Canada PM’s Unabashed Acceptance : पुरावे नसतांना आम्ही भारतावर आरोप केले ! – जस्टिन ट्रुडो

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे निलाजरी स्वीकृती !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

ओटावा (कॅनडा) / नवी देहली – खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणात भारतावर आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आता सपशेल माघार घेतली आहेत. या सगळ्या प्रकाराच्या संदर्भात कॅनडाच्या अंतर्गत चौकशी समितीसमोर सविस्तर माहिती देतांना जस्टिन ट्रुडो म्हणाले की, मला हे सांगण्यात आले होते की, कॅनडामधून आणि आमच्या इतर ५ मित्र देशांमधून आलेल्या गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचे ढळढळीतपणे दिसून येत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही तातडीने भारत सरकारशी संवाद साधला. भारत सरकारने आमच्याकडे पुरावे मागितले. त्यावर आम्ही ‘पुरावे तर तुमच्या सुरक्षा यंत्रणेमध्येच आहेत’, असे उत्तर दिले; पण भारत सरकार पुरावे मागण्यावर ठाम होते; पण तेव्हा आमच्याकडे सबळ पुरावे नव्हते, तर केवळ  गुप्तचर यंत्रणेकडून आलेली माहिती होती. त्यामुळे आम्ही भारताला सांगितले की, आपण एकत्र मिळून तुमच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेऊ, कदाचित् आपल्याला तिथे पुरावे सापडतील. (मुळात आरोप कॅनडाने केलेले असल्याने भारताने पुरावे का म्हणून शोधायचे ? उद्या भारताने कॅनडावर एखाद्या प्रकरणात खोटे आरोप करून पुरावे कॅनडालाच शोधण्यास सांगितले, तर ते त्याला चालेल का ? – संपादक)

भारत-कॅनडा यांच्यातील संबंधांच्या हानीला ट्रुडोच उत्तरदायी ! – भारत

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल

ट्रुडो यांच्या या माहितीवरून त्यांनी भारतावर खोटे आरोप केले आहेत, हे स्पष्ट झाले आहे. ट्रुडो यांच्या या माहितीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, आम्ही आज जे ऐकले तेच सांगत आहोत की, ‘कॅनडाने भारत आणि भारतीय मुत्सद्दींवर केलेल्या गंभीर आरोपांचे समर्थन करणारे कोणतेही पुरावे सादर केले नाहीत.’ तेच ट्रुडो यांनी सांगितले आहे.

ट्रुडो यांच्या या वागणुकीमुळे भारत-कॅनडा संबंधांच्या झालेल्या हानीला एकटे पंतप्रधान ट्रुडो हेच उत्तरदायी आहेत.

संपादकीय भूमिका

  • एखाद्या देशाच्या प्रमुखच इतका दायित्वशून्य असेल, तर तो देशाचा कारभार कसा हाकत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! भारतावरील खोट्या आरोपांमुळे कॅनडाची जगभरात अपकीर्तीच झाली आहे. तसेच त्याचे भारताशी असलेले संबंधही बिघडले आहेत. कॅनेडातील नागरिकांनी आता खलिस्तानप्रेमी ट्रुडो यांना त्यागपत्र देण्यास भाग पाडले पाहिजे !
  • कॅनडाच्या प्रकरणी भारताने आरंभीपासून रोखठोक भूमिका घेतल्यानेच आज कॅनडा नरमला आहे. त्यामुळे अशांना गांधीगिरीची भाषा नव्हे, तर जी भाषा समजते, त्या भाषेत सांगावे लागते, हे सिद्ध होते !
  • ट्रुडो यांच्या आरोपांवरून भारतावर दबाव आणणार्‍या अमेरिकेने आता भारताची क्षमा मागितली पाहिजे ! भारताने तशी मागणीच केली पाहिजे !