सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे ‘संगीतातून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’ या विषयावरील अमूल्य मार्गदर्शन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने संगीतातून ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना आणि संगीताशी संबंधित अन्य विषय’ यांवर संशोधनकार्य चालू आहे. या कार्यात सहभागी होण्यासाठी आतापर्यंत अनेक कलाकारांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला भेटी दिल्या आहेत. त्या वेळी त्या कलाकारांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाचा लाभ झाला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभणे, हा कलाकारांचा भेटीतील परमोच्च आनंदबिंदू असल्याचे कलाकार अनुभवत असत. या सत्संगाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कलाकारांना ‘संगीतातून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ ‘संगीतातून साधना करू इच्छिणार्‍या व्यक्तींना व्हावा’, या दृष्टीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली मार्गदर्शनपर सूत्रे येथे दिली आहेत. 

या लेखाचा भाग १ बघण्याकरिता येथे क्लिक करा :https://sanatanprabhat.org/marathi/797719.html

(भाग २)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कलाकारांना आचारधर्म पालनासाठी प्रवृत्त करणे

१. कलाकारांनी परिधान केलेल्या ‘कुर्त्याच्या समोरील बाजूस खाली असलेला कट (कापलेला भाग) योग्य दिसत नाही’, याची जाणीव त्यांना न दुखावता करून देणे आणि संबंधित कलाकारांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती कृतज्ञता वाटणे : एका कलाकाराने परिधान केलेल्या कुर्त्याला समोरून कट (कापलेला भाग) होता. ‘ते कलाकार आसंदीत बसल्यावर कुर्त्याला असलेल्या कटमुळे ते योग्य दिसत नव्हते’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या लक्षात आले. त्यांनी एका साधकाला ते कलाकार आसंदीत बसलेले असतांनाचे छायाचित्र काढायला सांगितले. त्यांनी साधकाला ते छायाचित्र संबंधित कलाकाराला दाखवायला सांगितले. त्यांनी साधकाला सांगितले, ‘‘त्या कलाकाराला ‘असा कुर्ता घालून आसंदीत बसणे आणि गायन अन् वादन करतांना चारचौघांमध्ये दिसायला बरे दिसत नाही’, असे त्या कलाकाराला सांगायला हवे.’’ साधकाने संबंधित कलाकाराला याविषयी सांगितल्यावर त्या कलाकाराला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती कृतज्ञता वाटली.

२. एका कलाकाराच्या पत्नीने आधुनिक पद्धतीची पाय आणि मांड्या यांच्यावर फाटलेली ‘जीन्स पॅन्ट’ घातली होती. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांना अशा पद्धतीचे कपडे न घालण्याविषयी मार्गदर्शन केले.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कला क्षेत्रातील गुरूंना त्यांच्या दायित्वाविषयी केलेले मार्गदर्शन : ‘कला सत्त्वगुणी आहे. कलाकारांनी अशा प्रकारे पेहराव केल्याने त्या पेहरावातून रज-तमात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. साधना करून सत्त्वगुण मिळवायला पुष्कळ प्रयत्न करावे लागतात. विद्यार्थ्यांना कलेचे शिक्षण देतांना त्यांना ‘सात्त्विक पोशाख आणि सात्त्विक दैनंदिन कृती’ यांविषयी शिकवण्याचे दायित्व कला क्षेत्रातील गुरूंचेच आहे’, असे मार्गदर्शन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केले.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करत असलेला समष्टीसाठीचा विचार

पंडित नृत्याचार्य पू. राजकुमार केतकर यांची मुलाखत घेतांना सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

कलाकारांची वैशिष्ट्ये लक्षात आल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले समष्टीसाठी या सूत्रांचे महत्त्व लक्षात घेऊन साधकांना कलाकारांची मुलाखत घ्यायला सांगतात. – सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

‘कलाकाराची पुढच्या जन्मातही साधना चालू रहावी’, यासाठी मार्गदर्शन करणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात एका कलाकाराला अध्यात्मातील स्वेच्छा, परेच्छा, ईश्वरेच्छा, तसेच प्रारब्ध, क्रियमाण इत्यादी भागांविषयी मार्गदर्शन केले. नंतर ते त्या कलाकाराला म्हणाले, ‘‘तुम्हाला हा सगळा भाग आता समजला नाही, तरी सांगून ठेवतो. तुम्हाला तो या जन्मी नाही, तर पुढच्या जन्मात उपयोगी पडेल.’’
(‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले कलाकारांमध्ये आध्यात्मिक साधनेचे बीज रोवून ठेवतात. ते कलाकाराचा केवळ याच जन्माचा विचार करत नसून ‘त्या कलाकाराच्या पुढच्या जन्मामध्येही त्याची साधना चालू रहावी’, यासाठी त्याला मार्गदर्शन करतात.’- संकलक)


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात कलाकारांना आध्यात्मिक स्तरावर आलेल्या अनुभूती आणि कलाकारांचा त्यांच्या प्रती असलेला भाव

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भावपूर्ण नमस्कार करतांना नृत्यांगना सौ. मनीषा पात्रीकर

१. सौ. मनीषा पात्रीकर यांना त्यांची श्रद्धा असलेल्या गुरूंचे दर्शन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये होणे : सौ. मनीषा पात्रीकर यांचे श्रद्धास्थान गुरु मेहेरबाबा आहेत. त्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रथमच भेटल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची बसण्याची पद्धत आणि त्यांचे हास्य पाहून सौ. मनीषा पात्रीकर यांना त्यांचे श्रद्धास्थान गुरु मेहेरबाबा यांचे दर्शन झाले आणि त्यांची भावजागृती झाली. (‘गुरुतत्त्व एकच असल्याची सौ. मनीषा पात्रीकर यांना अनुभूती आली. ‘साधनेत योग्य प्रकारे पुढे जात असल्याविषयी आश्वस्त करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सूक्ष्मातून कलाकारांना शिकवतात’, असे लक्षात येते.’ – संकलक)

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दिव्य सत्संगात जाणवलेल्या आध्यात्मिक भागाविषयी अन्य एका नृत्यांगनेने घरी गेल्यावर काही दिवसांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी भावपूर्ण कृतज्ञतापर पत्र लिहून पाठवले.


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कलाकारांना ‘त्यांची साधना होत आहे’, याची जाणीव करून देणे

अ. ‘कलाकाराने संगीताला साधनेची जोड दिल्याने त्यांच्यातील आनंदात वृद्धी होत आहे’, असे सांगणे : एका कलाकाराने संगीताला

साधनेची जोड दिल्याने त्याचा चेहरा अतिशय आनंदी दिसत होता. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्या कलाकाराला बसलेल्या व्यक्तींच्या समोर उभे रहायला सांगितले आणि सर्वांना ‘यांच्याकडे पाहून काय वाटते ?’, असे विचारले. तेव्हा बसलेल्या व्यक्तींनी ‘कलाकाराचा चेहरा अधिक आनंदी आणि तेजस्वी दिसत आहे’, असे संगितले. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘त्या कलाकाराने संगीताला साधनेची जोड दिल्यामुळे त्यांच्यातील आनंद वाढत चालला आहे’’, असे सांगितले.

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

आ. ‘एका कलाकाराने संगीत गुरु असलेल्या वडिलांकडे गुरु या नात्याने पाहिल्याने त्यांनी साधनेत प्रगती केली’, असे सांगणे : एका कलाकाराचे वडील संगीत क्षेत्रातील एक प्रतिष्ठित मान्यवर कलाकार होते. ते या कलाकारांचे संगीत गुरुही होते. ‘त्या कलाकाराने वडिलांकडे शिष्यभावाने संगीतसाधना शिकल्याने आणि वडिलांची गुरु म्हणून सेवा केल्याने त्या कलाकाराने भावस्थिती गाठली’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले. या कलाकाराने ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली.

इ. एका कलाकाराला मिळालेल्या ‘तालयोगी’ पदवीसह आता ‘ईश्वरयोगी’ ही पदवी मिळवण्याचे ध्येय आणि आशीर्वाद देणे : एका प्रतिष्ठित तबलावादकाला तबल्यातील विद्वतेमुळे ‘तालयोगी’ ही पदवी मिळाली आहे. त्यांना मिळालेल्या या पदवीविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सांगितल्यावर त्यांनी त्या तबलावादकाला ‘आता कलेला अध्यात्माची जोड देऊन साधना करत ‘ईश्वरयोगी’ बनायचे आहे’, असे ध्येय आणि आशीर्वाद दिला.

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद आणि संगीत समन्वयक, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२१.५.२०२४)

(क्रमश:)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या व कलाकारांच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

भाग ३. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/804601.html