरकारवर दबाव निर्माण झाला. त्यामुळे भिंद्रनवाले याला अटक करण्यात आली. या अटकेनंतर पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला, अनेकांचा मृत्यू झाला. परिणामी भिंडरवाल्यांना सोडावे लागले. काँग्रेस आणि भिंडरवाले यांच्यात येथेच बिनसते. लोकांचा मोठा पाठिंबा भिंडरवाले यांना मिळाला आणि अकाली दलालाही त्यामुळे भिंद्रनवाले समवेत हातमिळवणी करावी लागली. काँग्रेसपासून दूर व्हावे लागते. दोघांनी मिळून ‘धर्मयुद्ध मोर्चा’ उघडला आणि ‘अनंतपूर साहिब रिझोल्युशन’ची मागणी करण्यात आली. त्यासाठी मोर्चासह काही ठिकाणी हिंसाचार चालू झाला.

वर्ष १९८२ मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री दरबार सिंह यांच्यावर आक्रमण झाले. देहलीतील ‘एशियन गेम्स’च्या वेळीही भिंडरवालेंच्या चकमकी झाल्या. अनेक ठिकाणी बँकांवर दरोडे पडत होते, विमानांचे अपहरण करण्यात येऊन ती पाकला नेण्यात आली. वर्ष १९८३ मध्ये अमृतसरहून देहली येथे जाणार्‍या एका बसचे अपहरण करून त्यातील हिंदु प्रवाशांना खाली उतरवून गोळ्या घालण्यात आल्या. अशा अनेक घटना घडल्यामुळे पंजाब येथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. याच वेळी, म्हणजे १५ डिसेंबर १९८३ मध्ये भिंडरवालेंनी काम करण्याची जागा सुवर्णमंदिरातील अकाल तख्त येथे हालवली. तेथे कुणी राजकीय नेता येण्याचे धाडस करणार नाही, असे भिंडरवालेंना वाटत होते. त्याने तेथे संरक्षणासाठी पुष्कळ शस्त्रास्त्रे जमा केली होती. भारतीय सैन्यातील निवृत्त मेजर जनरल शहाबेग सिंह, निवृत्त मेजर जनरल जसवंत सिंह भुल्लर यांनी भिंद्रनवालेच्या कार्यकर्त्यांना लढण्याचे प्रशिक्षण दिले होते.

५. ‘ऑपरेशन ब्लुस्टार’ !

‘अनंतपूर साहिब रिझोल्युशन’ काही अटींसह लागू करू या दृष्टीने पुन्हा एकदा इंदिरा गांधीनी भिंद्रनवाल्याकडे पाठवले होते. अकाल तख्तने ते मानले; मात्र भिंद्रनवाल्यांनी धुडकावले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ‘ऑपरेशन ब्लुस्टार’ ही सैन्याची कारवाई करण्यात आली. मेजर जनरल कुलदीप सिंह ब्रार यांच्यावर दायित्व होते. १ जूनला पंजाबमध्ये संचारबंदी लावून सर्व स्थानिक आणि विदेशी पत्रकार यांना एका ठिकाणी बंदिस्त करण्यात आले. सुवर्णमंदिराला चहुबाजूंनी घेरण्यात आले. रणगाड्यांनी बाँबवर्षाव केला; मात्र भिंद्रनवाल्याकडे सर्व शस्त्रसामुग्री होती आणि त्यांनी भारतीय सैन्याला कल्पनेपलीकडे विरोध करून मोठी हानी केली. तेव्हा हेलिकॉप्टरमधून पाहिल्यावर मोठ्या संख्येने शस्त्रधारी शीख पंजाबच्या विविध भागांतून सुवर्णमंदिराकडे मार्गस्थ झाल्याने लवकरात लवकर ही मोहीम पूर्ण करण्यासाठी दबाव वाढला. अखेर सैन्याने भिंद्रनवाल्यासह शेकडो शिखांना ठार केले; मात्र यामध्ये सुवर्णमंदिराची पुष्कळ हानी झाली आणि याचा सूड घेतला गेला पाहिजे, ही भावना शिखांमध्ये बळावली. सैन्यातील शीख रेजिमेंटने उठाव करून अधिकार्‍यांना ठार केले आणि अमृतसरकडे कूच केली. यामुळे सैन्याने ‘ऑपरेशन वूडरोझ’ चालू करून शस्त्रसज्ज शिखांकडून शस्त्रे काढून घेतली.

