हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करा !

लांजा तालुका वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ यांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

डावीकडून तहसीलदार प्रमोद कदम यांना निवेदन देतांना वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे शिष्टमंडळ

लांजा (जि. रत्नागिरी), २८ डिसेंबर (वार्ता.) – हिंदूंच्या देवता आणि संत यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका, तसेच देवतांचे विडंबन करणार्‍या अन् समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून सामाजिक अशांतता पसरवणार्‍या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन २८ डिसेंबर या दिवशी येथील तहसीलदार प्रमोद कदम यांना लांजा तालुका वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने देण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्री, राज्यपाल आणि गृहमंत्री यांनाही तहसीलदारांमार्फत देण्यात आले.

हे निवेदन देते वेळी लांजा तालुका वारकरी संप्रदायचे ह.भ.प. मनोहर (दादा) रणदिवे, ह.भ.प. सुभाष राणे, ह.भ.प. चंद्रकांत पवार, ह.भ.प. गोविंद चव्हाण, श्रीमती स्मिता दळवी, हिंदुत्वनिष्ठ विश्‍व हिंदु परिषद लांजा प्रखंड मंत्री कु. वंदा जेधे, डॉ. समीर घोरपडे, श्री. अमित सरदेसाई आणि श्री. उदय केळुसकर उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, सुषमा अंधारे यांच्या बेताल वक्तव्याचा आम्ही सारे वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ निषेध करत आहोत. वारकरी संप्रदाय नेहमी सत्य आणि न्यायाच्या बाजूने प्रचार करत आहे. समाजातील दोष दूर व्हावेत, लोक निर्व्यसनी व्हावेत, असेच प्रबोधन कीर्तन-प्रवचनांतून केले जाते. अशा संप्रदायाच्या संत परंपरेला दोष देणे, टीका करणे, हे अत्यंत निंदनीय आहे.

संबंधित महिलेची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्हाला महाराष्ट्रभर वैध मार्गाने आंदोलन करावे लागेल.