Microsoft Server Down : मायक्रोसॉफ्‍टच्‍या ‘विंडोज’मध्‍ये तांत्रिक बिघाड !

  • जगभरातील विमान सेवा अनेक घंट्यांसाठी ठप्‍प !

  • ‘क्राउडस्‍ट्राईक’ आस्‍थापनाच्‍या नव्‍या ‘अपडेट’मध्‍ये मिळाले ‘बग’ (त्रुटी) !

नवी देहली – मायक्रोसॉफ्‍टची संगणक प्रणाली ‘विंडोज’मध्‍ये अचानक निर्माण झालेल्‍या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील विमान आस्‍थापने, प्रसारमाध्‍यमे आणि बँका यांचे काम १९ जुलैला अनेक घंट्यांसाठी ठप्‍प झाले. ही समस्‍या पुढे काही घंटे सुटली नव्‍हती. यामुळे विमान वाहतूक ठप्‍प झाली. जगभरातील कोट्यवधी लोकांना या समस्‍येमुळे त्रास झाला. अमेरिका, ऑस्‍ट्रेलिया, न्‍यूझीलंड, भारत यांच्‍यासह अनेक युरोपीय देशांमध्‍ये ही समस्‍या निर्माण झाली होती. सायंकाळी साधारण ५ च्‍या दरम्‍यान मायक्रोसॉफ्‍टच्‍या अधिकार्‍यांनी सांगितले की, आम्‍ही या समस्‍येवर मात केली असून अजूनही कुणाला समस्‍या येत असतील, तरी त्‍या लवकरच संपुष्‍टात येतील.

याआधी केंद्रीय नागरी हवाई उड्डयन राज्‍यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणी म्‍हटले की, जगभरात मायक्रोसॉफ्‍टची ‘क्‍लाऊड सेवा’ ठप्‍प झाल्‍यामुळे अनेक सेवा ठप्‍प झाल्‍या. या संपूर्ण समस्‍येवर आमचे मंत्रालय लक्ष ठेवून आहे.

भारतासह जगभरात असा बसला फटका !

१. भारतातील देहली, कोलकाता, मुंबई, पुणे आणि बेंगळुरू येथील विमानतळांवरील कामांना मोठा फटका बसला. विमान प्रवासाचे बुकिंग आणि ‘चेक-इन’ सेवा बंद झाल्‍यामुळे एअर इंडिया, इंडिगो, आकासा एअरलाईन्‍स आणि स्‍पाइसजेट या आस्‍थापनांची सेवा खंडित झाली. काही विमान आस्‍थापनांनी प्रवाशांना हाताने लिहिलेले बोर्डिंग पास देण्‍यास आरंभ केला होता. हाताने बोर्डिंग पास देण्‍याची पद्धत संगणक प्रचलित होण्‍याआधी वापरली जात असे.

२. वापरकर्त्‍यांना विविध ‘अ‍ॅप्‍स’ आणि सेवा यांमध्‍ये प्रवेश करण्‍यात समस्‍या आल्‍या.

३. केवळ विमानतळच नाही, तर विविध क्षेत्रातील व्‍यवसाय, बँका, दूरसंचार आस्‍थापने, दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी सेवा यांनाही या समस्‍येने ग्रासले होते.

तांत्रिकदृष्‍ट्या नेमके घडले तरी काय ?

• ‘क्राऊडस्‍ट्राईक’ नावाचे सायबर सुरक्षा पुरवणारे आस्‍थापन मायक्रोसॉफ्‍टलाही सुरक्षा उपाय प्रदान करते. त्‍यांच्‍या ‘फॅल्‍कॉन सेन्‍सर’शी संबंधित प्रोग्रॅमच्‍या अपडेटमध्‍ये एक मूलगामी त्रुटी (बग) आढळली. त्‍यामुळे ‘मायक्रोसॉफ्‍ट विंडोज’ प्रणालीचा वापर करणार्‍या जगभरातील अनेक आस्‍थापनांना विविध समस्‍यांना सामोरे जावे लागले.

• या समस्‍येमुळे ‘ब्‍ल्‍यू स्‍क्रीन ऑफ डेथ’ नावाची समस्‍या पहायला मिळाली. याअंतर्गत संगणक ‘क्रॅश’ अवस्‍थेत असल्‍याचे दिसते. यामुळे संगणक प्रणाली अचानक बंद होऊ शकते. तसेच त्‍यातील सर्व मजकूर (डेटा) ही पुसला जाऊ शकतो. संगणक चालू केल्‍यावर तुमच्‍यासमोर निळी स्‍क्रीन येते आणि तुम्‍हाला काहीतरी बिघाड झाला आहे, असे सांगून संगणक पुन्‍हा चालू करायचा का (रिस्‍टार्ट), असे विचारले जाते. या समस्‍येलाच ‘ब्‍ल्‍यू स्‍क्रीन ऑफ डेथ’ म्‍हटले जाते.