यानंतर ३१ ऑक्टोबर १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांकडूनच हत्या करण्यात आली. तेव्हा देहलीमध्ये शीखविरोधी दंगली उसळल्या. यामध्ये सहस्रो शिखांना काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते यांनी मारले, जाळपोळ केली. यातील सज्जनकुमार, जगदीश टायटलर या दोषींना काँग्रेसने निवडणुकीसाठीही उभे केले होते. इंदिरा गांधींनंतर राजीव गांधी यांनी शिखांसमवेत संबंध सुधारण्यासाठी ‘राजीव लोंगेवाल मसुदा’ मान्य केला; मात्र शिखांना यातील प्रावधाने (तरतुदी) मान्य नसल्याने पुन्हा हिंसाचार झाला. पुन्हा खलिस्तान समर्थक शीख सुवर्णमंदिरात शिरल्यामुळे ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर’ हे वर्ष १९८६ आणि १९८८ मध्ये करावे लागले. यानंतर काही काळ गेला, अधूनमधून खलिस्तानची मागणी झाली.

६. हिंसक चळवळीचा कायमचा बंदोबस्त हवा !

वर्ष २०१५ मध्ये एक घटना घडते की, फरिदकोट येथील एका गावातील गुरुद्वारातून ‘गुरु ग्रंथसाहिब’ची चोरी झाली. त्यानंतर पुन्हा ‘शिखांसाठी भारत असुरक्षित’, अशी आवई उठवली गेली. वर्ष २०२२ मध्ये तेथील एक गायक दीप सिद्धू ‘वारीस पंजाब दे’, ही संघटना चालू केली. दीप सिद्धूने नरेंद्र मोदी यांच्यावर पुष्कळ टीका केली होती. त्यांचा एका अपघातात मृत्यू झाल्यावर दुबई येथून आलेल्या अमृतपालसिंह याने ‘वारीस पंजाब दे’ची कमान सांभाळली. त्यांनी भिंद्रनवाले यांना आदर्श मानले आणि त्यांच्याप्रमाणेच लोकांना सांगण्यास प्रारंभ केला. अमृतपालसिंह याच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली, तेव्हा स्वत: अमृतपाल सहस्रो शिखांना घेऊन स्थानिक पोलीस ठाण्यावर चाल करून गेला आणि साथीदाराला सोडवून आणले. पोलीस या वेळी अकार्यक्षम ठरले.

अमृतपाल आता खलिस्तानची मागणी करू लागला आहे आणि त्यालाही लोकांचे मोठे समर्थन मिळणे, ही भारताची डोकेदुखी ठरत आहे. कॅनडातील खलिस्तान समर्थकांकडून इंग्लंडमधील भारतीय उच्चायुक्ताचे कार्यालय, कॅनडा येथील कार्यालय यांपुढे जाळपोळ करण्यात आली आहे. अमेरिका आणि कॅनडा येथे आश्रय घेतलेला आतंकवादी गुरुपतवंतसिह पन्नू हा दर काही दिवसांनी भारताला धमकावत आहे. कॅनडा खलिस्तानांची साथ देत भारताशी शत्रूत्व पत्करत आहे, तर अमेरिका कॅनडाची साथ देत आहे. भारताने आता आक्रमकता दाखवून खलिस्तानी आतंकवादी अन् भारताबाहेरील समर्थक यांच्यावर धडक कारवाई करून हिंसक चळवळीचा कायमचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा नवीन भिंद्रनवाले निर्माण होऊन भारताच्या सुरक्षेपुढे आव्हान निर्माण करतील.

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (१७.१०.२०२४)