Maxime Bernier On Nijjar : पंतप्रधान ट्रुडो इतर वादांपासून लक्ष वळवण्यासाठी निज्जर याच्या हत्येचा वापर करत आहेत !

कॅनडाच्या विरोधी पक्षाच्या नेत्याचा घरचा अहेर !

ओटावा (कॅनडा) – कॅनडातील ‘पीपल्स पार्टी ऑफ कॅनडा’ या विरोधी पक्षाचे नेते मॅक्सिम बर्नियर यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यावर ‘त्यांनी खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येचा वापर इतर वादांपासून लक्ष हटवण्यासाठी केला’, असा आरोप केला. बर्नियर यांनी ट्रुडो सरकारला ‘खलिस्तानी आतंकवाद्याला देण्यात आलेली मरणोत्तर नागरिकता काढून घेऊन मागील प्रशासकीय चूक सुधारण्यात यावी’, असे आवाहन केले आहे.

रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी सांगितले की, त्यांनी कॅनडातील भारताचे उच्चायुक्त आणि इतर ५ मुत्सद्दी यांना जून २०२३ मध्ये हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी संभाव्य संशयित म्हणून ओळखले आहे. त्यांना भारत सरकारच्या हस्तकांद्वारे कॅनडाच्या लोकांविरुद्ध कारवाईचे पुरावे सापडले आहेत.

मॅक्सिम बर्नियर यांनी सांगितले की,

१. अद्याप पुरावे देण्यात आलेले नाहीत !

भारतीय मुत्सद्दी आपल्या देशात गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतले आहेत, हा रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांचा आरोप जर खरा असेल, तर त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. तथापि अद्याप आम्हाला कोणतेही पुरावे दिले गेले नाहीत आणि ट्रूडो या संकटाचा वापर इतर वादांपासून लक्ष विचलित करण्यासाठी करत आहेत.

२. निज्जरला बनावट कागदपत्रांच्या आधारे नागरिकत्व देण्यात आले !

या वादाचा केंद्रबिंदू असलेला खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर हा कॅनडाचा होता, हा अपसमज दूर व्हायला हवा. तो प्रत्यक्षात एक परदेशी आतंकवादी होता, ज्याने वर्ष १९९७ पासून कॅनडामध्ये आश्रय घेण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला होता. त्याचे अर्ज फेटाळले गेले; परंतु तरीही त्याला या देशात रहाण्याची अनुमती देण्यात आली आणि वर्ष २००७ मध्ये त्याला नागरिकत्व देण्यात आले. सध्या सहस्रो लोक फसव्या कागदपत्रांचा वापर करून कॅनडात आश्रय घेत आहेत.

३. संबंध धोक्यात आणण्यापेक्षा तोडगा काढून भारत सरकारसमवेत काम करावे !

हे सर्व घडत आहे; कारण कॅनडाने अनेक दशकांपासून जाणूनबुजून या परदेशी लोकांना आणि त्यांच्या जातीय संघर्षांना आपल्या देशात आमंत्रित केले आहे. आपण ही गंभीर चूक जाणली पाहिजे आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारत सरकारसमवेत काम केले पाहिजे.

संपादकीय भूमिका

यातून ट्रुडो यांचा राजकीय स्वार्थ उघड होतो ! या स्वार्थापोटी भारतासमवेतचे संबंध बिघडवून कॅनडाच्या जनतेशी ते द्रोह करत आहेत, हे तेथील जनतेने लक्षात घेतले पाहिजे !