सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे ‘संगीतातून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’ या विषयावरील अमूल्य मार्गदर्शन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने संगीतातून ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना आणि संगीताशी संबंधित अन्य विषय’ यांवर संशोधनकार्य चालू आहे. या कार्यात सहभागी होण्यासाठी आतापर्यंत अनेक कलाकारांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला भेटी दिल्या आहेत. त्या वेळी त्या कलाकारांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाचा लाभ झाला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभणे, हा कलाकारांच्या भेटीतील परमोच्च आनंदबिंदू असल्याचे कलाकार अनुभवत असत. या सत्संगाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कलाकारांना ‘संगीतातून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ ‘संगीतातून साधना करू इच्छिणार्‍या व्यक्तींना व्हावा’, या दृष्टीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली मार्गदर्शनपर सूत्रे येथे दिली आहेत.

(भाग १)

१. कलाकाराची संगीतातून साधना होण्यासाठी त्याने करायच्या प्रयत्नांच्या संदर्भात केलेले मार्गदर्शन

१ अ. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून साधनेचा पाया पक्का झाल्यावरच कलेतून साधनेची इमारत उभी करता येणे सोपे असणे

कलाकारांचा प्रश्न : संगीताची साधना आणि अध्यात्माची उपासना याची सांगड घालून कलाकार कसा पुढे जाऊ शकतो?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : व्यक्तीने ईश्वरप्राप्तीसाठी स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे, हे पहिले पाऊल आहे. यामुळे साधनेचा पाया पक्का होतो. साधकांमध्ये स्वभावदोष असले, तर त्यांचा ईश्वराशी संवाद होऊ शकत नाही आणि अध्यात्मात पावलागणिक ईश्वर सांगेल, तसेच करायला हवे. त्यामुळे साधकाने पहिली २ – ४ वर्षे साधना करण्यासाठीच द्यायला हवीत. साधनेमुळे जिवातील सात्त्विकता वाढल्यावर त्याला आध्यात्मिक स्तरावर संगीत, नृत्य आणि नाट्य या कला सहजतेने शिकता येतात.

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

१ आ. शिष्याच्या साधनेचा पाया पक्का झाल्यावर गुरुच शिष्याला त्याच्या साधनेचा मार्ग दाखवत असणे : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करून साधकाच्या साधनेचा पाया पक्का झाला की, आध्यात्मिक गुरु त्याला सांगतात, ‘‘तू या कलेच्या माध्यमातून साधनेत पुढे जाऊ शकतोस.’’ कला शिकण्यासाठी आलेल्या शिष्याला मार्गदर्शन करण्यासाठी ती कला शिकवणार्‍या गुरूंचीही साधना असायला हवी. साधनेमुळे गुरूंची आध्यात्मिक पातळी चांगली असल्याने ते शिष्याने ‘कुठल्या मार्गाने पुढे जाणे योग्य आहे’, हे सांगू शकतात.

आताच्या काळात विद्यार्थी ठरवतो, ‘मला आधुनिक वैद्य, अभियंता किंवा अधिवक्ता व्हायचे आहे.’ याउलट अध्यात्मात गुरु ‘शिष्याने कोणत्या मार्गाने साधना केल्याने त्याची प्रगती होणार आहे’, याविषयी सांगतात. ‘असे सांगणारे गुरु भारतात आहेत’, हेच भारताचे वैशिष्ट्य आहे.

१ इ. कला शिकण्यासह आध्यात्मिक गुरु सांगतील त्याप्रमाणे साधना करून कलेला साधनेची जोड द्या ! : कलाकारांना आध्यात्मिक गुरु असल्यास त्यांनी गुरु सांगतील त्याप्रमाणे साधना करावी. गुरु तुमच्याकडून साधना करवून घेतील. ‘शिष्याला ईश्वराकडे नेणे’, हे गुरूंचे कार्यच आहे. गुरु जे शिकवतात, ते शिकायचे. गुरूंच्या संकल्पामुळेच शिष्याची प्रगती होत असते. कलाकाराच्या साधनेचा पाया पक्का हवा. त्याच्या साधनेचा पाया पक्का झाल्यावर त्याला कलेच्या माध्यमातून साधनेत पुढे जाणे सोपे जाते.

१ ई. कलेला साधनेची जोड दिल्यावर कलेत प्राविण्य मिळवणे आणि साधना होणे, हे दोन्ही साध्य होते ! : या एका जन्मात आधी १४ विद्या आणि ६४ कला यांतील कोणतीही एखादी कला शिकायची अन् त्यातून ईश्वरप्राप्ती करायची, असे शक्य होत नाही. कला आणि विद्या शिकत असतांना साधना केल्यास कलेतही प्राविण्य मिळते अन् साधनेतही प्रगती होते. ‘कोणता व्यवसाय करू ?’, असा प्रश्न पडलेल्या व्यक्तींनी ‘आधी पैसे कसे मिळवायचे ?’, ते शिकायला हवे. मग त्या व्यक्ती कोणताही व्यवसाय करू शकतील, त्याप्रमाणेच कलाकाराचा साधनेचा पाया पक्का असल्यास त्याला कोणत्याही कलेतून साधना करून ईश्वरप्राप्ती होऊ शकते.

१ उ. कलाकाराने कला सादर करतांना ‘मी केवळ भगवंतासाठीच कला प्रस्तुत करत आहे’, असा भाव अंतरी ठेवणे आवश्यक ! :  कलाकाराचा ‘प्रेक्षकांसाठी कला सादर करत नसून ईश्वरासाठी कला सादर करत आहे’, असा भाव हवा. कलाकाराचा असा भाव असला की, ईश्वर त्याच्याकडून प्रत्येक कृती योग्य भावानेच करून घेतो. कलाकारातील या भावामुळे त्याला ‘समोर कुणी प्रेक्षक आहेत कि नाहीत’, याचेही भान रहात नाही. त्याचा ‘मी केवळ भगवंतासाठी कला प्रस्तुत करत आहे. तोच साक्षात् माझ्यासमोर आहे’, असाच भाव असतो. म्हणतात ना, ‘भाव तेथे देव !’ कलाकाराला कलेतून साधनेत प्रगती करायची आहे, तर ‘अखंड भगवंताचे अनुसंधान साधणे’, याकडे त्याचे लक्ष हवे.

१ ऊ. कलेच्या सादरीकरणापुरते स्वतःला विसरणे, म्हणजे ‘कलेतून साधना’, असे नसून दिवसभर ती स्थिती टिकवण्यासाठी प्रयत्न करणे, हे कलेच्या माध्यमातून साधना करणे असणे

कलाकारांचा प्रश्न : कलेचे सादरीकरण करतांना कलाकार स्वतःला विसरून वेगळ्याच स्थितीत गातात, असे आम्ही अनुभवले आहे. कलाकाराची अशी स्थिती होणे, म्हणजेच त्याने कलेच्या माध्यमातून साधना करणे, असे असते का ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : कलाकार कलेचे सादरीकरण करतांना, म्हणजे गायन, वादन, नृत्य करतांना स्वत:ला विसरतो; मात्र त्याची ही स्थिती त्या वेळेपुरती असते. दिवसभरात अन्य वेळीही ‘तो स्वतःचे अस्तित्व न जपता कृती करत आहे’, असे त्याचे होत नाही. साधनेतील अखंडत्व महत्त्वाचे आहे. भक्तीमार्गाने साधना करणार्‍या साधकाचा नामजप सातत्याने होत असतो. त्याचा झोपेतही नामजप होत असतो. त्यामुळे साधक अखंड भगवंताच्या अनुसंधानात असतो. ‘कलाकाराने कलेत रममाण होणे’, हे त्या तुलनेत मर्यादित झाले.

१ ए. संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे आणि ईश्वर पंचमहाभूतांच्या पलीकडील असल्याने कलाकाराने संगीताला साधनेची जोड देऊन पुढच्या टप्प्याची साधना करणे आवश्यक : संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे. आकाशतत्त्व पंचमहाभूतांपैकी एक आहे. आपल्याला पंचमहाभूतांच्या पलीकडे जायचे आहे. पंचमहाभूतांच्या पलीकडेच ईश्वर आहे. कलाकार आयुष्यभर केवळ संगीत सादर करत राहिल्यास त्याची आकाशतत्त्वाशी संबंधित साधना होईल. तो आणखी पुढे कसा जाणार ?

संगीताविषयी महत्त्वाचे म्हणजे संगीत पंचमहाभूतांपैकी पृथ्वी, आप, तेज आणि वायु या तत्त्वांच्याही पुढच्या टप्याचे, म्हणजे आकाशतत्त्वाशी संबंधित असल्याने ते अधिक पुढच्या टप्प्याचे आहे. त्यामुळे संगीतकला जोपासणारा कलाकार पुढच्या टप्प्याला आधीच पोचलेला असतो. तो संगीताला साधनेची जोड देऊन आकाशतत्त्वाच्याही पुढे जाऊन ईश्वरप्राप्ती करू शकतो. कलेतून साधना करतांना ‘कलाकाराचा तन, मन आणि धन यांचा त्याग किती झाला ? कलाकाराने भगवंताला सर्वस्व अर्पण केले का ?’, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

१ ऐ. कलेची उपासना करतांना कलाकाराचे ‘ईश्वरप्राप्ती’ हे ध्येय नसेल, तर कलाकार अहंकाराच्या विळख्यात अडकून राहू शकणे : विद्यार्थी विविध कलांतील शिक्षण घेतात. कलेच्या क्षेत्रातील गुरु विद्यार्थ्याला ‘कला शिकण्याचा उद्देश ईश्वरप्राप्ती करणे हा आहे’, याविषयी सांगत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करायला शिकवणे, हा भाग दूरच रहातो. विद्यार्थी केवळ कलेविषयी शिकतो. विद्यार्थ्यांना स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन कसे करावे, हे शिकवल्याविना त्यांना ते करणे कठीण आहे. प्रत्येक व्यक्तीत अहं असतो. कलाकारात अहं वाढण्याचा धोका अधिक असतो. कलाकारांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवली नाही, तर कलाकार अहंमध्येच अडकून रहातील. कलाकारातील अहं वाढल्यास त्याची साधनेत हानी होते.

१ ओ. कलाकारांना येत असलेल्या अनुभूतीच्या संदर्भात केलेले मार्गदर्शन

१ ओ १. कलाकाराला ‘पोकळीकडे पाहून नृत्य करावे’, असे वाटणे, ही त्याची निर्गुणाकडे वाटचाल होत आहे’, याचे दर्शक असणे

कलाकारांचा प्रश्न : मला ‘पोकळीकडे पाहून नृत्य करावे’, असे वाटते. हा माझा भ्रम आहे कि कसे ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : साधनेत प्रगती होतांना साधकाला अशा प्रकारच्या अनुभूती येतात. त्या वेळी त्याच्या मनात येते की, ‘हे योग्य आहे कि कसे ?’ ‘पोकळीकडे पाहून नृत्य करावे’, असे वाटणे’, हे ‘निर्गुणाकडे वाटचाल होत आहे’, असे दर्शवते. असे जाणवणे योग्य आहे. कलाकाराने ही स्थिती साधल्यावर अखंडपणे त्या अवस्थेत रहाण्याचा प्रयत्न करावा. ही अवस्था केवळ नृत्यापुरती नको, तर साधकाने २४ घंटे या स्थितीत रहाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.’

(क्रमश:)

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद आणि संगीत समन्वयक, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२१.५.२०२४)

भाग २. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/802175.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या व कलाकारांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक