Canada Khalistani Demand Ban RSS : कॅनडामध्‍ये रा.स्‍व. संघावर बंदी घालण्‍याची तेथील खलिस्‍तानवादी शीख खासदाराची भारतद्वेषी मागणी !

जगमीत सिंह

ओटावा (कॅनडा) – कॅनडातील हाऊस ऑफ कॉमन्‍सचे सदस्‍य आणि न्‍यू डेमोक्रॅटिक पार्टीचे (एन्.डी.पी.चे) नेते जगमीत सिंह यांनी कॅनडातील राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघावर देशात बंदी घालण्‍याची मागणी केली आहे. सिंह हे कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांच्‍या जवळचे खासदार म्‍हणून ओळखले जातात. सिंह यांनी भारतीय मुत्‍सद्द्यांच्‍या हकालपट्टीच्‍या संदर्भात हे विधान जारी केले. जगमीत सिंग म्‍हणाले की, कॅनडातील शीख समुदायाला भारतीय अधिकार्‍यांकडून भीती, धमकावणे, छळवणूक आणि हिंसाचार यांचा सामना करावा लागत आहे. शिखांकडे खंडणीची मागणी केली जात आहे.

१. कॅनडामधील भारतीय दूतावासातील मुत्‍सद्द्यांच्‍या हकालपट्टीचे समर्थन केले. त्‍यासह कॅनडात कार्यरत असलेल्‍या राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघावर बंदी घालण्‍याची मागणीही त्‍यांनी केली. कॅनडाच्‍या भूमीवर कुणी कॅनडाविरोधी कारवाया करत असेल, तर त्‍याच्‍यावर कॅनडा सरकारने कठोर कारवाई करणे आवश्‍यक आहे, असेही ते म्‍हणाले.

२. खलिस्‍तानवादी हरदीपसिंह निज्‍जर याच्‍या हत्‍येमागे भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांचा हात होता, याविषयी कॅनडा सरकारकडे सबळ पुरावे आहेत, असेही सिंह म्‍हणाले.

३. जस्‍टिन ट्रुडो यांच्‍या पक्षाने एन्.डी.पी.च्‍या साहाय्‍याने सत्ता हस्‍तगत केली होती. मध्‍यंतरी सिंह यांनी कॅनडा सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता; मात्र तरीही ट्रुडो आणि सिंह यांचे संबंध चांगले असल्‍याचे बोलले जाते. पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकीत पुन्‍हा सत्ता मिळवण्‍यासाठी ट्रुडो यांना सिंह यांच्‍या एन्.डी.पी. पक्षाच्‍या पाठिंब्‍याची आवश्‍यकता लागू शकते. त्‍यामुळे सिंह यांच्‍या खलिस्‍तानी कारवायांना ट्रुडो नेहमीच खतपाणी घालत असल्‍याचे बोलले जात आहे.

संपादकीय भूमिका

  • कॅनडातील राजकीय पद आणि अधिकार यांचा वापर भारत आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना यांच्‍या विरोधात करणारे जगमित सिंह यांच्‍यासारख्‍या खलिस्‍तानवाद्यांना जन्‍माची अद्दल घडवण्‍यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?
  • खलिस्‍तानवादी केवळ स्‍वतंत्र खलिस्‍तानसाठी कार्यरत नसून, त्‍यांचा मूळ उद्देश त्‍यांच्‍या मार्गावर येणार्‍या हिंदूंना संपवणे हाही आहे. जनमित सिंह यांच्‍या या हिंदुद्वेषी मागणीवरून हेच दिसून येते !