Maa Bamleshwari Prasad Making In Poultry Farm : छत्तीसगड येथील मां बमलेश्‍वरी देवीच्या मंदिर परिसरात विकण्यात येणारा प्रसाद पोल्ट्री फार्ममध्ये बनत असल्याचे उघड !

  • प्रसादाची असंख्य पाकिटे जप्त

  • पोल्ट्री फार्मचा मालक मझहर खान

मां बमलेश्‍वरी देवी मंदिर, जप्त केलेली प्रसादाची पाकिटे व प्रसाद बनत असलेला पोल्ट्री फार्म

राजनांदगाव (छत्तीसगड) – अन्न विभागाच्या पथकाने २६ सप्टेंबरला येथील राका गावात ‘एव्हॉन ट्रेडर्स’च्या पोल्ट्री फार्मवर धाड घातली असता, तेथे प्रसादाची असंख्य पाकिटे सापडली. डोंगरगड येथील प्रसिद्ध शक्तिपीठ मां बमलेश्‍वरी देवीच्या मंदिराच्या परिसरात असलेल्या दुकानांमध्ये हा प्रसाद पुरवला जातो. पोल्ट्री फार्म (कुक्कुटपालन केंद्र) चालकाकडून वेलचीच्या बियांचा प्रसाद बनवला जात होता. पोल्ट्री फार्मसह अनुमाने ५ सहस्र चौरस फूट परिसरात प्रसाद बनवण्याचा कारखाना चालू असल्याचे आढळून आले. येथे ‘श्री भोग प्रसाद’ या नावाने प्रसाद बनवले जात होते. या पोल्ट्री फार्मचा मालक मझहर खान असल्याचे सांगितले जात आहे.

१. ज्या पाकिटांमध्ये वेलच्या बिया विकल्या जात होत्या, त्या पाकिटावर ‘स्वच्छ आणि शुद्ध वातावरणात उत्पादन केले’ असे लिहिले आहे. जिथे प्रसाद बनवला जातो, तिथे कुक्कुटपालनही होते. अन्न विभागाच्या पथकाने वेलचीच्या बियांचे नमुने घेतले आहेत. प्राथमिक चौकशीमध्ये अन्न विभागाच्या अधिकार्‍यांना वेलची बियांच्या उत्पादनाशी संबंधित कोणतीही अनुमती असणारी कागदपत्रे सापडली नाहीत.

२. डोंगरगड जिल्हा अन्न सुरक्षा अधिकारी डोमेन धुर्वे यांनी पोल्ट्री फार्ममध्ये वेलचीच्या बिया सिद्ध केल्या जात असल्याची पुष्टी केली, तसेच येथून मोठ्या प्रमाणात प्रसादाची पाकिटे जप्त करण्यात आल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, कार्यरत कारखाना नोंदणीकृत नाही, तसेच ‘पॅकेजिं’गमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून आली. त्यात मानक, दिनांक, बॅच क्रमांक नमूद केलेला नाही.

३. आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात भेसळयुक्त प्रसाद आढळल्यानंतर छत्तीसगड राज्य सरकार सतर्क झाले आहे. राज्य सरकारने एक मार्गदर्शिका प्रसारित करत प्रसाद बनवतांना केवळ शुद्ध तूप वापरणे बंधनकारक केले आहे.

कोणत्याही संस्थेला प्रसाद बनवण्याचा कंत्राट दिलेले नाही ! – मंदिराचे विश्‍वस्त

बमलेश्‍वरी मंदिर विश्‍वस्त समिती डोंगरगडचे अध्यक्ष मनोज अग्रवाल म्हणाले की,  मां बमलेश्‍वरी मंदिरात प्रसादासाठी कोणतीही निविदा दिली जात नाही. केवळ एकाच संस्थेने किंवा कारखान्याने बनवलेला प्रसाद येईल आणि तोच प्रसाद मिळेल, असा येथे नियम नाही. येथे वर्षभर भाविकांनी अर्पण केलेले नारळ प्रसाद म्हणून वाटले जातात. नवरात्रीच्या काळात मंदिर परिसरात नारळ फोडण्यास मनाई असतांना प्रसाद म्हणून साखरेचे वाटप केले जाते.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या मंदिरांचा प्रसाद म्हणून वाटण्यात येणार्‍या पदार्थांची शुद्धता आणि पावित्र्य पडताळण्यासाठी आता सरकारने स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे !