सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नाथ यांचे प्रदूषणाविषयी विधान

नवी देहली – देहलीतील प्रदूषणाची पातळी प्रतिदिन वाढत आहे. आपल्या मुलांना अशा वातावरणात वाढणे अस्वीकार्य आहे, जिथे त्यांना बाहेर खेळण्यासाठीदेखील मुखपट्टी (मास्क) घालावी लागते आणि लहान वयातच श्वसनाच्या आजारांची काळजी करावी लागते. देशातील नद्यांची स्थिती पाहून काळजी वाटते. त्या घाणीने भरलेल्या आहेत. जेव्हा मी या नद्यांच्या काठाकडे पहातो, तेव्हा मला जुन्या गोष्टी आठवतात. हे पाणी एकेकाळी फार जिवंत आणि शुद्ध होते. आपण त्यांचा अभिमान वाचवू शकत नाही, ही चिंतेची गोष्ट आहे, अशा शब्दांत सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नाथ यांनी खंत व्यक्त केली. ते येथील विज्ञान भवनात आयोजित ‘राष्ट्रीय पर्यावरण परिषद – २०२५’च्या उद्घाटन समारंभात बोलत होते. या वेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू होत्या.
न्यायमूर्ती नाथ पुढे म्हणाले की,
१. औद्योगिक कचर्यावर प्रक्रिया करणे, सांडपाण्याच्या पायाभूत सुविधा वाढवणे आणि स्थानिक समुदायांना नदीवरील स्वच्छता राखण्यासाठी प्रोत्साहित करणे महत्त्वाचे आहे.
२. वर्ष २०१० मध्ये स्थापन झाल्यापासून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आशेचा किरण म्हणून उदयास आले आहे. पर्यावरणीय वाद सोडवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सरकारने हरित तंत्रज्ञानाला प्रोत्साहन द्यावे. उद्योगांनी त्यांच्या पर्यावरणीय पाऊलखुणांविषयी काळजी घेतली पाहिजे.
३. उत्सर्जनाचे नियमन करण्यासाठी, स्वच्छ तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी आणि शाश्वत वाहतूक पर्यायांसाठी आपण एकत्र आले पाहिजे, जेणेकरून आपण श्वास घेत असलेल्या हवेशी तडजोड करावी लागणार नाही.