कणाकणात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निर्गुण तत्त्वाची अनुभूती देणारा आणि सर्वांवर चैतन्याची उधळण करणारा दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा !

साधकांचा भाव व्यक्त करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन विशेषांक आणि श्रीकृष्णाचे छायाचित्र यांचे पूजन

‘गेली अनेक वर्षे दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा साजरा होत आहे. त्यातील काही वर्षे तो आश्रमातही झाला आहे. आतापर्यंतच्या सर्व सोहळ्यांच्या तुलनेत यंदाचा वर्धापनदिन सोहळा वैशिष्ट्यपूर्ण झाला. यंदा १६ एप्रिलच्या रात्री वर्धापनदिन सोहळ्याची पूर्वसिद्धता करतांनापासूनच वातावरणात चैतन्य जाणवत होते. साधक रात्री उशिरापर्यंत सेवा करत असतांना मध्यरात्रीही पहाटेप्रमाणे मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. सोहळ्याच्या दिवशीही सकाळपासूनच आश्रमातील चैतन्य पुष्कळ प्रमाणात वाढल्याचे जाणवले. ‘या सोहळ्याच्या निमित्ताने चैतन्याचे भरभरून प्रक्षेपणच सर्वत्र होत आहे’, असे वाटत होते. आश्रमातील तेजतत्त्व पुष्कळ वाढल्याने सर्वत्र प्रकाश जाणवत होता. साधकांच्या मुखावरही तो आनंद आणि उत्साह दिसून येत होता. येणारे वाचक आणि हितचिंतक हेही पुष्कळ जिज्ञासेने आणि आनंदाने आश्रम पहात होते.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

एरव्ही साधकांना गुरुदेवांचे सगुण अस्तित्व कार्यस्थळी जाणवणे आदी अनुभूती येतात. या सोहळ्यात मात्र कणाकणात, सर्वत्र गुरुदेवांचेच अस्तित्व निर्गुण तत्त्वरूपाने पुष्कळ प्रमाणात जाणवले. साधक, वाचक आणि जिज्ञासू यांच्यावर चैतन्याची उधळण करणारा असा हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट सोहळा आज पार पडला !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (१७.४.२०२२)

‘सनातन प्रभात’च्या कार्यालयातील फलक पहातांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार

वाचक, विज्ञापनदाते आणि हितचिंतक यांची ओसंडून वाहे जिज्ञासा !

आश्रमभेटीच्या ओढीने वयाच्या ८५ वर्षीही देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथून आलेल्या आणि चाकांच्या आसंदीवरून आश्रम पहातांना श्रीमती शोभना पाटीलआजी अन् माहिती सांगतांना श्रीमती मिनल हसबनीस (उजवीकडे)
गोवा डेअरीच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका सौ. रेश्मा तळावलीकर आणि त्यांचे पती श्री. गणपति तळावलीकर यांच्याशी संवाद साधतांना उजवीकडून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्री. सत्यविजय नाईक
डावीकडून दुसर्‍या सौ. मानसी शिरोडकर, श्री. मनोहर शिरोडकर, स्व. मनोहर पर्रीकर (गोव्याचे माजी मुख्यमंत्री) यांच्या बहीण सरस्वती शंखवाळकर आणि त्यांची सून सौ. दीप्ती शंखवाळकर अन् त्यांना आश्रमातील साधक चुका लिहीत असलेल्या फलकाची माहिती सांगतांना आधुनिक वैद्या (सौ.) लिंदा बोरकर
प्रा. महावीर श्रीश्रीमाळ (उजवीकडे) यांच्याकडून ‘सनातन प्रभात’विषयी माहिती जाणून घेतांना उजवीकडून प्रा. सुभाष वेलिंगकर, माजी निवडणूक आयुक्त श्री. नारायण नावती, प्रा. गणेश गावडे, प्रा. दत्ता नाईक, श्री. शिवाजी सावकार अन् प्रा. प्रवीण नेसवणकर

‘सनातनच्या वाचकांनी दिलेले अभिप्राय हे ‘सनातनचा आश्रम हा आतंकवाद्यांचा तळ’ असे म्हणणार्‍यांना चपराक !

‘आश्रमातून जावेसेच वाटत नाही. अजून पाहूया, ऐकत राहूया’, असे वाटते’, असेही काही वाचकांनी आश्रमातून निघतांना सांगितले. आश्रम पहातांना वाचक आणि जिज्ञासू यांच्या मुखमंडलावर ओसंडून वहाणारा उत्साह बरेच काही सांगून गेला. आश्रमातील चैतन्यात जिज्ञासू आणि वाचक न्हाऊन निघाले. ‘वाचक आणि जिज्ञासू हे सनातनच्याच कुटुंबातील घटक आहे’, असेच साधकांना वाटत होते.

वाचक आणि जिज्ञासू यांना ‘आश्रमात अजून काही काळ थांबूया’, असे वाटणे, हीच सनातनच्या राष्ट्र आणि धर्म कार्याची मोठी पोचपावती आहे !

सनातनच्या साधकांनी अनुभवले वाचकांचे प्रेम !

कोरोनाच्या संकटामुळे गेली २ वर्षे ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन ऑनलाईन पद्धतीने साजरा केला गेला; परंतु यंदा कोरोनाचे संकट निवळले आणि या संधीचा लाभ घेत वाचकांना प्रत्यक्ष भेटण्याचे प्रयोजन वर्धापनदिन सोहळ्याच्या माध्यमातून पूर्ण झाले. वाचकांचे ‘सनातन प्रभात’वरील प्रेम आणि ‘सनातन आश्रमा’विषयी वाटणारी ओढ यांची काही उदाहरणे !

कु. सायली डिंगरे

१. अत्यंत उत्साहाने आणि जिज्ञासेने आश्रमातील कार्य जाणून घेणार्‍या ८५ वर्षीय श्रीमती शोभना पाटीलआजी !

देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्रीमती शोभना पाटील या ८५ वर्षांच्या आजींनी वर्धापनदिनाला उपस्थित राहून आमचा उत्साह द्विगुणित केला. या आजींनी वयोपरत्वे चाकांच्या आसंदीवर बसून; मात्र जिज्ञासेने आश्रम पाहिला. त्या म्हणाल्या, ‘‘मला आश्रमात यायची पुष्कळ इच्छा होती; परंतु गेली २ वर्षे कोरोना महामारीमुळे ते जमले नाही. ‘माझ्या संचितामध्ये असेल, तेव्हा मला आश्रमदर्शनाची संधी मिळेल’, असा विचार करून मी आश्रमात यायची वाट पहात होते. आज मला आश्रम पहाण्याची संधी मिळाली.

यासह श्रीमती नाकरानी यांचे वय ७५ वर्षे असूनही त्यांनी सर्व आश्रम उत्साहाने पाहिला.

२. जिज्ञासू महिलेच्या मनात पायदुखीमुळे ‘आश्रम पहाता येईल का ?’, अशी शंका निर्माण होणे; मात्र आश्रम पाहून झाल्यावर पायदुखी न्यून झाल्याचे जाणवणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका जिज्ञासू महिलेचे पाय पुष्कळ दुखत होते. त्यामुळे ‘आश्रम पूर्ण फिरून पहाता येईल का ?’, अशी तिला शंका वाटत होती. तरीही सनातनचे कार्य जाणून घेण्याच्या ओढीने त्या महिलेने २-३ घंटे वेळ देऊन आश्रमातील राष्ट्र आणि धर्म यांविषयक कार्य जाणून घेतले. आश्रम पाहून झाल्यावर त्यांना लक्षात आले की, त्यांची पायदुखी थांबली आहे. प्रत्यक्षात जिथे त्यांना पायदुखीमुळे आश्रम पहाण्याविषयी शंका होती, तिथे त्यांना आश्रम पहाताही आला आणि पायदुखीही न्यून झाली. त्या महिलेला आश्रमात शांतीची अनुभूती आली.

३. सर्वच वाचक आणि जिज्ञासू यांनी सर्व माहिती जिज्ञासेने आणि उत्साहाने ऐकणे

आश्रमातील सेवांच्या कक्षात सर्वत्र जिज्ञासू विविध गट करून आश्रम पहात होते. त्यामुळे काही प्रसंगांमध्ये काही वाचकांना मार्गिकेत २-५ मिनिटे थांबावे लागले. असे असूनही कुणीच ‘या कक्षाची माहिती न घेता पुढील कक्षात जाऊया’, ‘आम्हाला थांबावे लागले’, अशा प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाहीत. सर्वच वाचक, जिज्ञासू थोडा वेळ थांबून; पण सर्व माहिती जिज्ञासेने आणि उत्साहाने जाणून घेत होते. आश्रम पहाण्यासाठी २-३ घंटे देऊनही नंतर ग्रंथप्रदर्शन, धर्मशिक्षण फलक आदी ठिकाणीही वाचक पुष्कळ वेळ देत होते.

४. आश्रमाविषयी माहिती ऐकतांना भावजागृती होणे

भजनी मंडळातील काही महिला सदस्यांनी आश्रमाला भेट दिली. त्यातील एका महिलेची आश्रमाची माहिती सांगतांनाच पुष्कळ भावजागृती झाली. आश्रम पहात असतांना २-३ वेळा ‘तुमचे कार्य किती पवित्र आहे’, असे त्या म्हणाल्या. हे सांगतांना त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू तरळले. ‘आश्रम पहातांना एक जिज्ञासू आश्रमात सर्व ठिकाणी नमस्कार करत होते’, तसेच त्यांची भावजागृती होत होती.

५. सनातनच्या संतांविषयी भाव व्यक्त करणे

श्रीसतशक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सनातनचे अन्य संत यांची भेट झाल्याने ‘संतदर्शनाचा लाभ झाला’, असे काही जिज्ञासूंनी सांगितले. अनेक जिज्ञासूंनी श्रीसतशक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना लांबूनच पाहून ‘त्या संत आहेत का ?’ असे विचारले. काही जिज्ञासूंनी ‘आम्हाला सनातनचे बालकसंत पू. भार्गवराम प्रभु आणि पू. वामन राजंदेकर यांना पहाण्याची इच्छा व्यक्त केली.

वाचक आणि हितचिंतक यांनी भरभरून दिलेले प्रेम, कार्याप्रती व्यक्त केलेला आदर हे पुढील वाटचालीसाठी आम्हाला प्रेरणादायी ठरेल, याच शंकाच नाही !

– कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.४.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक